मोहम्मद अली जिनांच्या नावाने टॉवर भारतात का टॉवर उभारलाय आणि तो तोडण्याची मागणी का होतेय?

- Author, वडिशेट्टी शंकर
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
अनेकांना आश्चर्य वाटू शकतं की भारतात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाने स्मारक आहे. आंध्र प्रदेशच्या गुंटूर शहरात हा टॉवर आहे.
हा टॉवर उभा राहून आज 70 वर्षं झाली आहेत पण तरीही गुंटूर शहरातली ही वास्तू धार्मिक सलोख्याचं एक उदाहरण बनून उभी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या भागात राहणारे बहुतांश लोक मुस्लीम नाहीत. हा टॉवर शहरातल्या मुख्य आकर्षण केंद्रापैकी एक आहे.
गुंटूरमध्येच दुसरीकडे लाल बहादुर शास्त्रींच्या नावाने 'माया बाजार' आहे आणि इथे मुस्लीम व्यापाऱ्यांची दुकानं आहेत.
पण भारतात जिन्नांच्या नावाने स्मारक का उभं आहे? बीबीसीने हे शोधण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोहम्मद अली जिन्नांचं असलेलं योगदान सर्वश्रुत आहे. व्यवसायाने वकील असलेल्या जिन्नांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला पण नंतर काँग्रेसवर नाराज होऊन त्यांनी मुस्लीम लीगची स्थापना केली. या पक्षाद्वारे त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश बनवण्याची मोहीम चालवली.
1942 साली एस एम लालजन बाशा गुंटूरचे आमदार होते. त्यांनी युनायटेड मद्रास प्रेसिडन्सीत दोनदा गुंटूरचं प्रतिनिधित्व केलं होतं.
गुंटूरमधल्या लालपेटा भागाचं नाव एस एम लालजन पाशा यांच्या नावावरूनच पडलं आहे. लालजन बाशा यांनी स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा 'भारत छोडो' आंदोलन चालू होतं तेव्हा मोहम्मद अली जिन्ना यांची मोठी सभा आयोजित करण्याचा प्रयत्न केला होता. या सभेत मुख्य वक्ते जिन्ना असणार होते.

जिन्नांना आमंत्रित करायला गुंटूरचे प्रतिनिधी मुंबईत गेले होते. त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी भव्य तयारी सुरू झाली.
जिथे आज जिन्ना टॉवर आहे त्याच जागेवर गुंटूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांसोबत जिन्नांच्या बैठकीची तयारी केली गेली. पण शेवटच्या क्षणी जिन्नांनी सांगितलं की ते या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाहीत.
जिन्ना न आल्यामुळे या सभेत त्यांचे जवळचे सहकारी लियाकत अली खान सहभागी झाले. उपलब्ध असणाऱ्या रेकॉर्डनुसार यात कोंडा वेंकटापैया पंतुलु, काशीनाधुनी नागेश्वर राव, उन्नवा लक्ष्मीनारायण आणि कल्लुरी चंद्रमोळी यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला.
जिन्नांच्या सन्मानार्थ
लालजन बाशांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की जेव्हा जिन्ना गुंटूरला येतील अशी योजना बनली तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ या टॉवरची उभारणी झाली.

