सोशल मीडियावर मुस्लीम आणि महिलांविरुद्ध द्वेष कसा पसरवला जात आहे?- बीबीसी रिपोर्ट

- Author, दिव्या आर्य, विनीत खरे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्या वर्षी 13 मे रोजी काही ट्विटर अकाऊंट्सचं लक्ष 'लिबरल डोजे' नावाच्या युट्यूब चॅनेलवर गेलं. ईद साजरी करणाऱ्या पाकिस्तानी मुलींच्या फोटो तसंच व्हीडिओवर आक्षेपार्ह शब्दात शेरेबाजी टिप्पणी केली जात होती.
त्या लाईव्हस्ट्रीमचा मथळा असा होता- पाकिस्तानी गर्ल्स रिव्ह्यू: आज अपनी ठरक भरी आंखो से लडकियां ताडेंगे. बातम्यांनुसार या चॅनेलवरच्या व्हीडिओंमध्ये मुसलमानांविरोधात द्वेष ठासून भरला होता. या चॅनेलला युट्यूबवरून हटवण्यात आलं आहे.
13 मे रोजी लाईव्हस्ट्रीम मध्ये या मुलींबद्दल अश्लील शब्दात शेरेबाजी करण्यात आली. त्यांना शिव्याही देण्यात आल्या. अंबरीन नावाच्या पाकिस्तानच्या महिलेने लाईव्हस्ट्रीम संदर्भात ट्वीट करून म्हटलं की, "पाकिस्तानमधली प्रत्येक मुलगी सोशल मीडियावरून फोटो काढून टाकते आहे. त्यांना अतिशय असुरक्षित वाटतं. त्या घाबरल्या आहेत".
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या लाईव्ह स्ट्रीमध्ये पाकिस्तानच्या 40हून अधिक मुलींचे फोटो त्यांची परवानगी न घेताच टाकण्यात आले होते. साधारण 500 माणसं ते लाईव्हस्ट्रीम पाहत होते आणि त्या मुलींना 1 ते 10 असं गुणांकन देत होते. या लाईव्हस्ट्रीम करण्यामागे डोकं होतं दिल्लीस्थित 23 वर्षीय रितेश झा आणि केशू नावाच्या एका मुलाचं.
लाईव्हस्ट्रीम प्रकारानंतर आठ महिन्यानंतर बीबीसीशी बोलताना रितेशने सांगितलं की, "माझ्या डोक्यात द्वेष भरला होता. सोशल मीडियावर- इन्स्टाग्राम, रेडीट, टेलिग्राम इथे सगळीकडे मुस्लीम हँडल्सवर हिंदू मुलींचे मॉर्फ केलेले फोटो पाहिले. मला असं वाटलं मी बदला घ्यायला हवा. मी चुकलो होतो. 'मी चुकलो, मला माफ करा' असा एक व्हीडिओही मी शेअर केला".
रितेश झा याचा सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई अप बनवणाऱ्या लोकांशी संपर्कही आला नाही. पण एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित होऊन टोकाचं वागणारे तरुण इंटरनेटवरचं पर्यायी जग समोर आणतात.
मुसलमानांविरोधात द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियावरच्या अप्लीकेशन्सचा वापर करण्यात येत आहे. मुसलमान महिलांचे फोटो ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्याकरता सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई अप तयार करण्यात आलं. पाकिस्तानमधल्या मुलींचे फोटो युट्यूबवर टाकण्यापासून क्लबहाऊस अॅपवर मुसलमान मुलींच्या शरीरावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी.
आम्हाला हे लक्षात आलं की फक्त मुसलमान महिला यामध्ये लक्ष्य होत नाहीयेत. हिंदू महिलांच्या फोटोंना दुसऱ्याच नग्न फोटोंवर मॉर्फ करून त्यांचं शोषण केलं जात आहे. त्यांना बलात्काराच्या धमक्या दिल्या जात आहेत. दलितांना कमी लेखलं जात आहे. त्यांना मिळणारी अस्पृश्यतेची वागणूक योग्य असल्याचं ठसवलं जात आहे.
उजव्या विचारांच्या कट्टरतावादी जगाच्या पडताळणीत आम्ही अशा लोकांशी बोललो ज्यांनी हे विश्व उभं केलं, याद्वारे अनेक लोकांना संपर्कात आणलं.
