भाजपच्या स्थापनेवेळी महंमद अली जीनांचे नातू होते पक्षाचे सर्वांत मोठे देणगीदार, पक्षाच्या स्थापनेमागची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी
(एकेकाळी जनसंघ म्हणून ओळखला जात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची स्थापना अगदी चार दशकं अलीकडची आहे. हा पक्ष कसा स्थापन झाला, पक्षाने आपली विचारधारा काय असेल हे कसे निश्चित केले, सुरुवातीचे नेते कसे होते, देणगीदार नेमके कोण होते याची सविस्तर माहिती देणारा हा लेख.)
इंदिरा गांधी 1980 मध्ये सत्तेत परत आल्या. त्याआधी जनता सरकारमध्ये जगजीवन राम हे उप-पंतप्रधान होते. त्यांचं सरकार असताना त्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. जनसंघासोबत असलेले हे सरकार गेल्यानंतर देखील आपण हा मुद्दा लावून धरू असं जगजीवन राम यांनी म्हटलं होतं.
दुहेरी सदस्यत्व म्हणजे जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या दोन्ही संघटनांचं एकाच वेळी सदस्य असणं. यावर अनेक मोठ्या नेत्यांचा आक्षेप होता.
जगजीवन राम यांच्या या भूमिकेचा परिणाम असा झाला की दुहेरी सदस्यत्वावर पुढे बंदी आली.
जनसंघातल्या नेत्यांनी आरएसएसशी असलेले संबंध तोडले नाहीत तर त्यांना जनता पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं 4 एप्रिलला कार्यकारणीनं ठरवलं. जनसंघातल्या नेत्यांना या निर्णयाची कुणकुण कदाचित आधीच लागली होती.
'द सॅफरन टाइड, द राइज ऑफ द बीजेपी' या पुस्तकात किंशुक नाग लिहितात की, " 5 आणि 6 एप्रिल 1980 ला जनता पक्षातल्या जनसंघ या शाखेनं किंवा दिल्लीतल्या फिरोज शाह कोटला स्टेडियमवर बैठक घेतली. त्यात किमान तीन हजार सदस्यांनी हजेरी लावली. तिथेच भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली."
अटल बिहारी वाजपेयींना पक्षाचं अध्यक्ष घोषित करण्यात आलं. तर लालकृष्ण आडवाणी यांचं नाव सूरज भान आणि सिकंदर बख्त यांच्यासह पक्षाचे महासचिव म्हणून निश्चित करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
1980 च्या निवडणुकीत जनता पक्षाला फक्त 31 जागा जिंकता आल्या होत्या. त्यातल्या जवळपास निम्म्या म्हणजे 16 जागा जनसंघाच्या सदस्यांच्याच होत्या.
या सर्वांनी राज्यसभेतले 14 सदस्य, 5 माजी कॅबिनेट मंत्री, 8 माजी राज्य मंत्री आणि 6 माजी मुख्यमंत्र्यांसह नव्या पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांचाच पक्ष खरा जनता पक्ष असल्याचा दावा ते करू लागले.
निवडणूक आयोगाने दिलं कमळ चिन्ह
जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी जनसंघाशी जोडलेल्या या नेत्यांना आव्हान दिलं. त्यांच्या विरोधाकडं सुरुवातीला निवडणूक आयोगानंही फारसं लक्ष दिलं नाही.
आयोगानं भारतीय जनता पक्षाला थेट राष्ट्रीय पक्षाचा दर्जा बहाल केला. हाती नांगर घेतलेला शेतकरी या जनता पक्षाच्या चिन्हावर तात्पुरती बंद घातली.
निवडणूक आयोगानंच भारतीय जनता पक्षाला कमळ हे चिन्ह दिलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
भारतीय जनता पक्षाला चक्र आणि हत्ती असलेलं चिन्ह हवं होतं. तसा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. पण निवडणूक आयोगानं तो स्वीकारला नाही.
चंद्रशेखर यांनी निवडणूक आयोगाकडं निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. सहा महिन्यांनंतर निवडणूक आयोगाने चंद्रशेखर यांची विनंती मान्य करत हलधर किसान या निवडणूक चिन्हावरची बंदी उठवली.
