आर्थिक निर्बंध असतानाही उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कशी चालते?

उत्तर कोरियावर मागची दहा वर्षं आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. तसं असतानाही हा देश कधी कधी इतर देशांसारखाच आंतरराष्ट्रीय व्यापारात सक्रिय असतो.

त्याचं एक उदाहरण म्हणजे सप्टेंबर महिन्यात राजधानी प्याँगयाँगमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव भरवण्यात आला होता. आयोजकांचा दावा आहे की, या महोत्सवात देशविदेशातल्या 250 हून अधिक कंपन्यांनी आपली उत्पादनं लोकांसमोर मांडली.

सीरिया, चीन, क्युबा, इराण, इटली, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि तैवान या देशांनी या महोत्सवात भाग घेतला होता. मीडियामध्ये महोत्सव सफल झाल्याचं वारंवार सांगितलं जात होतं.

खरंतर उत्तर कोरियावर व्यापारासंबंधित प्रतिबंध आहेत, जे 23 डिसेंबरला आणखी वाढवण्यात आले. या निर्बंधांमुळे इतर देशांना उत्तर कोरियात तेल, खाद्यपदार्थ, यंत्रसामग्री तसंच यांत्रिक उपकरणांची निर्यात करता येत नाही.

उत्तर कोरियाशी व्यापारी संबंध ठेवणं हे इतर देशांसाठी खरंतर जोखमीचं आहे. मग व्यापार महोत्सवाला इतका प्रतिसाद कसा मिळाला?

हॉलंडमधल्या एका माहिती तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक पॉल तिजया यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला. उत्तर कोरियाशी व्यापाराच्या संधी या विषयावर अभ्यास करण्यासाठी मे 2017मध्ये एक अभ्यासगट युरोपातून प्याँगयाँगला गेला होता. या गटाचं नेतृत्व तिजया यांनी केलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक देशाला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा आहे.

"उत्तर कोरियामधल्या किम जाँग-ऊन याच्या सरकारशी आर्थिक व्यवहार करण्यात जेवढी अनिश्चितता आहे, त्यापेक्षा जास्त फायदा व्यापार करण्यात आहे," असं ते सांगतात.

उत्तर कोरियाचा व्यापार चालतो कसा?

उत्तर कोरियाच्या Foreign Trade of DPRK या मासिकात काही उत्पादनांची जाहिरात देण्यात आली आहे. ही उत्पादनं उत्तर कोरियात बनतात. यात मेडिकल उत्पादनं, साबणांपासून ते 'आयपॅड'सारख्या दिसणाऱ्या टॅब्लेट कॉम्प्युटरचा समावेश आहे.

उत्तर कोरियात तयार होणाऱ्या वस्तूंचा मुक्त व्यापार आणि परदेशी लोकांबरोबर हितसंबंध जपणं, ही तंत्र वापरून उत्तर कोरियाचा व्यापार चालतो.

सिडनी विद्यापीठात उत्तर कोरियाच्या व्यापारावर शोधनिबंध लिहिणारे जस्टिन हेस्टिंग्ज सांगतात, "या देशात जिवंत राहण्यासाठी सगळ्यांना उद्यमशील बनावं लागेल. पैसे मिळवण्यासाठी त्यांना रचनात्मक प्रयत्न करावे लागतील."

कोरियातल्या ट्रेड मासिकातली आकडेवारी बघितली तर असंच वाटतं की देशात सगळं आलबेल आहे. पण मासिकातली आकडेवारी किती खरी आहे, आणि तिथे बनणाऱ्या वस्तू नेमकं कोण विकत घेतं?

कॅलिफॉर्निया विद्यापीठात कोरिया-पॅसिफिक स्टडीज या विषयाचे व्याख्याते आणि उत्तर कोरियन अर्थव्यवस्थेचे अभ्यासक स्टिफन हॅगार्ड यांच्यानुसार, वस्तू विकत कोण घेतं हे सांगणं कठीण आहे.

"पण खरेदीदार कोणी नसेल तर वस्तू बनवत राहणं शक्य नसतं. व्यापारी महोत्सव फक्त प्रचारासाठी नसतात. त्यातून नफा कमावण्याचा हेतू असतो," हॅगार्ड यांनी सांगितलं.

