मोहम्मद अली जिनांनी आपल्या मुलीला म्हटलेलं की,'एकवेळ तू माझी मुलगी असशील पण मी तुझा पिता असणार नाही'

फोटो स्रोत, AFP
- Author, अकील अब्बास जाफरी
- Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी
15 नोव्हेंबर 1938 रोजी कायदेआझम मोहम्मद अली जिना यांची एकुलती एक कन्या दीना जिनाचं लग्न झालं. तेही नवल वाडिया या पारशी वंशाच्या ख्रिश्चन तरुणाशी.
जिना या लग्नामुळे खूश नव्हते असं म्हटलं जातं. हे लग्न होऊ नये म्हणून त्यांनी दीनाला रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण दीनाने लग्न केलं. ते लग्नाला उपस्थित नव्हते, मात्र आपल्या लेकीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी तिला पुष्पगुच्छ पाठवायलाही ते विसरले नाहीत. हा पुष्पगुच्छ आपल्या गाडीचा चालक अब्दुल यांच्यामार्फत पाठवला होता.
दीना जिना या मोहम्मद अली जिना यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. 1929 मध्ये, वयाच्या 10 व्या वर्षी त्यांच्या आईचं, रतनबाईंचं निधन झालं. त्यानंतर मोहम्मद अली जिना यांनी बहिण फातिमा जिना आणि दीना जिना यांच्यासोबत इंग्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ते तिघेही लंडनला गेले.
मोहम्मद अली जिना यांनी दीनाला कॉन्व्हेंटमध्ये घातलं, मात्र 1934 मध्ये त्यांना भारतात परतावं लागलं. ते परत येण्यापूर्वीच मुंबईतील मुस्लिमांनी त्यांना विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून दिलं होतं. त्यामुळे भारतात परतल्यावर ते राजकीय कामात गुंतले. त्यामुळे फातिमा जिना आणि मोहम्मद अली जिना यांना त्यांचा बराचसा वेळ दिल्लीत घालवला लागला.
1936 मध्ये त्यांनी दीनाला देखील भारतात परत बोलावले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांनी तिला तिच्या आजी आजोबांकडे सोडण्याचा निर्णय घेतला. दिनाला तिथं प्रेमळ वातावरण मिळाले पण ती पूर्णपणे इस्लामेतर वातावरणात वाढली.
सर दिनशॉ पेटिट आणि लेडी पेटिट हे दिनाचे आजी आजोबा होते. पारशी लोकांमध्ये त्यांचा खूप मान सन्मान होता. त्यांचं कुटुंब अतिशय उदारमतवादी होतं. दिना हळूहळू या वातावरणात रुळू लागली.
ती हळूहळू इस्लामपासून आणि त्याच्या चालीरीती आणि अगदी तिच्या वडिलांच्या तत्त्वांपासून दूर गेली. तिने नवल वाडिया या पारशी वंशाच्या ख्रिश्चन पुरुषाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कायदेआझम यांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते खूप काळजीत पडले. सुरुवातीला त्यांनी या लग्नाला विरोध केला. दीनाला समजावून सांगितलं, ओरडले, तिला तिच्या निर्णयावर पुन्हा विचार करायला सांगितला. त्यानंतर त्यांनी दीनाला इस्लामची तत्त्वे आणि त्यांचं महत्त्व सांगण्यासाठी प्रसिद्ध मुस्लीम नेते मौलाना शौकत अली यांना बोलवलं. सर्व प्रयत्न करूनही दीनाचे विचार बदलण्यात ते अपयशी ठरले.
कायदेआझम यांचे सहकारी जस्टिस एम. सी. छागला त्यांच्या 'रोजेस इन डिसेंबर' या आत्मचरित्रात लिहितात,
"जिना यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत दीनाला सांगितलं की भारतात लाखो मुस्लीम मुलं आहेत, तुला जो आवडेल त्याच्याशी तू लग्न कर. यावर वडिलांपेक्षा जास्त हुशार असलेली दीना म्हणाली, पप्पा! भारतात लाखो मुस्लीम मुली होत्या, तुम्ही त्यापैकी एकीशी लग्न का केलं नाही?"
