जिना आणि रती यांचा प्रेमविवाह; ज्याची संपूर्ण देशात झाली होती चर्चा

फोटो स्रोत, PAKISTAN NATIONAL ARCHIVE
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मुंबईतील धनाढ्य व्यक्तींपैकी एक असलेल्या सर दिनशॉ पेटिट यांनी नाश्ता करताना बॉम्बे क्रॉनिकल या त्यांच्या आवडत्या वृत्तपत्राचं आठवं पान उघडलं आणि त्यातील एका बातमीवर लक्ष जाताच त्यांच्या हातातून वृत्तपत्र खाली पडलं.
तो दिवस होता, 20 एप्रिल 1918. ती बातमी होती, आदल्या संध्याकाळी मोहम्मद अली जिना यांनी सर दिनशॉ यांची मुलगी लेडी रतीशी विवाह केल्याची.
याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली होती. सर दिनशॉ यांनी त्यांचे मित्र आणि वकील मोहम्मद अली जिना यांना दार्जिलिंगला येण्याचं आमंत्रण दिलं होतं.
तिथे दिनशॉ यांची 16 वर्षांची मुलगी रती देखील होती. त्या काळातील मुंबईतील सर्वात सुंदर मुलींमध्ये तिची गणना व्हायची. त्यावेळेस जिना भारतीय राजकारणाच्या जवळपास शिखराजवळ पोहोचले होते.
जिना 40 वर्षांचे होते. मात्र दार्जिलिंगमधील हिमाच्छादित शिखरं आणि रतीच्या सौंदर्यानं असं काही वातावरण तयार झालं की रती आणि जिन्ना एकमेकांच्या प्रेमात पडले.
त्यांनी या प्रवासादरम्यानच सर दिनशॉ पेटिट यांच्याकडे त्यांच्या मुलीला मागणी घातली. लेखिका शीला रेड्डी यांनी 'मिस्टर अँड मिसेस जिन्ना- द मॅरेज दॅट शुक इंडिया' हे पुस्तक लिहिलं आहे.
त्या सांगतात, "दार्जिलिंगमध्ये एका रात्री जेवण झाल्यानंतर जिना यांनी सर दिनशॉ यांना प्रश्न विचारला की आंतरधर्मीय विवाहाबद्दल त्यांना काय वाटतं?"
जिनांचा विवाहाचा प्रस्ताव
रतीच्या वडिलांनी लगेचच उत्तर दिलं की यामुळे राष्ट्रीय एकतेला बळ मिळेल. या प्रश्नाचं इतकं चांगलं उत्तर जिना यांनासुद्धा देता आलं नसतं. मग त्यांनी एक क्षणही वाया न घालवता दिनशॉ यांना सांगितलं की त्यांना त्यांच्या मुलीशी लग्न करायचं आहे.
जिना यांच्या या प्रस्तावानं दिनशॉ प्रचंड संतापले. त्यांनी जिना यांना त्याच क्षणी त्यांचं घर सोडण्यास सांगितलं. जिना यांनी त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र ते दिनशॉ यांचं मन वळवू शकले नाहीत.

फोटो स्रोत, PAKISTAN NATIONAL ARCHIVE
दोन धर्मांमधील मैत्रीचा त्यांचा फॉर्म्युला पहिल्याच चाचणीत अपयशी ठरला. त्यानंतर दिनशॉ कधीही जिनांशी बोलले नाहीत. तसंच त्यांनी रतीवर देखील बंधन घातलं की जोपर्यंत ती त्यांच्या घरात आहे, तोपर्यंत तिला जिनांना कधीही भेटता येणार नाही.
इतकंच नाही, त्यांनी न्यायालयातून देखील आदेश आणला की जोपर्यंत रती प्रौढ होत नाही, तोपर्यंत जिना तिला भेटू शकणार नाहीत. मात्र असं असूनदेखील रती आणि जिना एकमेकांना फक्त चोरून भेटतच राहिले नाहीत, तर एकमेकांना पत्रंदेखील लिहीत राहिले.
18 वर्षांची रती
शीला रेड्डी सांगतात, "एकदा दिनशा यांनी रतीला एक पत्र वाचताना पाहिलं. त्यानंतर ते जोरात ओरडले की हे नक्कीच जिनांचं पत्र आहे. रतीला पकडण्यासाठी ते एका डायनिंग टेबलच्या चारी बाजूंना पळू लागले. त्यांना रतीच्या हातातून जिनांचं ते पत्र हिसकावून घ्यायचं होतं. मात्र ते रतीला पकडू शकले नाहीत."
सर दिनशॉ यांची गाठ अशा एक बॅरिस्टरशी पडली होती, जो क्वचितच एखादा खटला हरला होता. दिनशॉ खूप हट्टी होते. मात्र बराच काळ एकमेकांपासून दुरावलेलं हे प्रेमी युगुल त्यांच्यापेक्षाही हट्टी होतं. या दोघांनी संयमानं, शांतपणे आणि निर्धारानं रती 18 वर्षांची होण्याची वाट पाहिली.