90% व्यापार चीनशी

उत्तर कोरियाचा बहुतेक व्यापार चीनबरोबर चालतो. म्हणूनच उत्तर कोरियावर अण्वस्त्र चाचण्या थांबवण्याचा दबाव चीनच आणू शकतो, असं बोललं जातं.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी चीनने पुढाकार घ्यावा, असा जाहीर पवित्रा घेतला आहे.

जर कोळसा, सीफूड आणि कापड उद्योगाशी संबंधित निर्बंध लादण्यात यश आलं, तर उत्तर कोरियाचा एक तृतियांश व्यापार बंद होईल, असा अंदाज अमेरिकेने व्यक्त केला आहे.

उत्तर कोरियात येणारं परदेशी चलन

उत्तर कोरियाला परकीय चलनही बऱ्याच प्रमाणात येतं. कारण देशातले तरुण नोकरी धंद्या निमित्ताने जगभरात विखुरलेले आहेत. जवळजवळ चाळीस देशांतल्या जहाजबांधणी प्रकल्पांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करतात.

उत्तर कोरियात परदेशी कंपन्यांचे एजंट आहेत. किंवा उत्तर कोरियन एजंटही कोरियन लोकांना रशिया, चीन तसंच आफ्रिकन आणि युरोपीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देतात.

मिळणाऱ्या पगारापैकी दोन तृतियांश रक्कम हे मजूर घरी पाठवतात, असं एक अहवाल सांगतो. देशातली राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे हे लोक परदेशात नोकरी करणं पसंत करतात.

उत्तर कोरियातल्या सरकारचं मजुरांवर परदेशातही लक्ष असतं. देशात होणारी निवड प्रक्रिया आणि मजूर दुसऱ्या देशात गेल्यावर त्याची मिळकत, यावरही कोरियन सरकारचं नियंत्रण असतं.

तिथल्या मानवाधिकार समितीकडे परदेशात काम करणाऱ्या कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचं काम आहे. या डेटाबेस सेंटरचे संशोधक तिओदोरा ग्यूप्शानोवा यांच्यानुसार, परदेशात जाणाऱ्या कामगारांना आपल्या देशाप्रती निष्ठा व्यक्त करावी लागते.

"परदेशी जाणाऱ्या कामगारांच्या मुलाखतींमधून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. बऱ्याच कामगारांचं लग्न झालेलं आहे, त्यांना मुलंबाळं आहेत. त्यामुळे सरकारी नियम तोडले तर या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिक्षेची भीती असते," ग्यूप्शानोवा यांनी सांगितलं.

शस्त्रांचा व्यापार

उत्तर कोरिया शस्त्रांचा व्यापार करतो, ही गोष्ट 2013मध्ये पहिल्यांदा उघड झाली होती. सोव्हिएट रशियाच्या काळातली काही शस्त्रं (ज्यांचं वजन 240 टन इतकं होतं) घेऊन जाणारं एक उत्तर कोरियन जहाज क्युबामध्ये पकडण्यात आलं होतं.

क्युबाने दिलेलं स्पष्टीकरण महत्त्वाचं होतं - "ही शस्त्रं दुरुस्तीसाठी उत्तर कोरियाला पाठवण्यात येत होती."

तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक अहवाल असं सांगतो की, ऑगस्ट 2016मध्ये 30 हजार रॉकेट संचालित ग्रेनेड नेण्यात आले होते.

पकडलेल्या जहाजावर कंबोडियाचा झेंडा होता. पण जहाजावरचे कामगार मात्र उत्तर कोरियन होते, असा अहवाल सुरक्षा परिषदेनं दिला आहे.

उत्तर कोरियन व्यापारी शस्त्रांचा छुपा सौदा घडवून आणतात, असा आरोप त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरांवर होत आला आहे. उत्तर कोरियन ब्रँड जगप्रसिद्ध नसतील. पण निर्बंध असतानाही व्यापार करून देश जगवत ठेवणं या देशाला जमलंय.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)