मात्र, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा तसाच कायम ठेवला.
बाहेरच्या नेत्यांना प्राधान्य
सुरुवातीच्या काळात भारतीय जनता पक्षात आरएसएस बाहेरच्या नेत्यांकडे दुर्लक्ष केलं जात नव्हतं.
'द न्यू बीजेपी' या पुस्तकात नलिन मेहता लिहितात की, "भाजपने माजी कायदे मंत्री शांती भूषण, प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश के. एस. हेगडे आणि माजी काँग्रेस नेते सिंकदर बख्त यांचं फक्त स्वागतच केलं नाही तर त्यांना महत्त्वाचं स्थानही दिलं. पक्षाची घटना तयार करणाऱ्या तीन सदस्यांच्या समितीतील दोन सदस्य आरएसएस बाहेरचे होते."

फोटो स्रोत, Getty Images
भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर राम जेठमलानी सिंधमधून भारतात आले होते. तर सिकंदर बख्त दिल्लीतल्या मुस्लीम कुटुंबातील होते.
पक्षाचे अध्यक्ष म्हणून वाजपेयींचं नाव सिकंदर बख्त यांनीच सुचवलं होतं. त्याला राजस्थानचे नेते भैरव सिंह शेखावत यांनी समर्थन दिलं.
'गांधीवादी समाजवादा'चा स्वीकार
नव्या पक्षाचं नाव काय ठेवायचं याबद्दलचा वाद भाजपचा जन्म व्हायच्या आधीपासूनच सुरू होता. नव्या विचारसरणीच्या पक्षाचं नावही तसंच नवं असावं असं वाजपेयी यांना वाटत होतं.
भाजपच्या अधिकृत दस्तऐवजांनुसार, पक्षाच्या पहिल्या बैठकीला आलेल्या लोकांना पक्षाच्या नावाबद्दल विचारलं तेव्हा तीन हजार पैकी फक्त 6 सदस्यांनी जुन्या 'जनसंघ' या नावाला पाठिंबा दिला.
शेवटी पक्षाचं भारतीय जनता पक्ष असं नामकरण करायचं ठरलं. वैचारिकदृष्ट्या पक्षानं गांधीवादी समाजवाद स्वीकारायचं ठरवलं. पण अनेक सदस्यांना सुरुवातीला ते मान्य नव्हतं.
किंशुक नाग लिहितात, "विजयाराजे सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली अनेक भाजप नेते समाजवाद या शब्दाचा वापर करण्याबाबत साशंक होते. या शब्दामुळं साम्यवाद्यंसोबत वैचारिक सामानता असल्याचा आभास तयार होतो असं त्यांना वाटत होतं. आरएसएसला त्यापासून कोणत्याही परिस्थितीत दूर रहायचं होतं. 'गांधीवादी समाजवाद' स्वीकारल्याने पक्षावर दुसऱ्याचं अनुकरण करणारा आणि काँग्रेसची विचारसरणी स्वीकारणारा असे आरोप लागतील असं काही नेत्यांना वाटत होतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्यावेळेचे आरएसएस प्रमुख बाळासाहेब देवरस यांनाही गांधीवादी समाजवाद हा शब्द नको होता, असंही म्हटलं जातं. मात्र, नंतर त्यांनी मान्य केलं.
किंशुक नाग पुढे लिहितात की, "आरएसएसचे लोक मुस्लिमांसारख्या बिगर-हिंदूंना पक्षात सामील करून घेण्याबाबत नाखुष होते. तरीही जनसंघाची जुनी विचारसरणी विसरून नवीन सुरुवात करावी यावर पक्षाचा जोर होता.
"कदाचित त्यामुळेच पक्षाच्या व्यासपीठावर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय यांच्यासह जयप्रकाश नारायण यांचाही फोटो होता."
मुंबईत भरलं पक्षाचं महाधिवेशन
डिसेंबर 1980 च्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पक्षाचं अधिवेशन भरवण्यात आलं. त्यात हजारो सदस्यांनी सहभाग घेतला.