अत्यंत शांत स्वरात जिनांनी निर्णय दिला
लग्नाला बराच काळ लोटल्यानंतर दीनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "पप्पांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि अतिशय शांत स्वरात उत्तर दिलं की, मुली, तुझ्या आईशी लग्न करायचं ठरल्यावर आम्ही तिच्या वडिलांकडे लग्नाची परवानगी मागितली होती. मी तुला लग्नासाठी आनंदाने परवानगी देईन पण अट एक आहे आणि ती म्हणजे तुझ्या भावी पतीने इस्लामचा स्वीकार करावा जेणेकरून तुझा विवाह इस्लामच्या रिवाजानुसार होईल. तेव्हा पप्पांनी मला वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली आणि सांगितलं की, धार्मिक श्रद्धेतील सामंजस्य वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी मदतीचं ठरतं."
'पप्पांनी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता अतिशय शांत स्वरात या सर्व गोष्टी सांगितल्या. पप्पांच्या प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ असतो हे मला चांगलंच माहीत होतं. मी मनात म्हटलं की हा माझ्या आयुष्यातील पहिला निर्णायक टप्पा आहे. मी पप्पांना वचन दिलं की माझ्या पतीने इस्लाम स्वीकारावा म्हणून मी प्रयत्न करीन आणि जर गरज पडली तर या संदर्भात पप्पांचं मार्गदर्शनही घेईन.
'मी वाडिया यांना लग्नापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारण्याबद्दल विचारलं असता त्यांनी स्पष्ट नकार दिला. आता माझ्यासमोर दोनच पर्याय होते, एकतर मी माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार वाडिया यांच्याशी लग्न करण्यास नकार देईन किंवा वाडिया यांच्याशी लग्न करून माझ्या वडिलांची नाराजी ओढवून घेईन. पण वडील हे वडीलच असतात, मी लग्न केलं तर काही दिवस, आठवडे किंवा जास्तीत जास्त काही महिने ते राग मनात धरतील. पण त्यांचा राग नंतर आपोआप निघून जाईल. म्हणून एके दिवशी मी पप्पांना माझा निर्णय कळवला.'
माझा निर्णय ऐकून पप्पा बर्फासारखे थंड पडले आणि मला म्हणाले, 'मुली, मला तुझ्याशिवाय दुसरी मुलं नाहीत हे तुला माहीत आहे. मी तुझ्यावर किती प्रेम करतो याची तू कल्पना करू शकत नाहीस. मला मुलगाही नाही. त्यामुळे तू माझ्या इच्छा-आकांक्षांचं केंद्र आहेस. पण आता तू वयात आली आहेस, मला तुझ्या निर्णयात अडसर बनायला आवडणार नाही. पण आता तू माझा निर्णय ऐक, जर तू मुस्लिमेतर व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच आहेस तर मुहम्मद शरियानुसार तुम्ही मुस्लीम राहू शकत नाही. तुम्हाला धर्मत्याग करावा लागेल. इस्लाम रक्ताच्या नात्याला मान्यता देत नाही, त्यामुळे एकवेळ तू माझी मुलगी असशील पण मी तुझा पिता असणार नाही. त्यामुळे तुझ्या या निर्णयानंतर माझ्या घराच्या चार भिंतीबाहेर पाऊल टाकताच तुझे आणि माझे सर्व संबंध संपतील.'
थोड्या वेळ शांत राहिल्यानंतर पप्पा जरा भावूक स्वरात म्हणाले, 'तुला तुझ्या निर्णयापासून रोखता येत असतं तर बरं झालं असतं. तुला माझ्या हृदयात डोकावता आलं असतं तर तुला माझी अवस्था कळली असती. पण इस्लामी नियमांसमोर मी स्वत: असहाय्य आहे.'
एवढं बोलून पप्पा मान खाली घालून त्यांच्या बेडरूममध्ये गेले.

फोटो स्रोत, National Archives Islamabad
'जेव्हा माझे वडील माझ्याशी हे बोलत होते, तेव्हा त्यांचे डोळे, त्यांचा चेहरा वेगळाच भासत होता '
कायदे-ए-आझम मोहम्मद अली जिना यांच्या बहुतेक चरित्रकारांनी लिहिलंय की, त्यांच्या मुलीच्या लग्नानंतर ते कधीच तिच्याशी बोलले नाहीत.
काही लेखकांनी असंही लिहिलंय की, जेव्हा जिना गंभीर आजारी पडले आणि ते जगतील अशी कोणतीच आशा दिसत नव्हती, तेव्हा दीनाने तिच्या वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण जिना यांनी तिला भेट नाकारली. अशा प्रकारे ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते दीनाला भेटले नाहीत. पण वस्तुस्थिती काही वेगळंच सांगते.