फोटो स्रोत, PAKISTAN NATIONAL ARCHIVE
जिना यांचे आणखी एक चरित्रकार प्राध्यापक शरीफ अल मुजाहिद म्हणतात की 20 फेब्रुवारी 1918 ला रती 18 वर्षांची होताच, तिनं एक छत्री आणि एक जोडी कपड्यांनिशी तिच्या वडिलांचं घर सोडलं.
जिना रतीला घेऊन जामिया मशिदीत गेले. तिथे रतीनं इस्लामचा स्वीकार केला. 19 एप्रिल 1918 ला जिना आणि रतीचा विवाह (निकाह) झाला.
भारतीय समाजाची मानसिकता
रती-जिनावर पुस्तक लिहिणारे ख्वाजा रजी हैदर म्हणतात की जिना इंपीरियल लेजेस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये मुस्लीम समुदायाचं प्रतिनिधित्व करत होते. जर त्यांनी सिव्हिल मॅरेज अॅक्ट अंतर्गत विवाह केला असता, तर बहुधा त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असता.
त्यामुळेच त्यांनी इस्लामी पद्धतीनं विवाह करण्याचा निर्णय घेतला. रतीदेखील यासाठी तयार झाली. या विवाहात (निकाहनामा) 1001 रुपयांची मेहर किंवा रक्कम निश्चित झाली. मात्र जिना यांनी भेट म्हणून रतीला एक लाख पंचवीस हजार रुपये दिले. 1918 मध्ये ही रक्कम प्रचंड होती.
जिना यांनी त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्नं केलं होतं. त्या काळातील परंपरावादी भारतीय समाजाला हा मोठा धक्का होता.

फोटो स्रोत, hkrdb.kar.nic.in
जवाहरलाल नेहरू यांची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी 'द स्कोप ऑफ हॅप्पीनेस' या नावानं त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे.
यात त्यांनी लिहिलं आहे, "श्री जिना यांच्या सर दिनशॉ या श्रीमंत पारशी व्यक्तीच्या मुलीशी झालेल्या विवाहामुळे संपूर्ण भारतात एकप्रकारचं आंदोलन उभं राहिलं. मी आणि रती जवळपास एकाच वयाच्या होतो. मात्र आम्हा दोघांचंही संगोपन वेगवेगळ्या पद्धतीनं झालं होतं."
"जिना त्यावेळेस भारतातील प्रसिद्ध वकील होते. या गोष्टी रतीला आवडायच्या. त्यामुळेच तिनं पारसी समुदाय आणि तिच्या वडिलांच्या इच्छेविरोधात जिना यांच्याशी विवाह केला."
रतीचं जिनांवरील प्रेम
'भारताच्या कोकिळा' या नावानं प्रसिद्ध असलेल्या सरोजिनी नायडू यांनी देखील डॉक्टर सय्यद महमूद यांना लिहिलेल्या पत्रात जिना यांच्या लग्नाचा उल्लेख केला होता.
त्यांनी लिहिलं होतं, "शेवटी जिना यांनी त्यांची लालसा पूर्ण केलीच. मला वाटतं की मुलीनं किती मोठा त्याग केला आहे याचा तिला अंदाज नाही. मात्र जिना त्याला पात्र आहेत. त्यांचं रतीवर प्रेम आहे. त्यांच्या आत्मकेंद्रित आणि अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा हा एक मानवी पैलू आहे."