सुरुवातीचा प्रभाव
2013-14च्या काळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात उजव्या विचारसरणीच्या विचारांचं प्राबल्य पाहायला मिळालं. रितेशने सांगितंल की त्याच काळात त्याला मोबाईल मिळाला. तेव्हा तो नववीत होता.
"अभ्यासात फारसं लक्ष लागत नसे. रितेश आठवून सांगतो, सोशल मीडियावर मीम्स येत असत. नेत्यांची भाषणं ऐकत असे. हिंदू खतरे में (हिंदू धोक्यात आहेत), वो एक मारे, तुम दस मारना (त्यांनी एकाला मारलं, तुम्ही दहांना मारा), दिवसरात्र हिंदू-मुस्लीम यातच वेढलेला असे. इंटरनेटवर पाकिस्तानच्या लोकांशी भांडत असे.
तुम्हाला कळतही नाही की तुम्ही कधी धर्मांध झालात ते. तुमच्या शरीरात, मेंदूत द्वेष भरून राहतो. धर्मामुळे तुम्हाला कमी लेखलं जात आहे, असं वाटत राहतं. भेदभाव होतोय असं वाटतं. ऑनलाईन असो की ऑफलाईन- तुमच्या डोक्यात सतत हिंसक विचारच येत असतात".

रितेश यांनी यासगळ्याचं प्रशिक्षण घेतलं. युट्यूबवर 15-20 चॅनेल्स तयार केले. अल्पावधीत त्याचे सबस्क्रायबर्स लाखांच्या घरात गेले. रितेशला यातून पैसाही मिळू लागला. याआधी तो हलाला प्रथा, बुरखा परिधान करणं, मुसलमानांनी खूप सारी मुलं जन्माला घालणं यावर बोलत असे.
डार्क ह्यूमरला त्यांनी 'लिबरल डोजे' असं नाव दिलं. रिपोर्ट केल्यामुळे रितेशने तयार केलेले चॅनेल्स युट्यूबवरून हटवण्यात आले आहेत.
रितेशने आता नवीन चॅनेल सुरू केले आहेत. या चॅनेलची भाषा बंद करण्यात आलेल्या चॅनेल्ससारखीच आहे. मुसलमानांविरोधात बोलणं हाच चॅनेलचा प्रमुख उद्देश आहे. काही लोकांनी हे चॅनेल्स रिपोर्ट केले आहेत.
व्हीडिओच्या सुरुवातीला राज्यघटनेतील बोलण्याच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केला जातो. व्हीडिओ युट्यूब कम्युनिटी गाईडलाईन्सचं पालन करत असल्याचंही सांगितलं जातं.
हा डार्क ह्यूमर असल्याचं रितेश सांगतो. पाकिस्तानातील मुलींचं लाईव्हस्ट्रीमिंग हे इन्स्टाग्राम रील्ससारखं होतं. कोण तरुण मुलं हे व्हीडिओ तयार करत आहेत?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई अप बनवल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेली श्वेता सिंह 18 वर्षांची आहे. विशाल झा, मयांक रावत, नीरज बिश्नोई 21 वर्षांचे आहेत. ओंकारेश्वर ठाकूर 20 तर नीरज सिंह 28 वर्षांचा आहे.
क्लबहाऊसप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला यश पराशरचं वय 22 आहे, तर जैश्नव कक्करचं वय आहे 21. आकाश तर फक्त 19 वर्षांचा आहे.
मुंबई पोलीस विभागात सायबर सेलची स्थापना करणाऱ्यांपैकी विशेष आयजी ब्रिजेश सिंह सांगतात की," इंटरनेटमुळे आपल्याला पकडलं जाणार नाही असं या मुलांना वाटतं. यामुळे माणुसकी कमी कमी होत जाते. या मुलांच्या मनात हिंसेचं भयंकर रुप आकाराला येतं.
अँटी फॉरेन्सिक तंत्र वापरून याप्रकरणातील दोषींना पकडलं जाऊ शकतं. पण ही मुलं व्हीपीएन, टोर, व्हर्च्युअल मशीन, एन्क्रिप्शन या गोष्टींचा वापर करतात".
ओंकारेश्वर ठाकूरच्या अटकेवेळी दिल्ली पोलीसमधील डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितलं की, ट्वीटरवर मुस्लीम महिलांना ट्रोल करणाऱ्या ट्रेड्स ग्रुपचा तो सदस्य होता.
उजव्या विचारसरणीचे ट्रेड्स
भाजप सत्तेत आल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या गटांमध्ये वाढ झाली आहे असं मानलं जातं. उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये ट्रेड्स आणि रायता असे दोन गट असल्याचं सर्वसामान्य माणसांना कळलं.