30 मे 1939 रोजी जिना यांनी त्यांचं मृत्युपत्र तयार केलं. या मृत्युपत्रातील पहिलं कलम होतं की हे माझं शेवटचं मृत्युपत्र आहे.
दुसऱ्या कलमात त्यांनी फातिमा जिना, सॉलिसिटर मुहम्मद अली चायवाला आणि नवाबजादा लियाकत अली खान यांना या मृत्युपत्राचे कार्यकारी आणि ट्रस्टी म्हणून नेमलं. या मृत्युपत्रातील 10 व्या कलमात स्पष्टपणे लिहिलं होतं की, "माझ्या पश्चात मी नेमलेल्या ट्रस्टींनी माझ्या कमाईतून येत असलेले उत्पन्न माझ्या मुलीला द्यावे. तिच्या पश्चात ही संपत्ती तिच्या मुलांमध्ये वाटून टाकावी."
कायदे-ए-आझम यांनी आपल्या मृत्यूपत्रात वारस म्हणून आपल्या मुलीचं नाव स्पष्टपणे लिहिलं होतं. पण एवढं असूनही त्यांनी आपल्या मुलीला भेटण्याचं टाळलं. दीनाने मात्र तिच्या वडिलांसोबतचं नातं पुन्हा नीट करण्याचा प्रयत्न केला.
एप्रिल 1941 मध्ये मद्रास मध्ये मुस्लीम लीगची वार्षिक सभा भरली होती. जिना या सभेचे अध्यक्ष होते. त्यावेळी ते आजारी पडले. ही बातमी कळताच दीनाने ताबडतोब आपल्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तार पाठवली.
त्यात लिहिलं होतं की, 'एम. ए. जिना, अध्यक्ष मुस्लिम लीग मद्रास, तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटते. दीनाबाईंचं खूप प्रेम.'
हा तार आजही पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय अभिलेखागार विभागात जतन करून ठेवण्यात आली आहे.
1943 च्या सुमारास दीना आणि त्यांचे पती नवल वाडिया विभक्त झाले. तोपर्यंत दीनाच्या पोटी डायना आणि नसली यांचा जन्म झाला होता. पतीपासून विभक्त झाल्यानंतर दीनाने आपल्या वडिलांशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले, पण ते पूर्वीसारखे नव्हते.

फोटो स्रोत, Yousaf Salahuddin
दीना त्यांच्या एका आठवणीत लिहितात,
'माझ्या वडिलांनी कायम भावना लपवल्या असतील तरीही ते प्रेमळ वडील होते. 1946 मध्ये मुंबईत त्यांची शेवटची भेट झाली. ते नवी दिल्लीहून आले होते, ते महत्वाच्या वाटाघाटींमध्ये व्यस्त होते. त्यांनी मला आणि माझ्या मुलांन चहासाठी बोलावलं. आम्हाला भेटून त्यांना खूप आनंद झाला. त्यावेळी माझी मुलगी डायना पाच वर्षांची आणि माझा मुलगा नसली दोन वर्षांचा होता. ते सतत मुलं आणि राजकारण यावरच बोलत होते. त्यांनी मला सांगितलं की, पाकिस्तान अपरिहार्य आहे. ते दिल्लीत खूप व्यस्त होते तरीही आमच्यासाठी भेटवस्तू खरेदी करायला विसरले नाहीत. जेव्हा आम्ही जाण्यासाठी निघालो तेव्हा ते नसलीला मिठी मारण्यासाठी खाली वाकले. त्याची राखाडी टोपी नसलीच्या हातात पडली. या टोपीला जिना टोपी असं नाव पडलं होतं. माझ्या वडिलांनी ती टोपी नसलीच्या डोक्यावर घातली आणि म्हणाले, माझ्या मुला! तुझ्या बाबतीत हे झालं. ही भेट मिळाल्याने नसलीला खूप आनंद झाला. मला ही घटना नेहमी लक्षात राहील कारण माझ्या वडिलांचं माझ्यावर आणि माझ्या मुलांवर असलेलं बिनशर्त प्रेम दिसलं.'