फोटो स्रोत, KHWAJA RAZI HAIDAR
ख्वाजा रजी हैदर लिहितात की सरोजिनी नायडू देखील जिना यांच्या समर्थकांपैकी एक होत्या. 1916 च्या काँग्रेस अधिवेशनच्या वेळेस त्यांनी जिना यांच्यावर एक कविता देखील लिहिली होती.
जिना यांचे चरित्रकार हेक्टर बोलिथो यांनी त्यांच्या पुस्तकात एका वृद्ध पारशी महिलेचा उल्लेख केला आहे. या महिलेला वाटत होतं की सरोजिनी यांचं देखील जिना यांच्यावर प्रेम होतं. मात्र जिना यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. ते अलिप्तच राहिले.
जिनांवरील प्रेम
सरोजिनी नायडू मुंबईच्या कोकिळा किंवा नाइटिंगेल म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र त्यांच्या मधुर गायनाचा जिना यांच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
मी शीला रेड्डी यांना विचारलं की सरोजिनी नायडू यांचंदेखील जिनांवर प्रेम होतं का? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की नाही. मात्र सरोजिनींना जिनांबद्दल खूप आदर होता.
जिना यांचे आणखी एक चरित्रकार अजीज बेग यांनी रती आणि सरोजिनी नायडू यांच्या जिनावरील प्रेमाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात एक वेगळ्या मथळ्याखाली केला आहे. त्याला त्यांनी नाव दिलं आहे, 'टू विनसम विमेन.'

फोटो स्रोत, Douglas Miller/Getty Images
अजीज बेग लिहितात, एक फ्रेंच म्हण आहे की पुरुषांमुळे महिला एकमेकांचा द्वेष करतात. मात्र सरोजिनी यांना रती यांच्याबद्दल कोणतीही ईर्ष्या वाटत नव्हती. प्रत्यक्षात त्यांनी जिना यांना रतीशी विवाह करण्यास मदत केली.
1918 मध्ये जिना आणि रती यांच्या प्रफुल्लित आणि आनंदी चेहऱ्यांकडे पाहून वाटत होतं की जणूकाही ते एकमेकांसाठीच बनले आहेत.
जिना आणि रती
रतीच्या अंगावर लाल आणि सोनेरी, फिकट निळ्या किंवा गुलाबी रंगाचा पारदर्शक पोशाख सजलेला असायचा. ती सिगारेटच्या चांदी आणि संगमरवरी होल्डरमध्ये ठेवलेल्या इंग्रजी सिगारेटमधून धूर सोडत असे, तेव्हा तिचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसत असे.
तसंही, तिचे प्रत्येक हावभाव आणि तिचं उत्स्फूर्त हास्य यामुळे तिची उपस्थिती अधिक आनंदादायी होत असे.