'माय कंट्री, माय लाइफ' या आत्मचरित्रात लालकृष्ण आडवाणी यांनी असा दावा केला आहे की, तेव्हा देशातले 25 लाख लोक भारतीय जनता पक्षाचे सदस्य बनले होते.
जनसंघाच्या चांगल्या काळातही पक्षाची सदस्य संख्या 16 लाखांपेक्षा जास्त कधीच झाली नव्हती.
'बीजेपी कन्व्हेन्शन, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल' हा इंडिया टुडेच्या 31 जानेवारी 1981 च्या अंकात छापून आलेला सुमित मित्रा यांचा लेख.
ते लिहितात, "भाजपच्या एकूण 54,632 प्रतिनिधींपैकी 73 टक्के लोक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या पाच राज्यातले होते. मुंबईच्या वांद्रे रिक्लेमेशन क्षेत्रावर एक तात्पुरती छोटी वसाहतच वसवली गेली होती."

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTY IMAGES
त्यात 40 हजार लोकांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली गेली होती.
28 डिसेंबरला संमेलनाची सुरुवात झाली. दुपारपर्यंत 44 हजार प्रतिनिधी सभास्थळी पोहोचले. संध्याकाळपर्यंत आणखी काही लोक येणार होेते.
शेवटी, शक्य असेल तर पक्षाच्या सदस्यांनी बाहेर जेवण करावं अशी विनंती पक्षाचे सचिव आडवाणी यांना करावी लागली.
शिवाजी पार्कवर वाजपेयी
सभा भरली होती तिथे सगळीकडे पक्षाचे नवे झेंडे लावले होते. एक तृतियांश भाग हिरवा आणि दोन तृतियांश भाग केशरी होता.
28 डिसेंबर 1980 ला संध्याकाळी 28 एकरमध्ये पसरलेल्या शिवाजी पार्कात झालेलं पक्षाचं सत्र सर्वांसाठी खुलं होतं. त्यात सामान्य लोकांनाही सहभागी होण्याची परवानगी होती.
विनय सीतापती यांनी त्यांच्या 'जुगलबंदी, द बीजेपी बिफोर मोदी' या पुस्तकात लिहिलंय की, "पक्षाचे नवे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांनी शिवाजी पार्कच्या चार किलोमीटरच्या रस्त्यावर ओपन जीपमधून प्रवास केला."
हिंदू राष्ट्रवादाच्या भावनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मराठी सैनिकाच्या वेशात एक व्यक्ती घोड्यावर बसून सर्वात पुढे जात होता.
त्याच्या मागे ट्रकांचा एक ताफा होता. त्यावपर दीनदयाल उपाध्याय आणि जयप्रकाश नारायण यांचे फोटो लावले होते.

फोटो स्रोत, Getty Images
आरएसएस प्रमुख बाळासाहेब देवरस यांचे बंधू भाऊराव देवरसही उपस्थित होते. जयप्रकाश नारायण यांचा गांधीवादी समाजवाद पचायला जड जात असल्याचं आरएसएसचे नेता शेषाद्री चारी मान्य करत होते.
एका मुलाखतीत प्रवीण तोगडिया यांनीही सांगितलं होतं की, "भाजपच्या बहुतेक सदस्यांना गांधीवादी समाजवाद स्वीकारायचा नव्हता आणि पक्षाचा झेंडाही बदलायचा नव्हता."
मला हे माहीत होतं कारण त्या काळात मी स्वतः स्वयंसेवक होतो. ही असहमती चहूबाजूंना पसरली होती, पण तिला उघडपणे व्यक्त होऊ दिलं जात नव्हतं.
विजयाराजे सिंधियांचा विरोध
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विजयाराजे सिंधिया यांनी मात्र नव्या विचारधारेबद्दलचा विरोध लपवला नाही. त्यांच्या नजरेत इंदिरा गांधींच्या समाजवादानेच त्यांच्या संस्थांनाकडून सत्ता हिसकावून घेतली होती.
पाच पानांचा एक विरोध दर्शवणारा मसुदा त्यांनी तयार केला. त्याच्या प्रती छापून सदस्यांमध्ये वाटल्या.
