'सारे जहाँसे अच्छा' लिहिणाऱ्या कवीला पाकिस्तानच्या निर्मितीसाठी जबाबदार का मानलं जातं?

'सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा' हे अजरामर गीत 1904 साली इकबाल यांच्या लेखणीतून आलं.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
    • Reporting from, नवी दिल्ली

सारे जहाँ से अच्छा... हे गीत लिहिणाऱ्या कवी इक्बाल मोहम्मद यांचा 9 नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्ताने हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

-------------------------------------------------

"मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा"

या ओळी गेल्या एक शतकापेक्षा जास्त काळ भारतात गायल्या जातायत. पण ज्या कवीने ही रचना केली, त्यालाच पाकिस्तानच्या निर्मितीचं कारण का मानलं जातं?

'सारे जहाँसे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा' हे अजरामर गीत 1904 साली इकबाल यांच्या लेखणीतून आलं. पण यानंतर 6 वर्षांतच 1910 साली 'मुस्लीम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा' असं इकबाल यांनी का लिहीलं?

पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये मोहम्मद इकबाल यांचा जन्म झाला 1877 साली. व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या इकबाल यांनी गव्हर्नमेंट कॉलेज लाहोरमधून शिक्षण घेतलं.

पुढे केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची डिग्री आणि म्युनिकमधून पी. एच. डी. संपादन केलेले इकबाल बॅरिस्टरही झाले. युरोपात राहून एकीकडे पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि दुसरीकडे इस्लामचा अभ्यास असलेल्या इकबाल यांनी इंग्लिश इहवादावर टीका केली.

ब्रिटिश अमलाखाली मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही हे पाहून त्यांनी या सत्तेवरही टीका केली. मुस्लीम समाजाने आपला इतिहास लक्षात ठेवण्याची आठवण ते आपल्या काव्यातून देत राहिले. पण 1922 साली जेव्हा त्यांनी 'सर' हा किताब स्वीकारला तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं.

इस्लामी विद्वानांना दिली जाणारी अल्लामा ही पदवीदेखील त्यांना पुढे दिली गेली. पण अध्यात्मिक चिंतनापेक्षा समाजाने कृतीवर भर दिला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. या धार्मिक विद्वानाच्या लिखाणात राजकीय विचारही ठासून भरलेला होता.

'सारे जहाँसे अच्छा…' चा जन्म

वर्ष होतं 1904, लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या इकबाल यांनी 'तराना-ए-हिंदी' हे शीर्षक असलेली 'सारे जहाँसे अच्छा' ही उर्दू कविता रचली. लखनऊच्या इत्तेहाद या साप्ताहिकात ती पहिल्यांदा प्रकाशित झाली अशी नोंद अनेक ठिकाणी आढळते.

तेव्हा लाहोरच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले इकबाल यांना लाला हरदयाळ यांनी आपल्या यंग मेन्स इंडिया असोसिएशनच्या कार्यक्रमाला बोलावलं जिथे भाषण करण्याऐवजी इकबाल यांनी आपली ही कविता वाचली.

1905 ते 1908 हा काळ त्यांनी युरोपात घालवला. पण या काळात त्यांचा राष्ट्रवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.

1931 साली इकबाल गोलमेज परिषदेत मुस्लीम प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते, या परिषदेला मोहम्मद अली जिनाही उपस्थित होते

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1931 साली इकबाल गोलमेज परिषदेत मुस्लीम प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते, या परिषदेला मोहम्मद अली जिनाही उपस्थित होते

1910 साली त्यांनी अलीगढमध्ये दिलेल्या 'इस्लाम : सामाजिक आणि राजकीय आदर्श' या व्याख्यानात त्यांनी इस्लामकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली.

त्यांच्या काव्यातही इस्लामच्या गतवैभवाबद्दल अभिमान, सद्य स्थितीबद्दल निराशा सातत्याने पाहायला मिळाली. म्हणूनच बहुधा 1910 साली त्यांनी 'मुस्लीम हैं हम, वतन है सारा जहाँ हमारा' असं सांगणारी 'तराना-ए-मिल्ली' ही कविता रचली.

1930 साली अलाहाबाद इथे झालेल्या मुस्लीम लीगच्या सभेत त्यांनी वायव्येतील मुसलमानांचं स्वतंत्र राज्य असावं अशी भूमिका मांडली. याच कल्पनेतून पुढे पाकिस्तानचा जन्म झाला असं मानलं जातं.