ट्रॅडिशनलिस्टचं आद्याक्षर ट्रेड्स आहे. कर्मठ विचारसरणी मानणारे लोक असा याचा शब्दश: अर्थ. सतीप्रथा, बालविवाह, पदर डोक्यावरून घेणं योग्य मानतात, जातिव्यवस्थेत ब्राह्मण सर्वोच्च स्थानी आहे असं मानतात. ही मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक असतीलच असं नाही. महिलांनी घरीच राहावं आणि त्यांनी बाहेर पडून काम करू नये असं या लोकांना वाटतं.
बुल्ली बाई आणि सुल्ली डील्सची पीडिता सानिया सय्यद यांनी ट्रेड्सबद्दल सांगितलं की, "एखाद-दुसरा व्यक्ती नाहीये. अशी बरीच माणसं आहेत. 20-23 वयोगटातली ही मुलं आहेत. त्यांना असं वाटतं की, एक सर्वोच्च नेता असावा. ते लिन्चिंगचं कौतुक करतात. जातिव्यवस्थेवर विश्वास ठेवतात. मुसलमान राहायला नकोत आणि ख्रिश्चनही".
ट्वीटरवर एचआर नावाचं हँडल असलेल्या माणसाने ट्रेड असल्याचं सांगितलं. प्रत्यक्षात तो स्वत: दलित समाजाचा आहे.

खरी ओळख लपवण्याचा त्यांनी आग्रह केला. खरं नाव समोर आलं तर वैयक्तिक माहिती जगजाहीर केली जाईल अशी भीती त्यांना दाखवण्यात आली आहे.
2020 वर्षाच्या सुरुवातीला त्यांना ट्रेड्स ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आलं. सोशल मीडियावर मुसलमानांशी चांगल्या पद्धतीने तू वाद घालू शकतोस असं मला सांगण्यात आलं. ग्रुपचा उद्देश हिंदू धर्माबाबत योग्य माहिती पोहोचवणं हा आहे असं सांगण्यात आलं. एचआर तेव्हापासून त्या ग्रुपशी निगडीत आहे.
"मी हिंदू धर्मातील प्राचीन परंपरा मानत असे. सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता हे सगळं योग्य आहे असं मानत असे. या इतिहासाचा मला अभिमान वाटत असे. म्हणून मी ग्रुपशी जोडला गेलो.
14-15 वर्षांच्या हिंदू तरुणांशी संपर्क वाढव असं एचआरला सांगण्यात आलं. ग्रंथातील गोष्टी सांगण्यात येत असल्या तरी ग्रुपमध्ये द्वेष पसरवणं आणि हिंसक वागण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे असं त्याच्या लक्षात आलं आहे. दलितांना हिंदू न मानणं, हिंदू राष्ट्रासाठी मुसलमान महिलांवर बलात्काराची भाषा, मुलांची हत्या योग्य असल्याचं सांगणं, जातिसाठी ऑनर किलिंग, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना धमकावणं अशा गोष्टी केल्या जातात".
एचआरच्या मते शोषणाची पातळी एवढी खालची होती की, काही पीडित मुलींनी जीव देण्याचा प्रयत्न केला. ट्रेड्स विचारधारेचं समर्थन करणारे फक्त मुलं नाहीत. यामध्ये मुलींचाही समावेश आहे. पदर डोक्यावरून घेणं त्यांना योग्य वाटतं. करवाचौथ व्रत करणाऱ्या पुरुषांना ट्रोल करून त्या 'नामर्द' म्हणतात.
एचआरने ग्रुपमध्ये स्वत:ची जात सांगितली नाही. पण दिवसेंदिवस त्याच्यासाठी हे सहन करणं अवघड होऊन गेलं. मी त्यांना समजावत असे पण ते कुणाचंच ऐकत नाहीत. कधी कधी वाटतं त्यांच्याकडे मनच नाही. ते सांगत असत की असा पुरुष हो ज्याला कोणत्याही गोष्टीने फरक पडत नाही. स्वत:ची बाजू पटवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. पण मला कोणालाही मारायचं नव्हतं.
