Facebook-Instagram : फोटो लीक झाल्यानं मुलीची आत्महत्या, आईनं फेसबुक-इन्स्टाग्रामला कोर्टात खेचलं

फेसबुक, इन्स्टाग्राम

फोटो स्रोत, Getty Images

मुलीच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचा आरोप करत आईने सोशल मीडिया कंपन्यांवर खटला भरल्याचं प्रकरण अमेरिकेत समोर आलं आहे.

एनफिल्ड भागातील सेलेना रॉड्रिग्ज या मुलीने गेल्या वर्षी आत्महत्या केली. इन्स्टाग्रामवरच्या धोकादायक फीचर्समुळे मुलीने आत्महत्या केल्याचा दावा आईने केला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने इन्स्टाग्रामची मालकी असलेल्या मेटा आणि स्नॅप इन्क कंपन्यांवर खटला दाखल केला आहे.

सोशल मीडियाचा लहान मुलांवर होणारा परिणाम हा संवेदनशील विषय यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

सेलेनाच्या आईच्या वतीने सोशल मीडिया व्हिक्टिम्स लॉ सेंटरने कॅलिफोर्नियात खटला भरला. ही मुलगी इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट हे दोन अॅप्स मोठ्या प्रमाणावर वापरायची. तिच्या आईने मुलीकडून फोन घेतला. सोशल मीडियापासून मुलीने दूर असावं असं त्यांना वाटत होतं.

एखाद्या व्यसनाप्रमाणे तिला हे अॅप्स वापरण्याची सवय लागली होती. मानसिक आरोग्याकरता तिच्यावर उपचारदेखील सुरू होते. सेलेनाइतकं सोशल मीडियाचं अॅडिक्शन पाहिलं नाही असं एका थेरपिस्टने सांगितल्याचं तिच्या आईने म्हटलं आहे.

21 जुलै 2021 या दिवशी सेलेनाने आत्महत्या केली. त्याआधी काही महिने तिला निद्राविकाराचा तसंच नैराश्याचा त्रास होत होता. कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे सेलेना दिवसाचा बराच वेळ सोशल मीडियावरच असे.

लैंगिक भावना चाळवणारं कंटेट ती पाहत असे आणि शेअरही करत असे असं कंपनीविरुद्धच्या खटल्यात म्हटलं आहे.

तिचे काही फोटो लीक झाले आणि तिच्या वर्गातील मुलांनी शेअर केले. यामुळे तिची मानसिक अवस्था आणखीनच खालावली. या विचारातूनच ती आत्महत्येसाठी प्रवृत्त झाली.

सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडियाचा वाढता वापर

अल्पवयीन मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचेल, अशा पद्धतीचा मजूकर बलाढ्य सोशल मीडिया कंपन्यांकडून जाणीवपूर्वक आणि हेतूपुरस्सर टाकला जात असल्याचं कंपनीविरुद्ध करण्यात आलेल्या खटल्यात म्हटलं आहे.

सेलेनाच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला आहे असं स्नॅप कंपनीच्या प्रवक्त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं मात्र या खटल्याबाबत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

"आमच्या युझर्सचं आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पारंपरिक सोशल मीडिया व्यासपीठांच्या तुलनेत कोणत्याही सामाजिक दबाबाविना आम्ही युझर्सना मित्रमैत्रिणी मिळवून देतो", असं स्नॅप कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं.

"लहान मुलामुलींना या अपच्या माध्यमातून अनोळखी लोकांना गाठू नये यासाठी आम्ही कठोर उपाययोजना केल्या आहेत. मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थांशी बोलून आम्ही अपच्या अंतर्गत युझर्सना काय मदत पुरवता येईल यावर काम करत आहोत", असंही त्याने सांगितलं.

सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, लहान मुलंमुली सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत.

मेटा या फेसबुकच्या पालक कंपनीने या खटल्यासंदर्भात भाष्य केलेलं नाही.

सोशल मीडियाचा लहान मुलांच्या मनावर होणाऱ्या परिणामासंदर्भात अमेरिकेतील न्यायकर्ते आणि सर्वसामान्य जनता चिंतातूर असतानाच हा खटला समोर आला आहे.

फेसबुकसाठी काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने सांगितलं की, "कंपनी लहान मुलांच्या मानसिक आरोग्याला इजा पोहोचवत आहे. मात्र प्रचंड नफा होत असल्याने ते यामध्ये बदल करणार नाहीत", असंही तो म्हणाला.

त्यानंतर मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेलं पत्र जनतेसमोर ठेवलं. युझर्सची सुरक्षा, आरोग्य आणि हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे असं या पत्रात म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)