जियाउद्दीन गुंटूरचे माजी आमदार आहेत. काही काळापुर्वी मृत्यूमुखी पडलेले तेलगु देसम पक्षाचे नेते लालजन बाशा यांचे ते भाऊ आहेत. जियाउद्दीन म्हणतात की जिना टॉवर बांधण्यासाठी त्यांचे आजोबा एस एम लालजन बाशा यांनीच पुढाकार घेतला होता.
"माझे आजोबा मोहम्मद अली जिन्ना यांचे मित्र होते. 1941 साली सत्तनपल्लीच्या आसपास अनेक गावांमध्ये हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. त्यावेळी आमच्या आजोबांनी धार्मिक सलोखा राखण्यासोबतच जे लोक पोलीस केसमध्ये अडकले होते त्यांनाही भरपूर साथ दिली. "
जियाउद्दीन पुढे म्हणतात, "या प्रकरणी एक वकील म्हणून मोहम्मद अली जिन्ना यांची मदत घेतली गेली. या प्रकरणी स्थानिक कोर्टाने 14 लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती पण मुंबई हायकोर्टाने हा निर्णय रद्द केला. त्यामुळे जेव्हा जिन्ना गुंटूरला येणार असं ठरलं तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ एक टॉवर बांधण्याचं ठरलं."
त्यांच्यामते, "जिन्ना आंदोलनाच्या कामामुळे येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या नावाने या टॉवरचं उद्घाटन केलं गेलं. 1942 ते 1945 या काळात हा टॉवर बांधला गेला."
हा टॉवर पूर्ण झाल्यावर इथे जिन्ना सेंटर बनवलं गेलं. सध्या या सेंटरची चर्चा होतेय कारण याचं नाव बदलण्याची मागणी होतेय. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांचं नाव भारतातल्या सेंटरला नको अशी मागणी करणाऱ्यांचं म्हणणं आहे.
आधीही नाव बदलण्याची मागणी झाली होती
जिन्ना टॉवर सेंटर गुंटूरच्या व्यवसायाचं मुख्य केंद्र आहे. याचं नाव बदलावं अशी मागणी वेळोवेळी होत असते. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीमुळे भारताची फाळणी झाली त्या व्यक्तीचं नाव या टॉवरला नको.

गुंटूरमध्ये व्यवसायाने लेक्चरर असणारे एम सुरेश बाबू म्हणतात, "गुंटूर नगरपालिकेत अनेक वर्षांपूर्वी यासंबंधी निर्णय घेऊन या सेंटरचं नाव बदलण्यात आलं होतं. पण लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे हा निर्णय मागे घेतला गेला."
ते पुढे म्हणतात, "गुंटूर शहरात मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे. पण इथे कधी हिंदू-मुस्लीम एकतेला तडा गेला नाही. या शहरात अनेक रस्त्यांची आणि गल्ल्यांची नाव प्रसिद्ध मुस्लीम व्यक्तींच्या नावावर ठेवली आहेत. यातलंच एक जिन्ना टॉवर सेंटरही आहे. आजही हा टॉवर धार्मिक सलोख्याचं प्रतिक आहे. कारगिल युद्धाच्या वेळेस अनेक लोकांनी या नावावर आक्षेप घेतला होता."
पाकिस्तानातही आश्चर्य
मुस्लीम अॅक्शन जॉईंट कमिटीच्या मोहम्मद कलीम यांनी सांगितलं की ही बातमी ऐकून पाकिस्तानातही आश्चर्य व्यक्त केलं गेलं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात की जेव्हा मुशर्रफ भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी जिन्ना टॉवर बाबतीत विचारणा केली होती. "त्यावेळी खासदार असणाऱ्या लालजन बाशा (एस एम लालजन बाशा यांचे नातू) यांनी या टॉवरचे अनेक फोटो पाकिस्तान उच्चायोगात पाठवले होते. त्यांनी म्हटलं होतं की जिन्नांनी फाळणीच्या आधी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान दिलं होतं. त्यामुळे ते आजही महत्त्वाचे आहेत."
नगरपालिकेकडे जबाबदारी
गुंटूर शहराची नगरपालिका जिन्ना टॉवरची व्यवस्था बघते. नगरपालिकेने इथे सुशोभिकरणही केलं आहे. इथे कारंजं, बाग, प्रकाशव्यवस्था अशा सगळ्या सोयीसुविधा आहेत.

शहराच्या आयुक्त अनुराधा यांनी बीबीसीला सांगितलं की धार्मिक सलोख्याचं प्रतिक असलेल्या या टॉवरला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.
"जिन्ना टॉवर सेंटर 1945 पासून नगरपालिकेच्या अखत्यारित आहे. आमच्या दृष्टीने ही एक ऐतिहासिक इमारत आहे. अनेक लहान-मोठ्या समस्या आल्या तरी आम्ही या टॉवरचं संरक्षण करण्यावर भर देत आहोत. गुंटूरमध्ये ही इमारत एक लँडमार्क म्हणून उभी आहे."
जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात 20 टक्के लोक मुस्लीम आहेत. इथे फक्त मोहम्मद अली जिनांच्या नावाचा टॉवर नाही तर जिन्ना सेंटर या शहराचं मुख्य व्यावसायिक केंद्र आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