'माझ्या वडिलांवर टीका करणारे काहीजण म्हणतात, ते खूप गर्विष्ठ होते. ते चुकीचं आहे. ते माझ्यासारखे खूप अंतर्मुख आणि खाजगी स्वभावाचे होते. ते त्यांच्या तत्त्वांसाठी नेहमीच लढत राहिले. सार्वजनिक किंवा खाजगी जीवनात ते कधीही स्वतःशी किंवा इतरांशी खोटं बोलले नाहीत. लोक त्यांच्याबद्दल जेव्हा वाईट बोलतात तेव्हा मला खूप राग येतो. त्यांना कधी न भेटलेले लोक देखील त्यांच्याविषयी चुकीचं बोलतात.'
त्या पुढे लिहितात, 'या उपखंडात अनेक मुस्लीम नेते तयार झाले, पण माझ्या वडिलांशिवाय कोणीही त्यांना स्वतंत्र देश दिलेला नाही. जर पाकिस्तानच्या लोकांना माझ्या वडिलांचा अभिमान असेल तर त्यांचा अभिमान रास्त आहे. कारण जिना नसते तर पाकिस्तान नसता.'
पाकिस्तानची स्थापना होण्याआधी जिना आणि दीना यांच्यात नियमित पत्रव्यवहार व्हायचा. पाकिस्तान सरकारच्या इस्लामाबादमधील पुराभिलेख विभागाकडे अशी अनेक पत्र आहेत.
या पत्रांचा अभ्यास केल्यावर असं दिसून येतं की, दीनाला त्यांच्या वडिलांच्या राजकीय घडामोडींची माहिती तर होतीच, शिवाय त्यावर त्यांनी स्वतःचं मतही व्यक्त केलं होतं.
28 एप्रिल 1947 रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी, पाकिस्तानची मागणी तत्वतः मान्य झाली म्हणून जिनांचं अभिनंदन केलं होतं. त्याचप्रमाणे 2 जून 1947 रोजी सुरू झालेल्या आणि 5 जूनपर्यंत चाललेल्या पत्रव्यवहारात त्यांनी 3 जून 1947 रोजी जिनांनी ऑल इंडिया रेडिओवर दिलेल्या ऐतिहासिक भाषणावर आपलं मत व्यक्त केलं होतं.
या पत्रात दीना लिहितात, "मी तुमचं 3 जूनचं भाषण ऐकलं. मला वाटतं तुमचं भाषण उत्कृष्ट आणि प्रभावी होतं. तुम्हाला हवं ते सगळं मिळालं नसलं तरी जे मिळालं ते काँग्रेसच्या पचनी पडलेलं नाही. पाकिस्तानची मागणी मान्य झाल्यामुळे आणि दोन स्वतंत्र देशांच्या स्थापनेमुळे हिंदू खूप नाराज आहेत. मात्र तुमचे खरे काम पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सुरू होईल. मला माहीत आहे तुम्ही त्यात यशस्वी व्हाल."

फोटो स्रोत, Twitter
28 एप्रिल 1947 रोजी लिहिलेल्या पत्रात, दीना म्हणतात,
'मी असं ऐकलंय की तुम्ही मुंबईतील साऊथ कोर्ट दालमियांना दोन लाख रुपयांना विकलं आहे. ही चांगली किंमत आहे. घराच्या किमतीत फर्निचर आणि पुस्तकांचा देखील समावेश असल्याचं मी ऐकलंय. तसं असेल तर मला रतीची काही पुस्तकं हवी आहेत, विशेषतः बायरन, शेली आणि ऑस्कर वाइल्ड यांचे कवितासंग्रह पाठवावेत अशी माझी विनंती आहे. मला वाचनाची आवड आहे आणि मुंबईत चांगली पुस्तकं मिळणं खूप कठीण आहे हे तुम्हाला माहीत आहे.'
3 आणि 5 जूनच्या पत्रांमध्ये, दीना यांनी पुन्हा एकदा साऊथ कोर्टचा उल्लेख केला आहे.
त्या लिहितात, 'मला वाईट वाटतं की साऊथ कोर्टची विक्री करण्याची बातमी खोटी आहे. मी फोरम मासिकात याबद्दल वाचलं होतं. त्यांच्या मासिकात अशा खोट्या बातम्या छापल्या जातात हे मला माहीत नव्हतं.'
जिना यांच्या साऊथ कोर्ट या घरातील फर्निचर आणि वैयक्तिक सामान त्यांचे मित्र रजब अली भाई इब्राहिम बाटलीवाला यांनी त्यांच्या देखरेखीखाली पॅक केलं आणि ब्रिटीश भारतीय जहाज द्वारका आणि डमरा येथून कराचीला पाठवलं.
