जॅकलीन फर्नांडिसला ED च्या जाळ्यात अडकवणारा सुकेश चंद्रशेखर कोण आहे?

200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने सुकेश चंद्रशेखरविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझचं पण नाव आहे.
सुकेशने आजवर अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं होतं. ईडीनं काही महिन्यांपूर्वी कारवाई केल्यानंतर सुकेश चंद्रशेखरचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबर संबंध असल्याचं समोर आलं होतं.
प्रामुख्यानं जॅकलिन फर्नांडिसचं नाव यात समोर आलं. तसंच नोरा फतेहीसह इतरही काही सेलिब्रिटींशी त्यांचा संबंध असल्याचंही तपासात समोर आलं होतं. तो या सेलिब्रेटीजला महागड्या भेटवस्तू पाठवत असे.
या प्रकरणी जॅकलनची चौकशी झाली होती, तर आता नोरा फतेहीचीही दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
दरम्यान, या प्रकरणी जेव्हा जॅकलीनचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं, तेव्हा तिने एक निवेदन प्रसिद्ध करून माझ्या खाजगीपणाचा भंग होईल असे फोटो प्रसिद्ध करू नका असं आवाहन केलं होतं.
पण, अखेर या प्रकरणात जॅकलीन फर्नांडिस हिचं नावसुद्धा जोडलं गेलं आहे. EDने दाखल केलेल्या आरोपपत्रात नाव आल्यामुळे जॅकलीवर आता काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाई
सुकेश चंद्रशेखर हे नाव सध्या चर्चेत आहे. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांच्यावर ईडीनं कारवाई करत आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांनी आजवर अनेकांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
ईडीनं कारवाई केल्यानंतर सुकेश चंद्रशेखरचे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजबरोबर संबंध असल्याचं समोर आलं. प्रामुख्यानं जॅकलिन फर्नांडिसचं नाव यात समोर आलं. तसंच नोरा फतेहीसह इतरही काही सेलिब्रिटींशी त्यांचा संबंध असल्याचंही तपासात समोर आलं होतं. तो या सेलिब्रेटीजला महागड्या भेटवस्तू पाठवत असे.
सुकेश चंद्रशेखरला मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक झालेली असून सध्या या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. मात्र असं असलं तरी यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
सुकेशच्या वतीनं शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये त्यांनी आपण ठग नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेले इतरही आरोप त्यांनी फेटाळले आहेत.
मात्र, त्यांनी कशा प्रकारे अभिनेत्रींना जाळ्यात अडकवलं तसंच इतरांनाही तो कशाप्रकारे त्यांच्या जाळ्यात ओढायचा याबाबत अनेकांचा प्रचंड उत्सुकता आहे.
अंमलबजावणी संचलनालयानं सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये त्याच्याबद्दलची काही माहिती समोर आली आहे. त्यावरून तो गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असल्याचं समोर आलं आहे.
200 कोटींचे नेमके प्रकरण काय?
सुकेश चंद्रशेखर यांच्यावर सध्या सुरू असलेली कारवाई ही 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणी होत आहे. उद्योगपती शिविंदर सिंग यांच्या पत्नी आदिती यांच्याकडून 200 कोटी उकळल्याचा आरोप सुकेश यांच्यावर आहे.

आदिती सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनंतर याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. रेनबॅक्सी उद्योग समूहाचे प्रमोटर शिविंदर सिंग हे एका प्रकरणात तुरुंगात कैद असल्यानं त्यांना सोडवण्यासाठी म्हणून सुकेश यांनी वसुली केल्याचं सांगण्यात आलं.
पीएमओ आणि गृहमंत्रालयातील अधिकारी असल्याचं सांगत फोनद्वारे फसवणूक करून सुकेश चंद्रशेखर यांनी आदिती यांना फसवलं होतं. विशेष म्हणजे तुरुंगातून तंत्रज्ञानाचा वापर करून सुकेश हा सर्व प्रकार करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कारवाई करण्याची भीती दाखवत सुकेश यांनी वसुली केल्याचाही आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या ईडी करत असून या तपासादरम्यान काही सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत.
सेलिब्रिटींना महागडे गिफ्ट वाटले
ईडीनं केलेल्या तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखर यांनी काही सेलिब्रिटींना महागडे गिफ्ट वाटल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यात प्रामुख्यानं जॅकलिन फर्नांडिस या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहं.

