You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली ऑटो एक्स्पोला यंदा ऑडी, BMW आणि महिंद्रांचासुद्धा ‘टाटा’, कारण...
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
उत्तर प्रदेशच्या नॉयडामध्ये दिल्ली ऑटो एक्स्पो यंदा तब्बल तीन वर्षांनी होतोय.
जगभरातल्या मोठ्या कार ब्रँड्सचा हा अनोखा मेळावा अखेरचा 2020च्या फेब्रुवारीमध्ये, म्हणजे जेमतेम कोरोना आपल्या दारात असताना झाला होता. तेव्हापासून गेल्या तीन वर्षांमध्ये ऑटो क्षेत्रात फार काही बदललंय – काही कंपन्या बंद झाल्या, काही नवीन आल्या. इंधनाचे दर वधारले, इलेक्ट्रिक्स वाहनांचा बाजार फोफावला आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, काही वृत्तांनुसार वाहन उद्योगक्षेत्रात भारत तिसरा सर्वांत मोठा देश बनला.
त्यामुळे यंदा होणाऱ्या दिल्ली ऑटो एक्सपोबद्दल सर्वांनाच खूप उत्सुकता आहे.
जाणून घेऊ या यंदा इथे काय-काय पाहायला मिळेल...
कधी? कुठे? कसा होणार?
दिल्ली ऑटो एक्स्पो दोन भागांमध्ये होतो – एक कंपोनंट्स शो म्हणजे वाहनांच्या स्पेअर पार्ट्स आणि इतर सेवांशी निगडित उद्योगांचा शो, आणि दुसरा मोटर शो, ज्यात थेट वाहन निर्माते सहभागी होतात.
ऑटो एक्स्पोच्या मोटर शोचा कार्यक्रम
- बुधवार 11- गुरुवार 12 जानेवारी - पत्रकार आणि मीडियासाठी सर्व मोठ्या ब्रँड्सचं सादरीकरण
- शुक्रवार 13 जानेवारी: व्यापारी आणि उद्योजकांसाठी राखीव दिवस
- शनिवार 14 जानेवारी ते बुधवार 18 जानेवारी: सर्वसामान्य जनतेसाठी खुला
- वेळ – शनिवार-रविवार – सकाळी 11 ते रात्री 8
- सोमवार ते बुधवार – सकाळी 11 ते संध्याकाळी 7
कुठे?
इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नॉयडा, उत्तर प्रदेश – हे ठिकाण मध्य दिल्लीपासून सुमारे 40 किमी अंतरावर आहे.
ऑटो एक्स्पोच्या कंपोनन्ट्स शो
गुरुवार 12 जानेवारी ते रविवार 15 जानेवारी
प्रगती मैदान, नवी दिल्ली
यंदा दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये काय नवीन?
आयोजक सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफक्चरर्स (SIAM)नुसार यंदा या मेळाव्यात 48 वाहन उत्पादकांसह एकूण 114 कंपन्या सहभागी होतील. यात सर्व दिग्गज भारतीय आणि परदेशी कार उत्पादक त्यांचे-त्यांचे नवीन आणि अनोखे मॉडेल्स सादर करतील, शिवाय काही नवीन आणि तुलनेने अनोळखी नावंही आपल्याला यानिमित्ताने ऐकायला मिळतील.
देशातली सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी त्यांची जिमनी ही SUV लाँच करतील. लष्करी आणि पोलीस सेवेसाठी लोकप्रिय अशा मारुती जिप्सी या SUVचा हा नवीन अवतार आहे, जो 2020च्या एक्सपोमध्ये मारुतीने कॉन्सेप्ट रुपात लाँच केला होता. यंदा याचं खरं प्रॉडक्शन रूप पाहायला मिळू शकतं.
या व्यतिरिक्त ह्युंदाई ही कोरियन कंपनी आपला आयोनिक हा इलेक्ट्रिक ब्रँड या एक्सपोमध्ये लाँच करेल. अलीकडेच मुंबईत त्यांनी दाखवलेली आयोनिक 5 या इलेक्ट्रिक व्हेईकलची किंमत इथे जाहीर होण्याची शक्यता आहे.
याशिवाय ब्रिटिश वंशाची चिनी मालकीची कंपनी मॉरीस गराज उर्फ MG आपल्या यशस्वी हेक्टर SUVचा नवीन अवतार इथे लाँच करतील, तसंच AirEV नावाची एक पिटुकली इलेक्ट्रिक गाडीसुद्धा लाँच करू शकतात. टाटा नॅनोच्या आकाराची ही गाडी दाटीवाटीच्या शहरी वापरासाठी चांगली असेल, असं MGचं म्हणणं आहे.
टाटा मोटर्सने गेल्या तीन-चार वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला दिलेला वेग कमालीचा आहे. नेक्सॉन, टिगॉर आणि टियागोच्या इलेक्ट्रिक रूपांनंतर आता ऑटो एक्सपोमध्ये टाटा त्यांच्या पंच या लहान SUVचा इलेक्ट्रिक अवतार आणू शकतात, अशी चर्चा आहे.
टाटांसाठी दिल्ली ऑटो एक्सपो नेहमीच विशेष राहिला आहे, कारण इंडिकापासून ते नॅनोपर्यंत, कंपनीसाठी ऐतिहासिक ठरलेल्या अनेक गाड्या टाटांनी इथेच जगाला दाखवल्या आहेत.