खुद्द पाकिस्तानातही इकबाल यांना राष्ट्रकवीचा दर्जा आहे. त्यांचा जन्मदिवस पाकिस्तानात 'इकबाल दिवस' म्हणून साजरा केला जातो.

1931 साली लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भारतीय मुस्लिमांच्या शिष्टमंडळात इकबाल यांचा समावेश होता ज्याचं नेतृत्व आगा खान करत होते. या परिषदेला जिन्ना सुद्धा उपस्थित होते.

मोहम्मद इकबाल आणि मोहम्मद अली जिना

1913 पासून मोहम्मद अली जिन्ना मुस्लीम लीगचं नेतृत्व करत होते. होमरुल आणि घटनात्मक सुधारणांच्या बाबतीत लीग आणि काँग्रेसमध्ये एकमत झालं होतं आणि दोन्ही पक्ष मिळून संयुक्त अधिवेशनंही भरवत होते.

1916 साली लखनऊ करारातून मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांच्या मागणीला काँग्रेसने पाठिंबाही जाहीर केला होता. हिंदू मुस्लीम ऐक्याचे दूत म्हणून गोपाळ कृष्ण गोखलेंनी त्यांचं कौतुकही केलं होतं.

मोहम्मद इकबाल आणि मोहम्मद अली जिना

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहम्मद इकबाल आणि मोहम्मद अली जिना

पण लवकरच काँग्रेसमध्ये गांधीपर्व सुरू होणार होतं आणि गांधी आणि जिन्नांचे मार्ग वेगळे होणार होते. 1935 सालानंतर जिन्नांनी पुन्हा एकदा मुस्लीम लीगचं नेतृत्व हाती घेतलं.

1935 च्या कायद्याअन्वये भारतात प्रांतिक निवडणुका झाल्या. यात काँग्रेसला यश मिळालं, पण मुस्लीम लीगची कामगिरी यथातथाच होती. प्रांतिक सरकारांमध्ये लीगला प्रतिनिधित्व मिळालं नाही. इथून काँग्रेस आणि लीग यांच्यातला दुरावा वाढत गेला.

जिन्नांची धर्मनिरपेक्षता 1937 सालापर्यंतच टिकली असं लेखक आणि इतिहास अभ्यासक रफीक झकारिया यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं होतं.

मोहम्मद इकबाल पाकिस्तानला 'पळून गेले' होते का?

मोहम्मद इकबाल यांच्याबाबत एक गोष्ट अनेकदा बोलली जाते, 'सारे जहाँसे अच्छा लिहिणारा हा कवी पुढे पाकिस्तानात पळून गेला.'

सियालकोटमध्ये (आजचा पाकिस्तान) जन्मलेल्या या कवीचा 1938 साली लाहोर इथे मृत्यू झाला. लाहोरच्या सुप्रसिद्ध बादशाही मशिदीसमोरच त्यांना दफन करण्यात आलं.

यानंतर दोनच वर्षांनी मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानच्या ठरावाला संमती दिली. 22 आणि 23 मार्च 1940 रोजी लाहोर इथे मुस्लीम लीगने स्वतंत्र पाकिस्तानचा प्रस्ताव एकमुखाने स्वीकारला.

व्हीडिओ कॅप्शन, ‘सारे जहाँ से अच्छा’ लिहिणाऱ्या कवीमुळेच पाकिस्तानची निर्मिती झाली का?

इकबाल यांची स्वतंत्र राज्याची भूमिका पाकिस्तानच्या निर्मितीमागची प्रेरणा ठरलेली असू शकते. पण 'पाकिस्तान' च्या राजकीय अस्तित्वासाठीच्या हालचालीच त्यांच्या मृत्यूनंतर झाल्या, त्यामुळे कालरेषेचा विचार करता ते तिथे निघून गेले असं म्हणता येणार नाही.

फाळणीच्या प्रस्तावाला सुरुवातीला काँग्रेस नेतृत्वाने विरोध केला असला, तरी जिनांनी ही मागणी मान्य करवून घेतली. एकीकडे भारतीय प्रजासत्ताक आणि दुसरीकडे पाकिस्तान हे इस्लामिक प्रजासत्ताक उदयाला आलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)