You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुणे: अर्थव्यवस्थेला सुस्ती आल्यानंतर कशी आहे पुण्यातील ऑटो इंडस्ट्रीची स्थिती?
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
आर्थिक मंदीचा परिणाम देशाच्या उत्पादन क्षेत्रावर कसा झाला आहे याची कहाणी गेल्या तिमाहीतले आकडे स्पष्ट सांगताहेत.
वाहनउद्योगावर त्याचं सावट अधिक गडद आहे. टाटा मोर्टर्स, महिन्द्रा यांच्यानंतर आता अशोक लेलैण्ड सारख्या कंपनीलाही आपले कामाचे दिवस कमी करावे लागले.
ह्युण्डाईसारख्या वाहननिर्मिती क्षेत्रातल्या कंपन्यांचेही विक्रीचे घटलेले आकडे हे क्षेत्र कशा स्थितीतून जात आहे हे दाखवताहेत. पण या मोठ्या उत्पादकांमधून ही मंदी त्यांच्यावर आधारित असणा-या लघु उद्योगांपर्यंत झिरपते आहे आणि हजारोंचे रोजगार जाण्याची भीती निर्माण झाल्याचं या क्षेत्रातले व्यावसायिक सांगतात.
मोठ्या कंपन्यांना वाहनांचे छोटे पार्टस पुरवणा-या महाराष्ट्रातल्या शेकडो लघुउद्योजकांवर भयंकर परिस्थिती ओढवली आहे.
पुणे जिल्ह्यातले पिंपरी-चिंचवड-भोसरी, चाकण, रांजणगाव, तळेगांव हा परिसर वाहनउद्योगांसाठी पूर्वेकडचं डेट्रॉइट म्हटलं जातं. पण इथल्या वाहनक्षेत्रावर आधारित शेकडो लघु उद्योगांवर संक्रांत ओढवली आहे.
"आपल्याकडे जवळपास सव्वाशे ते दीडशे लोक काम करायचे. तीन प्लांट आमचे होते. पण परिस्थितीनुसार तिसरा प्लांट बंद करावा लागला. काही कामांचे सब-काँट्रॅक्ट घेत होतो. पण काम कमी झाल्यानं ते काँट्रॅक्टर्स सोडून गेले. त्याच्यामुळे 60 ते 70 टक्के कामगार कमी झाले," 'ओलिव्ह इंड्स्ट्रीज'चे निस्सार सुतार यांनी बीबीसीला सांगतात.
त्यांच्या भोसरीतल्या युनिटला जेव्हा आम्ही भेट देतो तेव्हा काहो मोजके कामगार घेऊनच काम सुरू असल्याचं दिसतं. त्यांचे एमकेकांना लागून दोन गाळे आहेत.
एकात काम सुरू आहे, तर दुस-यात केवळ माल पडून आहे. त्याचं आता गोडाऊन झालं आहे. त्यांचे खरं तर एकूण तीन प्लांट्स होते. एक कायमस्वरूपी बंद करावा लागला.
निस्सार सुतार यांचं 'ओलिव्ह इंडस्ट्रीज' हे युनिट टाटा, महिंद्रा सारख्या मोठ्या उद्योगांना छोटे पार्ट्स पुरवतं. पण आता महिन्याला आठ ते दहा दिवस पुरेल इतकंच काम आहे. त्यांना शंभर कामगारांना कमी करावं लागलं आहे. दुस-या बाजूला बॅंकांकडून उद्योगविस्तार करण्यासाठी घेतलेलं कर्ज परत कसं करायचं हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.
"दोन वर्षांत पहिल्यांदा माझे बॅंकेचे इएमआय बाऊन्स झाले आहेत. अशी परिस्थिती येऊ शकते असं आम्हाला दिसत होतं. त्यामुळे आम्ही आमच्या बॅंकर्सना सुद्धा रिक्वेस्ट करतो आहोत की इएमआयचा काळ आम्हाला वाढवून द्या. आता आम्ही तुम्हाला दहा रूपयातले 3-4 रूपये देतो. उरलेल्यासाठीचा काळ आम्हाला वाढवून द्या," सुतार सांगतात.
पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातल्या जेवढ्या उद्योजकांशी आम्ही बोललो, प्रत्येकाचं एक म्हणणं समान होतं ते म्हणजे गेल्या वर्षाअखेरापासून वाहन उद्योगाची स्थिती बिकट होत गेली. काम टप्प्याटप्प्यानं कमी होत गेलं आणि गेल्या तीन महिन्यांमध्ये स्थिती अत्यंत गंभीर झाली. कामगारकपातही सुरू झाली.
"इतक्या वर्षांत आम्ही गणपतीला कामगारांना सुट्टी दिली नव्हती. पण यंदा आम्हाला सुट्टी द्यावी लागली. इतकी वर्षं दसरा-दिवाळीला कामाचा लोड खूप असायचा. तो आता एकदम 30-40 टक्क्यानं कमी झाल्यानं नाईलाजानं आम्हाला सुट्टी द्यावी लागली," 'सिद्धकला इंजिनिअर्स'चे सुधीर भांदुर्गा म्हणतात. त्यांचेही भोसरी, चाकण इथे चार वर्कशॉप्स आहेत आणि मोठ्या वाहन उत्पादकांना ते सप्लाय करतात.
सध्या हातात ज्या ऑर्डर्स आहेत त्याप्रमाणं काही काम सुरू आहे. पण तयार झालेले हे पार्ट्स असे इथे बॉक्सेसमध्ये कित्येक महिन्यांपासून पडून आहेत. गोदामं भरलेली आहेत. आता आशा एवढीच आहे की दसरा-दिवाळीच्या काळात वाहनखरेदी वाढते. तसं झालं तर ठीक, नाहीतर पुढे अंधार आहे असं या उद्योजकांना वाटतं.
"कामगारांना नेहमीच्या कामाचे 8 तास आणि वर ओव्हरटाईमचे 4 तास आपण द्यायचो. गेले तीन महिने काम हळूहळू कमी होत गेलंय. नियमाप्रमाणं आठ तास काम द्यावंच लागतं. पण त्यातही काम नसल्यानं कामगार बसून राहतात. अशा स्थितीत जे काही ठरलेले खर्च आहेत, त्यात एमएसईबी किंवा बॅंकांचे खर्च आहेत ते आम्हाला सहन करावेच लागतात. त्यामुळे आम्हाला आज खर्चाची तोंडमिळवणी करणंही अवघड जातं आहे. अशीच जर स्थिती राहिली तर ब-याच उद्योजकांना अजून कामगार कपात करण्याशिवाय पर्याय राहणार नाही," पिंपरी-चिंचवड इंड्स्ट्रीज असोसिएशन'चे अध्यक्ष संजय बेलसरे सांगतात.
आहेत त्यांचं काम जातं आहे आणि नवं काम कोणालाच मिळत नाही आहे. इरफान मुजावर लेबर कॉंट्रॅक्टर आहेत. या भागातल्या अनेक उद्योगांना कामगार पुरवतात. पण ते सांगतात की गेल्या 6 महिन्यांमध्ये ते एकालाही नोकरी मिळवून देऊ शकले नाही आहेत कारण कामच नाहीये. "जवळपास 35 छोट्या उद्योगांसोबत आमचं डील होतं. त्यांच्यामध्ये आमचे जवळपास साडेचारशे-पावणेपाचशे कामगार आहेत. अचानक हे काम कमी झाल्यानं कंपन्यांनी जवळपास पावणेदोनशे कामगार कमी केले," मुजावर सांगतात.
मंदीचा हा काळ किती टिकेल याचं उत्तर कोणाकडेच नाही. काही जण म्हणतात की हे चक्र आहे, दर थोड्या काळानं अशी स्थिती येतेच. पण कमी होत जाणाऱ्या रोजगारांकडे बघितलं तर चित्रं असं आहे की वेग कमी झालेलं उत्पादनाचं चक्र अनेकांच्या घरची चूलही थांबवतंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)