गांधीवादी समाजवाद ही घोषणा फक्त पक्ष प्रगतीशील असल्याचं भासवण्यासाठी असल्यामुळे त्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल.
भाजप काँग्रेसची झेरॉक्स कॉपी बनेल आणि पक्षाचा मूळ विचार मागे पडेल.
नंतर त्यांनी 'रॉयल टू पब्लिक लाइफ' या आपल्या पुस्तकातही लिहिलं, "या बदलाला मी विरोध केला होता. पण तरीही मुंबईला झालेल्या संमेलनात पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वांत त्याचा स्वीकार केला गेला."
पक्षाच्या अनेक नेत्यांना असं वाटत होतं की आता आपण जनता पक्षातून बाहेर पडलो असताना गांधीवादी समाजवादाच्या कुबड्या घेण्याची काहीही गरज नाही.

फोटो स्रोत, Eburi Press
'द हिंदू नॅशनलिस्ट मुव्हमेंट अँड इंडियन पॉलिटिक्स' या पुस्तकात क्रिस्टोफर जॅफरलेट लिहितात की, "शेवटी एक सुवर्णमध्य निघाला आणि सार्वजनिरीत्या विरोधपत्र परत घेण्यासाठी सिंधिया यांची मनधरणी केली गेली. भाजपचा समाजवाद हा मार्क्सच्या समाजवादापेक्षा एकदम उलट आहे असं स्पष्टीकरण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलं असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं."
भाजपच्या समाजवादाचा संबंध दीनदयाल उपाध्याय यांच्या 'जनकल्याणवाद' आणि 'एकात्म मानववाद' याच्याशी आहे असं म्हटलं गेलं.
वायपेयींनी या संपूर्ण वादात हस्तक्षेप करत पक्ष गांधीवादी समाजवादाच्या विचारधारेपासून मागे हटणार नाही असं सांगितलं.
'सकारात्मक धर्मनिरपेक्षता'ची वकिली
30 डिसेंबरच्या रात्री दिलेल्या भाषणात वाजपेयींनी घोषणा केली की, भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा सिद्धांत स्वीकारला आहे. त्यांनी त्यांचा पक्ष सकारात्मक धर्मनिरपेक्षता पाळणार असल्याचंही स्पष्ट केलं.
हे 17 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्यांकाप्रती अवलंबलेल्या धोरणाशी सुसंगत असल्याचं त्यांनी म्हटलं. वाजपेयी म्हणाले की, आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिवासात ठेवण्यात आलं होतं तेव्हा त्यांचा एक सेवक मुस्लीम होता.
1661 मध्ये शिवाजी महाराजांनी आपली कोकण मोहीम केळशीच्या याकुतबाबा या मुस्लीम संताच्या आशीर्वादाने सुरू केली होती.
"जनता पक्ष फुटला आहे. पण आम्ही जयप्रकाश नारायण यांचं स्वप्न कधीही भंगू देणार नाही," असं वाजपेयी म्हणाले होेते.
पक्षात गांधीवादी समाजवादाला घेऊन मतभेद आहेत, या वृत्तपत्रात छापलेल्या बातम्यांवरही त्यांनी टीका केली. भांडवलशाही आणि साम्यवाद नाकारणं हा या शब्दाचा मूळ अर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
वाजपेयींच्या भाषणाचे शेवटचे शब्द होते, "भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर समुद्राच्या किनारी उभं राहून मी भविष्याबद्दल विश्वासानं सांगतो की अंधार निवळेल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल."
संमेलनातून परत आल्यावर ऑनलुकर पत्रिकेचे संपादक जनार्दन ठाकूर यांनी लिहिलं, "एक ना एक दिवस अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान बनतील या आशेवर भाजपच्या मुंबई संमेलनातून मी परतलोय.
ते पंतप्रधान बनू शकतील असं मी म्हणत नाही. ते निश्चितपणे पंतप्रधान बनणार आहेत, असं मी म्हणत आहे. माझी भविष्यवाणी कोणत्याही ज्योतिषविद्येवर आधारीत नाहीत. मी काही ज्योतिषी नाही.
