प्रेस रिव्ह्यूः पद्मावती नव्हे पद्मावत?

पद्मावती चित्रपटाचं नाव पद्मावत करावं, घुमर नृत्यात थोडा बदल करावा यासह सेन्सॉर बोर्डानं पाच दुरूस्त्या सुचवल्या आहेत.

द हिंदूच्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या दुरूस्त्या या चित्रपटातल्या सुरुवातीच्या निवेदनापुरत्या मर्यादीत आहेत.

याव्यतिरिक्त चित्रपटातील कोणत्याही दृश्याला बोर्डानं कात्री लावलेली नाही. बोर्डाच्या सर्व सूचना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्विकारल्या आहे. चित्रपटाला 'U-A' प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

सेन्सॉर बोर्डानं चित्रपटात 26 कट सुचवल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण बोर्डानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या वावड्या फेटाळल्या आहेत.

चित्रपटाच्या नावात बदल करण्यासंदर्भात बोलताना बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्टीकरण दिलं की, हा चित्रपट काल्पनिक कथेवर आधारीत असल्यानं नावात बदल सुचवण्यात आला आहे.

दरम्यान, आंदोलक राजपूत संघटनांनी आपला विरोध कायमच असल्याचं म्हटलं आहे.

मुस्लीम कुटुंबाची लग्नपत्रिका संस्कृतमधून

सोलापुरातील एका मुस्लीम कुटुंबात होणाऱ्या विवाह सोहळ्याची निमंत्रणपत्रिका संस्कृतमधून छापण्यात आली आहे.

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, सोलापूरातील या मुस्लीम कुटुंबानं संस्कृत भाषेच्या प्रेमातून ही अशी निमंत्रणपत्रिका तयार केल्यानं सध्या हा कुतूहलाचा विषय ठरला आहे.

संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीच्या लग्नात ही संस्कृत पत्रिका तयार करण्यात आली.

मूळचे अक्कलकोट तालुक्यातील असलेले बिराजदार यांनी आपले आयुष्य संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठीच वेचले आहे.

संस्कृतसह उर्दू, मराठी आणि इंग्रजीतून निमंत्रणपत्रिका छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपला मुलगा बदिउज्जमा याच्यासह दोन्ही मुलींच्या विवाह सोहळयाच्या निमंत्रणपत्रिकाही संस्कृत भाषेतूनच छापल्या होत्या.

सोफियाचा लग्नाला नकार!

एखाद्या देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली यंत्रमानव ठरलेल्या सोफियानं लग्नास नकार दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार, पवई इथं मुंबई आयआयटी कॅम्पसमध्ये आयोजित 21 व्या टेक फेस्टमध्ये सोफिया सहभागी झाली होती.

यावेळी तिनं मुलाखत दिली. या मुलाखतीत सामाजिक, राजकीय, वैयक्तिक आदी प्रश्न विचारण्यात आले. अनेक टेकप्रेमींनी फेसबुक पेजवरूनही सोफियाला प्रश्न विचारले.

गंभीर प्रश्नांनंतर फेसबुकवरील काही मजेशीर प्रश्न सोफियाला विचारण्यात आले. 'कोणत्या मुलानं तुला लग्नाची मागणी घातल्यास होकार देशील?', असं विचारलं असता, 'मी नम्रपणे या मागणीला नकार देईन. पण, ती मागणी माझ्यासाठी नक्कीच एक उत्तम दाद असेल', असं चतुर उत्तर सोफियानं दिलं.

इंग्रजीव्यतिरिक्त अजून किती भाषेतून तुला संवाद साधता येतो? या प्रश्नाला उत्तर देताना, 'मी अवघ्या दोन वर्षांची आहे. त्यामुळे, मला केवळ एकाच भाषेत संवाद साधता येतो. पण, वाढत्या वयानुसार अनेक भाषाच नव्हे, तर इतरही मानवी कौशल्यं मी संपादन करेन', असं सोफिया उत्तरली.

नितीन पटेलांची नाराजी, हार्दिकची ऑफर

गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होऊन चार दिवस होत नाही तोच नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे.

हिन्दुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले आहेत. शपथविधी झाल्यानंतर सर्व मंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला, पण उपमुख्यमंत्री पटेल यांनी मात्र अजूनही आपल्या खात्याची सूत्रं स्वीकारलेली नाहीत.

अर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्यानं नितीन पटेल नाराज असल्याचं समजतं.

दरम्यान, दुसरीकडे हार्दिक पटेल यांनी उपमुख्यमंत्र्यांना ऑफर दिली आहे. 'जर ते पक्ष सोडायला तयार असतील आणि त्यांच्यासोबत 10 आमदार सोबत येण्यास तयार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत. त्यांच्या स्वागतासाठी मी काँग्रेस पक्षाशी बोलेन आणि त्यांना योग्य ते पद देईन,' असं हार्दिकनं म्हटलं आहे.

आधार कार्ड नसल्यानं मृत्यू?

कारगिल युद्धात प्राण गमावलेल्या जवानाच्या पत्नीला आधार कार्ड नसल्यानं खाजगी रुग्णालयानं दाखल करून घेण्यास नकार दिला. योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अंबाला इथं माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री अनिल विज यांनी सोनीपतला चौकशीसाठी पथक पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

सोनीपत इथं एका खाजगी रुग्णालयात कारगिल युद्धातील शहिद जवानाची पत्नी शकुंतला देवी यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास रुग्णालयानं नकार दिला होता. आधार कार्ड नसल्याकारणानं दाखल करता येणार नसल्याचं रुग्णालयाचं म्हणणं होतं, असा आरोप त्यांचा मुलगा पवन कुमार यानं केला आहे.

शकुंतला देवी यांना योग्यवेळी उपचार न मिळू शकल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही मुलानं केला आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रकरणाची चौकशी कऱण्याचे आदेश दिले आहेत.

आपण हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)