फोटो स्रोत, BBC@twitter
जॅकलिन आणि सुकेश यांचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते. त्यानंतर ईडीनं जॅकलिन फर्नांडिसला चौकशीसाठीही बोलावलं होतं. त्यावेळी जॅकलिननं तिला सुकेशनं काही गिफ्ट दिल्याची माहिती ईडीला दिली होती.
एएनआयच्या वृत्तानुसार या गिफ्टमध्ये गुच्चीच्या तीन बॅग, जिमवेअर आऊटफिट, लुईस विटनचे लक्झरी शूज, दोन जोडी डायमंड रिंग्ज, ब्रासलेट्स यांचा समावेश असल्याचं ईडीनं चार्जशीटमध्ये म्हटलं होतं.
तसंच तिला एक कारही दिली होती, ती तिनं परत केल्याचं ईडीला सांगितलं होतं. तसंच ईडीच्या आरोपपत्रानुसार सुकेश चंद्रशेखरनं अभिनेत्री नोरा फतेही हिला एक बीएमडबल्यू कार गिफ्ट केल्याचं सांगण्यात आलं.
नोरानं ईडीला दिलेल्या जबाबात तिला चंद्रशेखर यांच्या पत्नीकडून विविध गिफ्ट मिळाल्याचं सांगितलं होतं. चंद्रशेखरची पत्नी लीना पॉलदेखील या प्रकरणी सहआरोपी आहे.
अनेक वर्षांपासून फसवणुकीचे आरोप
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार सुकेश चंद्रशेखर हे वयाच्या 17 व्या वर्षापासून अशाप्रकारे लोकांची फसवणूक करून पैसे उकळण्याची कामं करत होते.
बेंगळुरूच्या भवानीनगरमध्ये राहणारे चंद्रशेखर हे एका मध्यवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आले होते. 12 वीनंतर शाळेतून चे ड्रॉपआऊट झाले होते. त्यानंतर त्यांनी रियल इस्टेटमध्ये काम करायला सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images
अल्पवयीन असतानाच त्यांनी कार रेस आयोजित करायला सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी लोकांची फसवणूक करायला सुरुवात केली होती. वरिष्ठ सरकारी पोलिस अधिकारी असल्याचं सांगत ते अनेकांची फसवणूक करत होते.
2007 मध्ये बेंगळुरूमध्ये जवळपास 100 लोकांना बंगलोर विकास प्राधिकारणाचं काम करून देतो, असं सांगत फसवल्याप्रकरणी त्यांना सर्वप्रथम अटक झाली होती.
हळू हळू आणखी काही लोकांना हाताशी धरून त्यांनी असे प्रकार सुरुच ठेवले. काही वेळा त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र तुरुंगातून बाहेर येताच पुन्हा ते अशाप्रकारची कामं सुरू करायचे असं, या वृत्तात म्हटलं आहे.
निवडणूक आयोग प्रकरण
2017 मध्ये एका गंभीर प्रकरणामध्ये सुकेश चंद्रशेखरला अटक करण्यात आली होती. त्यावेळी सुकेशनं निवडणूक आयोगामध्ये संपर्क असल्याचा दावा करत एका राजकीय पक्षाची फसवणूक केली होती.
दक्षिणेतील AIADMK या पक्षाच्या शशिकला गटाला निवडणूक आयोगाकडून दोन पानं असलेलं निवडणूक चिन्हं मिळवून देण्याचा दावा सुकेश यांनी केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
एका हॉटेलमधून याबाबतची डील करत असल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. तसंच एका हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीतून एक कोटींपेक्षा अधिक रक्कमही जप्त करण्यात आली होती, असं नवभारत टाईम्सनं म्हटलं आहे.
एवढंच नव्हे तर सुकेश यांनी अनेक नेत्यांचे नातेवाईक असल्याचा बनाव करत अनेकांना गंडा घातल्याचेही आरोप त्यांच्यावर झाले आहेत.
सुकेश हे लोकांना मोठ्या नेत्यांची नाव सांगून फसवायचे. काही जणांना त्यांनी एम. करुणानिधी यांचे आपण नातू असल्याचंही सांगितलं होतं, असं समोर आलं आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीनं घातला गंडा!
सुकेश चंद्रशेखर यांनी प्रामुख्यानं अनेकांना गंडा घालण्यासाठी खोटी माहिती देताना तंत्रज्ञानाचा वापर करून ओळखीबाबतचे दावे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारी अधिकारी, अमित शहांच्या कार्यालयातील कर्मचारी आणि अगदी जयललितांच्या राजकीय कुटुंबातील असल्याचा दावा करताना त्यांनी खोटे फोन नंबर वापरून हे खरं असल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न केला.

फोटो स्रोत, Getty Images
स्पुफिंग अॅपच्या मदतीनं सुकेश यांनी हे केल्याचं सांगण्यात आलं आहे. जॅकलिनला त्यानं केलेल्या कॉलचा नंबर हा अमित शहांच्या ऑफिसचा दर्शवला होता. सुकेश हे सर्व या अॅपच्या माध्यमातून करत होते.
200 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात त्यांनी तुरुंगातूनच सर्वकाही केल्याचा आणि त्यासाठी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना लाच दिल्याचाही आरोप आहे.
मात्र शनिवारी सुकेश यांच्या वकिलांनी दिलेल्या निवदनामध्ये सुकेश यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तसंच जॅकलिनबरोबरचे रिलेशनशिपमध्ये होते असा दावाही सुकेशने यामध्ये केला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








