BulliBai, SulliDeals मुस्लीम महिलांवर अश्लील शेरेबाजी कोण करतंय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इंटरनेटवर फ्री अॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करण्याचं आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे.
यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 18 वर्षांची एक तरुणी आणि 21 वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लहान वयात ही मुलं असे उद्योग का करतात? मुस्लीम समाजातल्या मुलींवर याचा काय परिणाम होतोय याचा घेतलेला हा आढावा…
तुमचा सोशल मीडियावरचा फोटो काढून कुणी भलत्याच अॅपवर लावला आणि तुम्ही विक्रीसाठी उपलब्ध आहात असं परस्पर सांगून तुमच्यावर बोली लावली तर? काही भारतीय मुस्लीम महिलांच्या बाबतीत असं अलीकडच्याच काळात दुसऱ्यांदा घडतंय.
सुल्ली डील्स हे अॅप तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आलं असतानाच आता बुल्ली बाई असं बीभत्स नाव देऊन दुसरं अॅप पुढे आलं. यावेळी मुंबई पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे.
कोण हे असले अॅप तयार करतंय? आणि यातून त्यांना काय उद्दिष्ट गाठायचंय?
अश्लील शेरेबाजी करणारी ही अॅप कोण तयार करतं?
गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुल्ली डील्स अॅपनेही खळबळ उडवून दिली होती.
सुल्ली हा खरंतर मुस्लीम स्त्रीसाठी वापरला जाणारा अत्यंत अपमानकारक शब्द आहे. विकाऊ स्त्री असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. अनेक मुस्लीम महिला पत्रकार आणि विचारवंतांचे फोटो आणि नावं देऊन या अॅपमध्ये चक्क लिलाव सुरू केले होते.
अर्थातच हे लिलाव तोतया होते आणि हा केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न होता. या अॅपमध्ये अत्यंत अवमानजनक आणि अश्लील मजकूरही छापला होता.

फोटो स्रोत, Social Media
या प्रकरणाचा छडा दिल्ली पोलिसांना अजून पर्यंत लावता आलेला नाही.
त्यातच आता बुल्ली बाई अॅप समोर आलं आहे. गिटहब या खुल्या ऑनलाईन व्यासपीठावर हे अॅप सुरू केलं. मग गदारोळ झाल्यानंतर हे अॅप त्यांनी काढूनही टाकलं.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी वेगाने कारवाई करत आतापर्यंत 3 जणांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती :
- श्वेता सिंग ही उत्तराखंडमधली अठरा वर्षांची तरुणी हे अॅप चालवत होती.
- ती इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करतेय.
- ही तरुणी स्वत:च्या ट्विटर हँडलवरून अॅपवर मजकूर टाकत होती.
- मुस्लीम महिलांविषयीची माहिती ही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून घेतली होती.
- बेंगळुरूमध्ये अटक झालेला 21 वर्षांचा विशाल कुमारही इंजिनियरिंगचा विद्यार्थी आहे.
या तरुणांनी के काम केलं की त्यामागे कोणता समूह होता, याबद्दल आता चौकशी सुरू आहे, असं मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे म्हणाले, "ज्या मुली या अॅपवर होत्या त्यांच्या भावना दुखावल्या जातील असा मजकूर यात होता. हा कट आहे का याचा तपास आता सुरू आहे. अॅप आणि ट्विटरवर हा प्रकार सुरू होता. हा सायबर गुन्ह्याचा भाग आहे. त्या दृष्टीने काही तांत्रिक गोष्टी समजून घेण्याचीही गरज आहे. पण, आमची चौकशी सुरू आहे. यात राजकीय व्यक्ती होत्या का, मुलांना यात किती पैसे मिळाले, त्यांनी हे नेमकं कशासाठी केलं याचा तपास अजून सुरू आहे."
अशी अॅप का काढली जातात?
जसं फेसबुक, ट्विटरवर ट्रोलिंग होतं, तसाच, पण त्याहून गंभीर असा हा ट्रोलिंगचाच प्रकार आहे. पण, यातला मजकूर खूपच खालच्या दर्जाचा आणि अश्लील आहे.
अश्लीलता विरोधी कायद्याच्या आधारे या अॅपकर्त्यांवर कारवाईही होईल. पण मुळात ही मानसिकता आणि त्यातही एखाद्या समाजाविरोधात बदनामी करण्याचे हे प्रकार कुठून जन्म घेतात?
ऑनलाईन माहितीच्या सुरक्षिततेसाठी काम करणारे ALT न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा लिहितात, "आमच्या टीमने सुल्ली डिल्स प्रकार घडला तेव्हा ट्विटर हँडल चालवणाऱ्यांशी थेट संपर्क साधला होता. एखाद्या समाजाला आणि स्त्रियांना बदनाम करण्याचा हा संघटित प्रयत्न असल्याचं आमच्या लक्षात आलं. पण पोलीस तपास म्हणावा तसा पुढे सरकला नाही. आणि पुढे आमच्या संपर्कात असलेल्या लोकांनीही आधी कबूल केलेला गुन्हा नाकारला."
अशा अॅपमध्ये नाव आलेल्या महिलेला या गोष्टीचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतो. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दिन तांबोळी सांगतात, "महिलांना टार्गेट केलं की समाजही टार्गेट होतो. यापूर्वी जातीय दंगलींच्या वेळीही एखाद्या समाजातल्या स्त्रियांबद्दल असं अवमानजनक बोललं गेलं आहे.
"आताचं व्यासपीठ ऑनलाईन आहे, इतकाच बदल आहे. यातून समाजाचं खच्चीकरण होतंच, दोन समाजांत द्वेषही पसरतो. आणि दुसरं म्हणजे मुस्लीम धर्मातल्या मूलतत्त्ववाद्यांकडूनही महिला सोशल मीडियावर येऊ नयेत असा प्रसार केला जातो. म्हणजे स्त्रियांची वाढही खुंटते."
या प्रकरणाला आता राजकीय वळणही लागलं आहे. भाजप सरकारने सुल्ली डील्सवर कारवाई का केली नाही आणि मोदी या प्रकरणावर शांत का आहेत, असं शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी विचारलं आहे.
या प्रकरणी SIT चौकशी स्थापन करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अशा अॅपपासून आपलं प्रोफाईल सुरक्षित कसं ठेवायचं याचीही काळजी महिलांनी घेणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









