युट्यूबवर कोट्यवधींची कमाई करणारे हे 10 लोक तुम्हाला माहिती आहेत?

चाहत्यांना खूश करण्यासाठी MrBeast स्टंट आणि प्रँक्स यांचा वापर करतात.

फोटो स्रोत, MRBEAST/YOUTUBE

फोटो कॅप्शन, चाहत्यांना खूश करण्यासाठी MrBeast स्टंट आणि प्रँक्स यांचा वापर करतात.
    • Author, स्टिफन पॉवेल
    • Role, गेमिंग रिपोर्टर

अमेरिकेतील 23 वर्षीय तरुण जिमी डोनाल्डसन जो MrBeast नावाने सर्वांना परिचित आहे, तो 2021 मधील युट्यूबवरील सर्वाधिक कमाई करणारा कंटेट क्रिएटर ठरला असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे.

संपूर्ण माहितीसह वेगवेगळे स्टंट आणि इतर कंटेंट सादर करून जिमीनं यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर 10 अब्जपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. त्यातून त्याला 54 दशलक्ष डॉलरची कमाई झालीय.

गेल्या दोन वर्षांपासून या यादीत अव्वल स्थान पटकावणारा 10 वर्षांचा टॉय रिव्ह्यूवर रायन काजी याला जिमीनं मागं टाकलं आहे.

यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या आघाडीच्या दहा जणांनी 2021 मध्ये एकत्रितपणे 300 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे, असं फोर्ब्सनं म्हटलं आहे.

या यादीत जेक पॉल दुसऱ्या स्थानी असून टॉप 10 मध्ये 2018 नंतर पुन्हा एकदा त्यानं स्थान मिळवलं आहे. तर त्याचा भाऊ लोगानही 2017 नंतर या यादीत झळकला आहे.

अनस्पिकेबल म्हणून ओळख असलेला माईनक्राफ्ट प्लेयर नॅथन ग्रॅहमनं पहिल्यांदाच यादीत स्थान मिळवलं असून तो पाचव्या स्थानी आहे.

जॅक पॉल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जॅक पॉल

यूट्यूब ट्रेंड एक्सपर्ट ख्रिस स्टोकल-वॉकर यांच्या मते, यावर्षीची यादी रंजक आहे, कारण यू ट्यूबवर किती तोच तो पणा आहे, ते यावरून दिसतं. या यादीत पुरुष आणि श्वेतवर्णीय यांचं किती वर्चस्व आहे हे मला जाणवत आहे, असं ते म्हणाले.

"जर तुम्ही यापैकी कोणतंही नाव घेतलं, आणि यापूर्वीच्या वर्षांच्या यादी पाहिल्या तर त्यात या सर्वांचीच नावं सापडतील. फक्त क्रम तेवढा बदललेला असेल."

प्रगतीचा काळ

कोरोना साथीच्या काळात अनेक पारंपरिक आणि मनोरंजन माध्यमांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. चित्रपटांचे प्रदर्शन लांबले, मालिकांचं चित्रिकरण बंद होतं. त्यामुळं बऱ्याच वेळापत्रकांत उलटफेर झाला. शिवाय व्हीडिओ गेमचे रिलीजही पुढं ढकलावे लागले.

रायान काजी

फोटो स्रोत, YOUTUBE/RYAN'S WORLD

फोटो कॅप्शन, रायान काजी

यू ट्यूबसाठी मात्र, हा जास्त भरभराटीचा म्हणजे बूमचा काळ ठरला.

एका संशोधनानुसार 2021 मध्ये यूट्यूबवर जगभरातील 2.3 अब्ज यूझर होते. यूट्यूबनं एक अब्ज तासांचा व्हीडिओ कंटेंट रोज पाहिला जात होता असं सांगितलं आहे.

"माध्यम जगतात खळबळ उडवून देईल आणि गेटकिपर्सपासून पिच्छा सोडवेल असं काही तरी म्हणून यू ट्यूब विकसित करण्यात आलं होतं. पण आता आपला समाज आणि मनोरंजन सृष्टी कशी आहे, याचं लोकशाहीकरण ते करत आहे," असं स्टोकल वॉकर यांनी म्हटलं.

नास्त्या

फोटो स्रोत, NASTYA/YOUTUBE

फोटो कॅप्शन, नास्त्या

"या यादीवरून असं लक्षात येतं की, हे व्यासपीठही काहीसं टीव्हीसारखं बनलं आहे आणि त्यालाच प्राधान्य दिलं जात आहे. यातून मिळणारा पैसा पाहता तयार केला जाणारा कंटेंट हा खूप उत्तम आहे हे स्पष्ट आहे. MrBeast जे तयार करतात त्यावरून ते लक्षातही येतं.

यूट्यूबवर असलेल्या इतर कशाच्याही सारखं ते नाही. अगदी बिग बजेट टीव्ही सारखंच काहीतरी ते आहे.

स्टोकल वॉकर यांच्या मते यूट्यूबसाठीच्या प्रोडक्शनचं मूल्य वाढल्यामुळं अनेकांच्या याठिकाणच्या प्रवेशात सध्या ते अडथळा ठरत आहे. म्हणजे तुम्हाला इथे खेळण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी आधी खर्च करावा लागेल.

फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणारे हे सर्वाधिक व्हूज असलेलेच असायला हवे असं नाही. तर ब्रँड पार्टनरशिप, स्पाँसरशिप डील्स आणि मर्चंडाईज सेल याद्वारे पैसा कमावून त्यांनी यश मिळवलेलं आहे.

यूट्यूबवरील दोन तृतीयांश कंटेंट हा इंग्रजी भाषेतला नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. पण इंग्रजी बोलणारे क्रिएटर्स त्यांच्या प्रसिद्धीचा आर्थिक फायदा करून घेण्यात अधिक सक्षम आहे हे दिसतं.

सध्याच्या इतर मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच यूट्यूबलाही चुकीची माहिती आणि हानीकारक कंटेंटसारख्या अडचणींचा सामना करावा लागतोय. पण त्यामुळं कंटेंट क्रिएटर्सच्या जाहिरातदार आणि प्रायोजकांना त्यांच्या चॅनलकडे आकर्षिक करण्यावर याचा फारसा परिणाम झालेला नाही.

टॉप 10 ची यादी खालीलप्रमाणे

10. प्रेस्टन अर्समेंट

प्रेस्टन अर्समेंटनं प्रामुख्यानं माईनक्राफ्टशी संबंधित व्हीडिओंद्वारेच चाहते जमवले आहेत. तसंच ते इतर काही चॅनल आणि वेबसाईटही चालवतात.

या यादीत त्यांचा नेहमी समावेश असतो. 2021 मध्ये त्यांनी साधारणपणे 16 दशलक्ष डॉलरची कमाई केली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत (सहावं स्थान) यावेळी यादीत काहीसं खालचं स्थान मिळालं आहे.

9. लोगन पॉल

वादग्रस्त बॉक्सर आणि व्लॉगर यापूर्वी 2017 मध्ये या टॉप 10 यादीत होते. त्यांनी 2021 मध्ये 18 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे.

8. डुड परफेक्ट

कॉमेडीयन आणि प्रॅकस्टर डुड परफेक्ट 2020 मध्ये या यादीत तिसऱ्या स्थानी होते. गेल्यावर्षी त्यांनी 20 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

7. रायान काजी

जगप्रसिद्ध टॉय रिव्ह्यूवर गेल्या वर्षीच्या तिसऱ्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरला आहे.

2021 मध्ये त्यानं खेळण्यांचे रिव्ह्यू, एज्युकेशनल व्हीडिओ आणि फॅमिली व्लॉग याद्वारे 27 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

6. नास्त्या

सात वर्षांची रशियन यूट्यूबर असलेल्या नास्त्याचे 90 मिलियन सबस्क्रायबर आहेत.

तिनं खेळणी अनबॉक्सिंगपासून सुरुवात केली होती. पण तिचे व्लॉग आणि म्युझिक व्हीडिओ याला अधिक पसंती मिळत गेली आणि 2021 मध्ये तिनं 28 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

5. अनस्पिकेबल

या यादीत नव्यानं प्रवेश केलेले हे माईनक्राफ्ट प्लेयर जवळपास दहा वर्षांपासून यू ट्यूबवर अपलोडिंग करत आहेत.

त्यांनी बॅक कॅटलॉगचे राईट्स गेल्या वर्षी बिझनेस स्पॉटरला विकले. त्याच्या मदतीनं त्यांनी 28.5 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

4. रेट अँड लिंक

यूट्यूबच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत कायमचं स्थान असलेल्या गुड मिथिकल मॉर्निंग या ग्रीक शोच्या होस्टनी 2021 मध्ये 30 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

3. मार्किप्लियर

आणखी एक नियमित गेमिंग कंटेट क्रिएटर असलेल्या मार्किप्लियरनं व्यावसायिक कौशल्याचा वापर करून यशस्वी ब्रँड तयार केला आणि त्यातून गेल्यावर्षी 38 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

2. जॅक पॉल

बॉक्सिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर जॅक पॉलनं पुन्हा एकदा टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. यूएफसी स्टार्स बरोबरच्या हायप्रोफाईल फाईट्समुळे त्यांना 2021 मध्ये 45 दशलक्ष डॉलर्स कमावण्यास मदत झाली.

2017 मध्ये त्यांच्या भावाबरोबरच्या काही व्लॉग्समुळं वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा यात यश मिळवलं आहे.

2022 मध्ये काही आणखी बॉक्सिंगच्या योजना असल्यामुळं पुढल्या वर्षीही या यादीत त्यांचं नाव आल्यास आश्चर्य वाटायला नको.

1. मिस्टर बीस्ट

चाहत्यांना खूश करण्यासाठी यूट्यूबवर सर्वाधिक कमाई करणारे हे क्रिएटर स्टंट आणि प्रँक्स यांचा वापर करतात.

गेल्यावर्षी त्यांनी नेटफ्लिक्सवरूल प्रसिद्ध स्क्विड गेमचं रिक्रिएशन चॅनलवर केलं होतं. 80 हजार आसनक्षमता असलेल्या मैदानात त्यानं लपंडावसारखे गेम खेळले.

10 अब्ज व्ह्यूज, त्याचबरोबर MrBeast बर्गर फ्रँचायसी याद्वारे जिमी डोनाल्डसन यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 मध्ये उत्पन्न दुप्पट करत 54 दशलक्ष डॉलरची कमाई केली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)