फोटो स्रोत, Sheela Reddy
ख्वाजा रजी हैदर लिहितात, जेव्हा जिना आणि रती त्यांच्या मधुचंद्रासाठी महमूदाबादचे राजा अमीर अहमद खाँ यांच्या वडिलांच्या लखनौमधील महालात मुक्कामास होते, तेव्हा अमीर अहमद खाँ यांच वय साडे चार वर्षे होतं.
रतीनं पांढऱ्या रंगाची, सोनेरी आणि काळी बॉर्डर असलेली साडी नेसली होती. ती त्यांना एखाद्या परीसारखी दिसत होती. 1923 मध्ये जेव्हा जिना आणि रती दिल्लीतील मेंडेस हॉटेलमध्ये उतरले होते, तेव्हा राजा अमीर खाँ त्यांना पुन्हा भेटले होते. त्यावेळेस त्यांनी त्यांना खेळणी विकत घेण्यासाठी पाचशे रुपये दिले होते
रती आणि जिना यांचे मित्र कांजी द्वारका दास यांनी देखील त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे, "माझी नजर त्यांच्यावरून हटत नसे. मी तोपर्यंत त्यांच्या बग्गीकडे पाहत राहायचो, जोपर्यंत ती माझ्या डोळ्यासमोरून जात नसे."
गव्हर्नमेंट हाऊसमधील प्रसंग
ख्वाजा रजी हैदर, रती आणि जिना यांच्याबद्दलचा एक रंजक किस्सा सांगतात. एकदा मुंबईचे गव्हर्नर विलिंग्टन यांनी जिन्ना दांपत्याला भोजनाचं आमंत्रण दिलं. तिथे रती एक लो कट पोशाख परिधान करून गेली.
रती जेव्हा डायनिंग टेबलवर बसली, तेव्हा लेडी विलिंग्टन यांनी त्यांच्या एडीसी (मदतनीस) ला सांगितलं की त्यानं रतीसाठी एक शाल आणावी. रतीला बहुधा थंडी वाजत असावी.
ते ऐकताच जिना लगेच उठून उभे राहिले. ते म्हणाले, "जर श्रीमती जिना यांना थंडी वाजली तर त्या शाल मागून घेतील."
या गोष्टीचा निषेध म्हणून ते पत्नीसह डायनिंग हॉलमधून बाहेर गेले. त्यानंतर विलिंग्टन गव्हर्नर असेपर्यंत जिना कधीही गव्हर्नमेंट हाऊसमध्ये गेले नाहीत.
रतीदेखील स्वभावानं फटकळ होती. शीला रेड्डी सांगतात, "1918 मध्ये लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी या दोघांना सिमल्यातील व्हॉईसरॉय लॉजमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. त्यावेळेस तिनं हात जोडून भारतीय पद्धतीनं व्हॉईसरॉय यांना अभिवादन केलं."
रेड्डी सांगतात की चेम्सफोर्ड यांनी रतीला सल्ला दिला की 'जर तुला आपल्या पतीची राजकीय कारकीर्द बहरलेली पाहायची असेल तर जसं रोममध्ये रोमन वागतात, तसं वाग.'
त्यावर रतीनं ताबडतोब उत्तर दिलं की 'एक्सलन्सी मी तसंच केलं जसं तुम्ही सांगत आहात. मी तुम्हाला भारतात भारतीय पद्धतीनं अभिवादन केलं!' असं शीला रेड्डी त्यांच्या पुस्तकात लिहितात.
दोघांमधील दरी
ख्वाजा रजी हैदर सांगतात की आणखी एका प्रसंगी रती एका भोजनासाठी व्हॉईसरॉय लॉर्ड रेडिंग यांच्या शेजारी बसली होती.
बोलण्यात जर्मनीचा विषय निघाला, तर लॉर्ड रेडिंग म्हणाले की मला जर्मनीत जायचं आहे. मात्र युद्धानंतर आता जर्मन लोकांना आम्ही ब्रिटिश लोक आवडत नाहीत...त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही. त्यावर रतीनं लगेचच उत्तर दिलं की 'मग तुम्ही भारतात कशाला आलात ?' (भारतातील लोकांना देखील तुम्ही आवडत नाहीत)

फोटो स्रोत, photodivision.gov.in
जिना कामात व्यग्र होत गेले आणि दोघांच्या वयातील फरक, यामुळे हळूहळू जिना आणि रती यांच्यात दरी निर्माण होत गेली. जिना यांच्याकडे त्यांच्या तरुण पत्नी आणि तान्ह्या मुलीसाठी वेळ नव्हता.
जिना यांचे सचिव राहिलेले आणि नंतर भारताचे परराष्ट्र मंत्री झालेले एम सी छागला लिहितात की मी आणि जिना जेव्हा एखाद्या कायदेशीर बाबीवर चर्चा करत असू, तेव्हा रती जरा जास्तच नटून यायच्या आणि जिनाच्या टेबलावर बसून त्यांचा पाय हलवू लागायच्या. जिना कधी चर्चा संपवतील आणि त्यांच्याबरोबर बाहेर जातील याची त्या वाट पाहायच्या.
जिनांनी रतीला दिलेलं उत्तर
जिना यांच्या तोंडून नाराजीचा एक शब्ददेखील बाहेर पडायचा नाही. ते त्यांचं काम अशाप्रकारे करत राहायचे, जणूकाही रती तिथं उपस्थितच नाही.
छागला यांनी 'रोझेझ इन डिसेंबर' हे आत्मचरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला आहे.
"एकदा रती मुंबईतील टाऊन हॉलमध्ये जिना यांच्या आलिशान लांब गाडीतून आल्या. जेव्हा त्या कारमधून बाहेर पडल्या, तेव्हा त्यांच्या हातात एक टिफिन बास्केट होतं."
"पायऱ्या चढताना त्या म्हणाल्या, 'जे' (त्या जिना यांना याच नावानं हाक मारायच्या) सांगा बरं, मी तुमच्यासाठी लंचमध्ये काय आणलं आहे. त्यावर जिनांनी उत्तर दिलं की मला काय माहीत, तू काय आणलं आहेस. यावर रकी म्हणाल्या की तुमचं आवडतं हॅम सँडविच आणलं आहे."
"त्यावर जिना म्हणाले, माय गॉड हे तू काय केलंस? मी निवडणूक हरावं असं तुला वाटतं का? तुला माहीत नाही का की मी मुस्लिमांसाठीच्या वेगळ्या जागेवरून निवडणूक लढवतो आहे? जर माझ्या मतदारांना माहीत झालं की मी लंचमध्ये हॅम (डुकराचं मांस) सँडविच खातो, तर मी जिंकण्याची काहीतरी आशा राहील का?"
"हे ऐकून रती यांचा चेहरा उतरला. त्यांनी लगेच टिफिन उचलला आणि त्या पटापट पायऱ्या उतरत परत निघून गेल्या."