पण त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं फार जवळून निरीक्षण केल्यानंतर मला हे समजलं आहे. वाजपेयी भविष्यातले पक्षाचे नेते आहेत."
मोहम्मद करीम छागला यांचं भाजपला समर्थन
या समारंभात प्रमुख पाहुणे होते नेहरू आणि इंदिया गांधीच्या कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून काम केलेेले छागला. भारत-पाकिस्तान फाळणीआधी त्यांनी मोहम्मद अली जिन्ना यांचे सहाय्यक म्हणूनही काम केलं होतं.
'रोजेज इन डिसेंबर' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय की, "त्याकाळी राजकारण आणि कायदेविषय क्षेत्रात जिन्ना माझा आदर्श होते. ते राष्ट्रवादी होते तोपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र जसजसं ते सांप्रदायिक होत गेले आणि देशाच्या फाळणीबद्दल बोलू लागले, तसे त्यांचे आणि माझे रस्ते वेगळे होत गेले."

फोटो स्रोत, Getty Images
छागला यांनी जिनांना विचारलं की, "पाकिस्तान मुख्यतः मुस्लिम बहुल राज्याच्या हितासाठी असेल. पण जे मुसलमान अल्पसंख्याक म्हणून इतर ठिकाणी राहतील, त्यांचं काय होईल?"
"त्यांच्यात मला काहीही रस नाही," असं जिन्नांचं उत्तर होतं. ('रोजेज इन डिसेंबर' पान नं. 78-80).
'द भवंस जरनल' या पत्रिकेच्या सप्टेंबर 1979 च्या अंकात छागला यांनी लिहिलं होतं की, "मी हिंदू आहे कारण मी माझा वारसा माझ्या आर्य पूर्वजांशी जोडून पाहतो. खरंतर हिंदुत्वाकडे एखाद्या धर्मासारखं पाहणं चुकीचं आहे. ते एक तत्त्वज्ञान आहे आणि जीवन जगण्याची एक पद्धत आहे."
नुस्ली वाडिया यांनी उचलला संमेलनाचा खर्च
अटल बिहारी वाजपेयी यांनी छागला याचं स्वागत केलं. ते धर्मनिरपेक्षतेचं प्रतीक असल्याचं म्हटलं. जिना यांच्यासोबत काम करत असतानाही त्यांनी दोन देशांचा विरोध केला.
त्यावर वाजपेयी भविष्यातले पंतप्रधान आहेत असं छागला उत्तरादाखल म्हणाले.
तिथं उपस्थित प्रतिनिधींना ते म्हणाले, "लोकांना सांगा की, तुम्ही ना धार्मिक पक्ष आहात, ना जनसंघाचा नवीन चेहरा. तुम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहात, जो पुढच्या निवडणुकीत किंवा कदाचित त्याआधीच इंदिरा गांधींची जागा घेऊ शकतो."
या संपूर्ण संमेलनासाठी 20 लाख रुपयांचा खर्च आला. त्याकाळात ही मोठी रक्कम होती.
विनय सीतापतींच्या लेखनानुसार संमेलनात भाग घेणाऱ्या एका मोठ्या भाजप नेत्यानं म्हटलं की, "त्या संमेलनासाठी लागणारा बहुतांश पैसा प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडिया यांनी दिला होता."

फोटो स्रोत, PTI
"1970 चं दशक संपेपर्यंत, जिन्ना यांचे नातू नुस्ली वाडिया भाजपला मदत करणारे सर्वात मोठे उद्योगपती बनले होते," असं सीतापती लिहितात.
पक्षाची पहिली बैठक झाल्यानंतर सोळा वर्षांनी म्हणजेच 1996 मध्ये भाजपला केंद्रात सरकार बनवण्याचे निमंत्रण मिळाले. परंतु, संसदेत आपले बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांना केवळ 13 दिवसातच पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.
परंतु, त्यापुढील दोन निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजप सरकारने 1998 मध्ये शपथ घेतली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