पाकिस्तानच्या स्थापनेनंतर दीना आपल्या मुलांसह मुंबईत राहिल्या. असं म्हटलं जातं की, जिना यांच्या आजारपणाची बातमी ऐकून दीना त्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाणार होत्या. पण जिना यांच्या वैयक्तिक सूचनेमुळे त्यांना व्हीसा देण्यात आला नाही.
11 सप्टेंबर 1948 रोजी कायद-ए-आझम मोहम्मद अली जिना यांचं निधन झालं. 12 सप्टेंबर 1948 रोजी सकाळी साडेआठ वाजता गव्हर्नर जनरलचे विमान खास भारतात आले आणि दीनाला सोबत घेऊन सायंकाळी साडेपाच वाजता कराचीला परतले. तोपर्यंत जिनांचा दफनविधी करण्यात आला नव्हता.
डेली जंग कराची या वृत्तपत्रात बातमी छापून आली होती की, 'कायद-ए-आझमची एकुलती एक मुलगी दीना वाडिया त्यांच्या दिवंगत वडिलांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईहून विशेष विमानाने कराचीत आल्या आहेत.'
त्याच बातमीत पुढे असंही म्हटलं होतं की, 'फातिमा जिना पहाटेपासून सतत रडत होत्या. त्यांनी पांढरे कपडे घातले होते आणि रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले होते. कायद-ए-आझम यांच्या मुलीच्या येण्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला असेल.
13 सप्टेंबर 1948 रोजी, कायदे-ए-आझम यांच्या दफनविधीच्या दुसऱ्या दिवशी फातिमा जिना आणि दिना वाडिया यांनी फ्लॅगस्टाफ हाऊसला भेट दिली. याचं बांधकाम जिनांनी केलेलं नव्हतं, किंवा ते कधी तिथे राहिलेही नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
गव्हर्नर जनरल हाऊसमध्ये वापरता येत नसलेल्या त्यांच्या वैयक्तिक वस्तू या इमारतीत ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये कार्पेट्स आणि फर्निचरचा समावेश होता. वाडिया फ्लॅगस्टाफ हाऊसच्या खोल्यांमध्ये गेल्यावर त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांना अनेक गोष्टी खरेदी केल्याची आठवण झाली.
जिनांनी त्या वस्तूंबद्दल सांगितलेले सगळे किस्से त्यांच्या लक्षात होते. पण त्यांना त्या वस्तू जवळपास 10 वर्ष पाहता आल्या नव्हत्या याचं दुःख होतं.
जिनांच्या मृत्यूनंतर जवळपास 55 वर्षांनी म्हणजेच 23 मार्च 2004 रोजी दीना वाडिया यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला भेट दिली. यावेळी त्या भारत - पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील शेवटचा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानात आल्या होत्या.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष शहरयार खान यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नसली वाडिया, सून आणि नातू नेस वाडिया आणि जहांगीर वाडिया होते. त्यांना पाकिस्तानमध्ये अधिकृत पाहुण्यांचा दर्जा देण्यात आला होता. त्यांच्या सन्मानार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
26 मार्च 2004 रोजी दीना वाडिया यांनी त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यांनी जवळपास 55 वर्षांनी आपल्या वडिलांच्या थडग्यावर पुष्पहार अर्पण केला होता. त्यांनी तिथे ठेवलेल्या प्रतिक्रिया पुस्तकात नोंद करताना लिहिलं, "आजचा दिवस माझ्यासाठी खूप दुःखद आणि अद्भुत आहे. कायदेआझम यांनी पाकिस्तानसाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते ईश्वर पूर्ण करो."
यावेळी त्यांनी त्यांच्या आजी फातिमा जिना यांच्या समाधीस्थळालाही भेट दिली. नंतर त्यांनी त्यांचा मुलगा आणि नातवांसोबत फ्लॅगस्टाफ हाऊस आणि वझीर मॅन्शनला भेट दिली.
राज्य अतिथीगृहात त्यांनी विविध मान्यवरांचीही भेट घेतली आणि सात तासांच्या मुक्कामानंतर त्या मुंबईकडे रवाना झाल्या.
2 नोव्हेंबर 2017 रोजी वयाच्या 98 व्या वर्षी दीना वाडिया यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन झालं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