ती माणसं लिन्चिंगचे फोटो शेअर करत असत. मोहल्ल्यातल्या मुसलमान मुलाला असा मारला याचा डिडिंम पीटत असत. अखेर एचआरने ट्रेड ग्रुप सोडला. त्याच्यासारख्या विचारांच्या लोकांना एकत्र घेऊन ट्रेड्सचं काम रोखण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
ट्रेड्सशी उजव्या विचारसरणीशी फारकत- रायता
उजव्या विचारसरणीच्याच मात्र आपल्या विचारांपासून फारकत घेतलेल्या व्यक्तींना 'रायता' असं संबोधण्यात येऊ लागलं.
मोना शर्मा हिंदू आहेत. उजव्या विचारसरणीच्या आहेत, 'रायता' या परिभाषेत मोडतात. पण त्यांना हा शब्द अपमानकारक वाटतो. ट्रेड्स आणि रायता यातला फरक मोना सांगतात.
त्या म्हणतात, "रायता शब्द म्हणजे भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उजवी विचारसरणी, हिंदुत्व याचे समर्थक. अशी माणसं जी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांना पसंत करतात. ट्रेड्सच्या तुलनेत रायता विचारसरणीची माणसं कायद्याच्या चौकटीत राहून पसरवतात".
पुरोगामी विचारांमुळे ट्रेड्सने त्यांना लक्ष्य केलं. त्यांना उद्देशून 'रंडी' शब्द वापरण्यात आला. त्यांच्या पतीची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्यात आली.

इस्लामिक कट्टरतावादावर त्या स्वत: डाव्या विचारसरणीच्या लोकांशी वाद घालतात, त्यांचं ट्रोलिंगही करतात. पण ट्रेड्स त्याहून अधिक धोकादायक असल्याचं त्यांना वाटतं.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "त्यांचे विचार तालिबानसारखेच आहेत. महिलांनी घरी राहावं. मुलं जन्माला घालावीत. जास्त शिकू नये, प्रेमविवाह करू नये. ही मंडळी ताकदवान झाली, तर न्यायाव्यवस्था संपुष्टात येईल. महिलांचं आयुष्य मध्ययुगीन कालखंडाप्रमाणे होईल".
मोना यांच्या मते 2020मध्ये कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन लागला त्यावेळी ट्रेड्स अकाऊंट मोठ्या प्रमाणावर अक्टिव्ह झाले.
मोना सांगतात, "सुरुवातीला हे भाजप समर्थक वाटले. इस्लाम, दंगल आणि दहशतवादावर बोलतील असं वाटलेलं. पण जसं मी उजव्या विचारसरणीच्या महिलांसाठीच्या कर्मठ परंपरांवर बोलायला सुरुवात केली तर त्यांनी मलाच लक्ष्य केलं.
मद्यपान करणाऱ्या, आधुनिक कपडे परिधान करणाऱ्या, शिकल्यासवरलेल्या महिला त्यांना सहन होत नाहीत. आम्ही त्यांच्यासाठी पूर्ण हिंदूही नाहीत. कारण आम्ही दलित आणि मुसलमानांविरोधात हिंसेचा प्रचार करत नाही".
मोना यांच्या मते ट्रेड्सना पंतप्रधान मोदीही आवडत नाहीत. हिंदू राष्ट्र तयार करण्यासाठी ते योग्य नाहीत असं मानतात. त्यांना 'मौलाना मोदी' असं संबोधतात.
उजव्या विचारसरणीसंदर्भात लेख लिहिणारे स्तंभलेखक अभिषेक बॅनर्जी स्वत:ला रायता मानतात. उजव्या विचारसरणीच्या विविध गटातटांची तुलना त्यांनी डाव्या विचासरणीतील गटांशी केली आहे.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "उजव्या विचारसरणीचं हे विभाजन खूप आधीपासून आहे. उजव्या विचारसरणीचं सरकार सत्तेत असल्यामुळे आता त्याची चर्चा सुरू आहे. राजकारणात याचा परिणाम पाहायला मिळतो आणि सर्वसामान्य माणसांमध्येही ते लोकप्रिय होत आहे".
ट्रेड्स आणि रायता यांच्याबरोबरीने युनियनिस्ट आणि ब्लॅक पिलर्स नावाचे विचारप्रवाह या विचारधारांमध्ये आहेत.

युनियनिस्ट म्हणवणाऱ्या एका माणसाने सांगितलं की, तो दलितांना अशुद्ध मानतो आणि त्यांना या जगातून नाहीसं करायला हवं असं त्याने सांगितलं.
ब्लॅक पिलर्स विचारसरणीच्या लोकांना भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही असं वाटतं. या समस्येचं मूळ सेक्युलर लोकशाहीत आहे असं त्यांना वाटतं.