जगभरातलया टू-व्हीलर कंपन्या
दुचाकींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक परदेशी कंपन्यांसाठी ऑटो एक्सपो लोकांपर्यंत पोहोचण्याची एक उत्तम संधी असते, कारण लाखो लोक जे कधी शोरूमपर्यंत जात नाहीत, ते या कंपन्यांच्या दालनांमध्ये त्यांच्या वाहनांना जवळून पाहू शकतात.
हार्ली डेव्हिडसन, इंडियन मोटरसायकल्स, ॲप्रिला, पियाजिओ, डुकाटी आणि केटीएमसारख्या अनेक कंपन्यांनी यापूर्वी ऑटो एक्सपोमध्ये दिमाखदार सादरीकरणं केली आहेत. यंदाही या ब्रँड्ससह काही नवीन आणि हटके नावं, खासकरून इलेक्ट्रिक टूव्हीलर उत्पादकांची, पाहायला मिळतील – जसं की डिवॉट मोटर्स (Devot Motors), एव्हट्रिक (Evtric), ग्रॅव्हटॉन (Gravton), मॅटर एनर्जी (Matter).
याशिवाय टॉर्क मोटर्स (Tork Motors) आणि प्रवैग (Pravaig) अशा काही कंपन्यांची दालनंही दिसतील, ज्यांनी त्यांचे एखाद दुसरे मॉडेल्स बाजारात आणलेही आहेत.
चिनी दबदबा
2020च्या ऑटो एक्सपोमध्ये ग्रेट वॉल मोटर्स नावाच्या एका दिग्गज कंपनीने भारतात पदार्पणाची घोषणा केली होती. त्यांनी पुण्याजवळचं शेवरोलेचं प्लांट घेण्याची योजनाही आखली, पण त्यानंतर भारत-चीन तणावामुळे या कंपनीने केलेली घोषणा महाराष्ट्र सरकारने तात्पुर्ती थांबवली. अखेर दोन वर्षं वाट पाहिल्यानंतर या कंपनीने भारतातून आपला गाशा गुंडाळला.
आता आणखी एक मोठी चिनी कंपनी भारतीय बाजारात आपला ठसा उमटवू पाहतेय - BYD (Build Your Dreams). या कंपनीने यापूर्वीही ऑटो एक्सपोमध्ये आपल्या इलेक्ट्रिक बसेसची झलक दाखवली होती, आणि यांच्या अनेक बसेस अनेक महापालिकांच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत.
तूर्तास या कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक कार विक्रीलाही आहेत – e6 नावाची एक MPV (मल्टी युटीलिटी व्हेईकल, जसं की इनोवा किंवा अर्टिगा), आणि दुसरी म्हणजे नुकतीच लाँच झालेली ॲटो 3. ही एक कॉम्पॅक्ट SUVच्या आकारातली इलेक्ट्रिक गाडी डिसेंबरमध्ये भारतात दाखल झाली.
यंदा दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये Seal (सिएल) नावाची आणखी एक इलेक्ट्रिक गाडी आणतील, अशी चर्चा आहे.
याशिवाय अनेक लहानमोठ्या इलेक्ट्रिक कंपन्यांच्या वाहनांमध्ये लागणारं तंत्रज्ञान, खासकरून बॅटऱ्या या चीनहून येतात. त्यामुळे याही एक्सपोमध्ये चिनी दबदबा पाहायला मिळू शकतो.
नवीन तंत्रज्ञानाची आशा
अलीकडेच भारत सरकारने ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा केली, ज्यासाठी 17 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीची तरतूद करण्यात आली आहे. हायड्रोजन फ्युएल सेलवर तंत्रज्ञानावर काम करणारी टोयोटाची मिराई यापूर्वी ऑटो एक्सपोमध्ये अनेकदा दिसली आहे, त्यामुळे यंदा हायड्रोजनवर चालणाऱ्या आणखी गाड्याही एक्सपोमध्ये पाहायला मिळू शकतात.
याशिवाय फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञान, ज्याला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रोत्साहन देत आहेत, त्यावर आधारित वाहनंही इथे पाहायला मिळू शकतात.
या कंपन्यांची अनुपस्थिती
गेल्या काही काळात SIAMतर्फे आयोजित ऑटो एक्सपोकडे काही वाहन निर्मात्यांनी पाठही फिरवली आहे. यात्यामुळेच बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, मर्सेडीझ बेन्झ, BMW, जग्वार लँड रोव्हर, होंडा, फोक्सवागन, श्कोडा, सिट्रोएन, आणि अगदी महिंद्रा अँड महिंद्रासुद्धा यंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये दिसणार नाहीत, असं वृत्तांवरून कळतंय.
याची अनेक कारणं सांगितली जातात – सहभाग घेण्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात, एक्सपोमधून फार काही साध्य होत नाही, इत्यादी. अनेकदा कंपन्यांकडे नवीन काही सादर करायला नसतं, त्यामुळेही इतका खर्च करणं त्यांना पटत नाही, असं जाणकार सांगतात. कंपन्यांचं म्हणणं असतं की ते त्यापेक्षा त्यांच्या थेट ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी इतर पर्याय अवलंबतात, जसं की स्वतःचे वेगळे शो आणि लाँच कार्यक्रम घेणं.
त्यामुळेच की काय, ऑटो एक्सपो सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वी मर्सेडीझ बेन्झ, BMW, महिंद्रा आणि होंडा, अशा अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन आणि अपडेटेड मॉडेल स्वतंत्र सोहळ्यांमध्ये सादर केले आहेत. यातून त्यांना वेगळं मीडिया कव्हरेज मिळतं, हाही एक भाग आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)