फोटो स्रोत, www.npb.gov.pk
रजी हैदर यांना वाटतं की दोघांमध्ये दरी वाढण्याचं कारण राजकीयदेखील होतं. 1926 येईपर्यंत जिना यांचं भारतीय राजकारणातील स्थान पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. 1916 मध्ये जे त्यांचं महत्त्व होतं ते आता राहिलं नव्हतं. त्यांनी सांप्रदायिक राजकारणाची कास धरली होती. रतीदेखील आता आजारी पडू लागल्या होत्या.
रती यांचे शेवटचे दिवस
फ्रान्समधील आजारपणानंतर भारतात परतताना एसएस राजपूताना या जहाजातून रती यांनी जिना यांना पत्र लिहिलं होतं, "प्रिय माझ्यासाठी तू जे काही केलं, त्यासाठी धन्यवाद."
"मी तुमच्यावर जितकं प्रेम केलं, तितकं दुसऱ्या कोणत्याही पुरुषावर करण्यात आलं नसेल. तुम्ही माझी आठवण त्या फुलासारखी ठेवा जे तुम्ही तोडलं होतं, त्या फुलासारखी नाही, जे तुम्ही चुरगाळलं होतं."
20 फेब्रुवारी 1929 ला वयाच्या फक्त 29 व्या वर्षी रती जिना यांचं निधन झालं. त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांचे मित्र कांजी द्वारका दास त्यांच्यासोबत होते.
शीला रेड्डी सांगतात, कांजी लिहितात की "शेवटच्या दिवसांमध्ये रती खूप निराश होत्या. एकदा मी त्यांना सांगितलं की मी थोड्या वेळात येतो, त्यावर त्या अतिशय दुखद स्वरात म्हणाल्या, तोपर्यंत मी जर जिवंत राहिले तर...नंतर कांजी यांनी त्यांना भेटायला मुंबईत आलेल्या एका पाकिस्तानी पत्रकाराला सांगितलं की रती यांनी अधिक प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली होती."

फोटो स्रोत, KHWAJA RAZI HAIDER
रती यांची तब्येत बिघडल्याची बातमी जिना यांच्याकडे पोहोचली तेव्हा ते दिल्लीतील वेस्टर्न कोर्टमध्ये बसलेले होते. मुंबईहून एक ट्रंक कॉल त्यांच्यासाठी आला होता. पलीकडून त्यांचे सासरे दिनशॉ पेटिट बोलत होते.
गेल्या दहा वर्षांमध्ये ते दोघे पहिल्यांदाच एकमेकांशी बोलत होते. ती बातमी ऐकून जिना लगेच ट्रेननं मुंबईला निघाले होते.
रस्त्यातच त्यांना व्हॉईसरॉय आणि इतर मोठ्या व्यक्तींच्या तारा मिळण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांना माहित झालं की रतीचं निधन झालं आहे. मुंबईत स्टेशनवर उतरताच ते थेट कब्रस्तानात गेले. तिथे त्यांची वाट पाहण्यात येत होती.
शीला रेड्डी सांगतात, "रती यांच्या पार्थिव शरीराचं दफन करण्यात आल्यानंतर जिना यांना सांगण्यात आलं की सर्वात जवळचा नातेवाईक म्हणून त्यांनी कबरीवर माती टाकावी."
"ते ऐकून जिना यांना रडू कोसळलं होतं. जिना यांनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त करण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











