'पाकिस्तानचा फक्त चेहरा होता, सीमेवर भारताचे अनेक शत्रू होते', लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती

Photo Caption- कुपवाडा येथे एलओसीवर गस्त घालणारे भारतीय सैनिक. (जानेवरी, 2025)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कुपवाडा येथे एलओसीवर गस्त घालणारे भारतीय सैनिक. (जानेवारी, 2025)

एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 जण ठार झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या तीव्र तणाव निर्माण झाला.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. तर पाकिस्ताननेही भारताच्या काही ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशातील लष्करी हालचालींकडे जगभराचे लक्ष होतं.

दरम्यान, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी शुक्रवारी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करताना सीमा भागात एक नाही तर अनेक शत्रू असल्याचा उल्लेख केला आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (फिक्की) 'न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज' कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी भारत-पाक संघर्षाच्या वेळी चीनची भूमिका काय होती, यावर भाष्य केलं.

"गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानला मिळालेल्या 81 टक्के लष्करी उपकरणांचा पुरवठा चीनने केला," असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.

लेफ्टनंट जनरल यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला.

संसदेत भारत-चीन संबंधांवर चर्चा होऊ दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

"पाकिस्तान फक्त समोर दिसणारा चेहरा होता."

लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह म्हणाले की, अलीकडील संघर्षात पाकिस्तानसोबत चीनचीही मोठी भूमिका होती. यावेळी त्यांनी तुर्कीचाही उल्लेख केला.

ते म्हणतात, "ऑपरेशन सिंदूरमधून काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, ज्या सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. सर्वात पहिलं म्हणजे, एका सीमेवर दोन शत्रू. आपल्याला पाकिस्तान समोर दिसला, पण खरे शत्रू दोन होते, कदाचित तीन-चारही होते. पाकिस्तान फक्त समोर दिसणारा चेहरा होता."

"आपल्याला दिसून आलं की, चीनकडून (पाकिस्तानला) सर्व प्रकारची मदत मिळत होती, आणि यात काही आश्चर्य नाही, कारण गेल्या पाच वर्षांच्या आकड्यांनुसार पाकिस्तानला मिळणाऱ्या 81 टक्के लष्करी सामानाचा पुरवठा चीनकडून झाला आहे."

"पाकिस्तान फक्त समोर दिसणारा चेहरा होता."

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंह यांनी भारत-पाकिस्तान संघर्षावरही भाष्य केलं.

लेफ्टनंट जनरल म्हणतात की, अशा संधींचा वापर चीन आपल्या शस्त्रास्त्राच्या चाचपणीसाठीही करू शकतो.

त्यांचं म्हणणं आहे, "चीनने कदाचित हे ओळखलं आहे की, तो आपल्या शस्त्रास्त्रांचा वापर वेगवेगळ्या यंत्रणांविरुद्ध करून पाहू शकतो. जणू काही त्यांना एक 'जिवंत प्रयोगशाळा' (लाइव्ह लॅब) मिळाल्यासारखं आहे. ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

याशिवाय, तुर्कीनेही महत्त्वाची भूमिका बजावली. तो पाकिस्तानला अशा प्रकारे मदत करत होता. आम्ही पाहिलं की युद्धाच्या काळात अनेक प्रकारचे ड्रोन तिथं पोहोचले आणि त्यांच्यासोबत प्रशिक्षित लोकही होते."

"त्यांना चीनकडून थेट माहिती मिळत होती."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी सांगितलं की, अजून एक मोठा धडा म्हणजे संवाद, पाळत ठेवणं आणि लष्कर-नागरी समन्वय.

याचं उदाहरण देताना ते म्हणाले, "जेव्हा डीजीएमओ स्तरावर चर्चा सुरू होती, तेव्हा पाकिस्तान म्हणत होतं की, 'आम्हाला माहिती आहे तुमचं एक युनिट पूर्णपणे तयार आहे, कृपया ते मागे घ्या.' म्हणजेच त्यांना चीनकडून थेट माहिती (इनपूट) मिळत होती. या गोष्टीत आपण खूप वेगानं पावलं उचलण्याची गरज आहे."

तंत्रज्ञान आणि नवकल्पनांवर, निर्मितीवर अधिक लक्ष देण्याबाबत ते म्हणतात, "मी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरबद्दल बोललो आणि मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमची गरजही मांडली, जेणेकरून आपल्या लोकवस्तीतल्या भागांचं संरक्षण होऊ शकेल.

इतर बाबतीत, आपल्याकडे इस्रायलसारखी सोय नाही. तिथं आयर्न डोमसारखी प्रणाली आणि अनेक एअर डिफेन्स सुविधा आहेत. आपल्या देशाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि अशा गोष्टींसाठी भरपूर पैसा लागतो. म्हणूनच आपल्याला नाविन्यपूर्ण उपाय शोधावे लागतील."

लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह म्हणाले की, अजून एक मोठा धडा शिकायला मिळाला, तो म्हणजे आपली पुरवठा साखळी (सप्लाय चेन) मजबूत आणि सुरक्षित असायला हवी.

Photo Caption- नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेला एक भारतीय सैनिक. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेला एक भारतीय सैनिक. (फाइल फोटो)

त्यांनी हे लष्कराच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करत सांगितलं की, जी उपकरणं आपल्याकडे यावर्षी जानेवारीत किंवा गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच पोहोचायला हवी होती, ती वेळेवर मिळू शकली नाहीत.

ते म्हणाले, "मी ड्रोन बनवणाऱ्या कंपन्यांना बोलावलं आणि विचारलं की, किती जण ठरलेल्या वेळेत उपकरणं देऊ शकतात? त्यावेळी अनेकांनी हात वर केले. पण आठवडाभरानं जेव्हा पुन्हा विचारलं, तेव्हा फार कोणी पुढं आलं नाही."

ते म्हणाले की, यामागचं मुख्य कारण म्हणजे आपली सप्लाय चेन अजूनही मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून आहे.

"जर हे सर्व उपकरणं आपल्याकडे वेळेवर आले असते, तर कदाचित परिस्थिती थोडी वेगळी असती. म्हणूनच या गोष्टीवर गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे."

काँग्रेसने उपस्थित केले प्रश्न

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, लष्कराचे डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (कॅपेबिलिटी अँड सस्टेनन्स) लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी सार्वजनिक मंचावरून दीर्घ काळापासून चर्चेत असलेली गोष्ट स्पष्ट केली आहेय

जयराम रमेश यांनी 'एक्स'वर एका पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "चीनने पाकिस्तानच्या हवाई दलाला किती वेगळ्या आणि विशेष प्रकारे मदत केली, हे त्यांनी सांगितलं.

पाच वर्षांपूर्वी चीननेच लडाखमधील स्थिती पूर्णपणे बदलून टाकली होती. पण त्यांना पंतप्रधान मोदींनी 19 जून 2020 रोजी जाहीरपणे क्लीन चिट दिली होती."

Photo Caption- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (फाइल फोटो)

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (फाइल फोटो)

अलीकडेच चीनने कुनमिंगमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत त्रिपक्षीय बैठक घेतली आहे.

भारताचा चीनसोबतचा व्यापार तुटीचा आकडा विक्रमी स्तरावर पोहोचला आहे आणि जो सीमा करार झाला आहे, त्यामुळं स्थिती जैसे थे झाली नाही, असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)