प्रसारमाध्यमांमध्ये ट्रेड्स आणि रायता यांच्याबद्दल लिहून येऊ लागलं, बुल्ली बाई आणि सुल्ली डील्ससंदर्भात चौकशी सुरू झाली, अटकसत्र सुरू झालं तेव्हापासून अनेकांचा सूर बदलला आहे. काहींनी अकाऊंद बंद केलं आहे, तर काही भूमिगत झाले आहेत.
पुढचा मार्ग
सुल्ली डील्सप्रकरणी आतापर्यंत 6जणांना अटक करण्यात आली आहे. पण ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्यूब, रेडिट, टेलिग्राम यांच्या माध्यमातून द्वेष पसरवला जातोच आहे.
मुंबई पोलीस डीसीपी सायबर क्राईम रश्मी करंदीकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "तपास सुरू आहे आणि लवकरच गोष्टी स्पष्ट होतील".
विदेशी सोशल मीडिया कंपन्यांकडून सहकार्य मिळत नसल्याने तपासाची गती मंदावते असं पोलिसांचं म्हणणं आहे.
मुंबई पोलीसमध्ये विशेष आयजीपदी कार्यरत ब्रिजेश सिंह सांगतात, "माहितीसाठी आम्ही सोशल मीडिया कंपन्यांशी संपर्क करतो तेव्हा त्यांचं उत्तर असतं की आम्ही अमेरिकेच्या कायद्याचं पालन करू. गुन्हा घडला आहे की नाही यानंतरच माहिती देणार की नाही ते ठरवू असा त्यांचा पवित्रा असतो.
सुल्ली डील्स आणि बुल्ली बाई अपसंदर्भात अटक झाली आहे. या अॅप्स ट्रॅक करणं सोपं नाही असं पोलिसांनी सांगितलं.
"अॅप स्टोअरमधून हे कळू शकतं की ते कोणी तयार केलं आहे. त्यामुळे तपास सुकर होऊ शकतो. पण एका विशिष्टधारेची माणसं सोशल मीडियावर काम करतात तेव्हा त्यांची माहिती त्याच ठराविक प्लॅटफॉर्म्सवर असते. प्लॅटफॉर्म त्यांचं डिव्हाईस, मॉडेल नंबर, ऑपरेटिंग सिस्टम, लोकेशन. व्हीपीन या टोरचा वापर करत आहेत किंवा बॉट म्हणजे यंत्रासारखं वागत आहेत हे सगळं सांगू शकतात पण ते सांगत नाहीत".
"कायद्याच्या यंत्रणेकडे एवढ्या सोयीसुविधा नाहीत की ते लाखो अकाऊंट्स मॉनिटर करू शकतील. पोलिसांकडे तक्रार आली तरच ते माग काढू शकतात".
ट्रेड्स हँडल्स लोकप्रिय का आहेत याबाबत काही हँडल्सनी सांगितलं की, उजव्या विचारसरणीच्या दुसऱ्या हँडल्सनी याची नक्कल केली नाही, द्वेषमूलक गोष्टींचा निषेध न करणं, मौन बाळगल्यामुळे समर्थन देणं यामुळे लोकप्रियता वाढली आहे.
स्तंभलेखक अभिषेक बॅनर्जी यांना तसं वाटत नाही. ते सांगतात, "मी कोणत्याही मोठ्या हँडलने ट्रेड्सला प्रोत्साहन दिल्याचं पाहिलेलं नाही. हा एक दृष्टिकोन आहे, दोषारोप करणं योग्य नाही".
हे ग्रुप्स संपुष्टात आणले जाऊ शकत नाहीत. कायद्याच्या चौकटीतून त्यांचं नियंत्रण केलं जाऊ शकतं असं अभिषेक यांना वाटतं.
युट्यूबर रितेश झा स्वत:ला पीडित मानतात. पाकिस्तानी मुलींचे फोटो लाईव्हस्ट्रीमिंग केल्यानंतर ते टीकेच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर रितेशला एकाकी वाटू लागलं.
रितेश सांगतो की लोकांनी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. त्यांची नोकरीही गेली आहे. मला कळलंय की याचा काहीही फायदा होत नाही. निरपराध माणसांचाही यात काही फायदा नाही. या सगळ्याच्या मागे राहून छुपा अजेंडा चालवणाऱ्यांचा फायदा होतो. आपला तर वापर केला जातो.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








