You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ग्राऊंड रिपोर्ट : उत्तर कोरियाच्या सीमेवरच्या गावात केवळ सुरुंग, भूसुरुंग आणि बंकर
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, उत्तर कोरियाच्या सीमेवरून
दक्षिण कोरियातल्या या गावात सकाळचे 10.30 वाजले आहेत. सीमेवर असलेल्या या गावात निरव शांतता पसरली आहे. लष्कराच्या वाहनांनी ही अधूनमधून भंग होते.
या गावचं नाव आहे योंगाम री. या गावानंतर उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील विसैन्यकृत क्षेत्राला सुरुवात होते.
असं म्हणतात की या क्षेत्रात जवळपास दहा लाखांपेक्षा जास्त भूसुरुंग अंथरलेले आहेत.
गावाच्या चेहऱ्यावर आजही दहशत
या गावात एक वृद्धाश्रम आहे. इथं काही महिला जेवणाची वाट पाहात आहेत. विविध प्रकारचे मासे, पोर्क-भात, एक सलाद आणि कोरियाची 'राष्ट्रीय दारू' सोजू टेबलावर ठेवण्यात आली आहे.
या लोकांनी देशाची हिंसेनं माखलेली फाळणी पाहिली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आजही त्या आठवणींच्या भीतीची छाया दिसते.
90 वर्षांच्या ली सून जा यांनी 1950 मध्ये याच गावात झालेला नरसंहार पाहिला आहे.
युद्धाची भीती वाटते
"माझे पती आता जिवंत नाहीत. मुलं मोठी झाली आहेत आणि ती दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाली आहेत. गेल्या काही वर्षांत इथला तणाव वाढला आहे. पण मी माझं हे गाव सोडणार नाही. मनात एक विचार वारंवार येतो, तो म्हणजे जर पुन्हा युद्ध सुरू झालं तर...? सहाजिकच, भीतीही वाटते."
ली सून जा या वृद्धाश्रमातल्या एकमेव महिला आहेत, ज्या बोलायला तयार झाल्या. इतरांनी मात्र उत्तर कोरिया विषयी बोलायला मात्र ठाम नकार दिला. कारण त्यांच्यापैकी काही महिला उत्तर कोरियातूनच आल्या होत्या तर काहींचे नातेवाईक आजही तिथं राहतात.
किम जाँग उन यांच्याबद्दल चर्चा नाही
पण उत्तर कोरियाचे नेते किम जाँग उन क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांवर चाचण्या घेत आहेत, हे मात्र ली सून जा यांना माहीत नाही. त्या म्हणतात, "मी टीव्ही पाहत असते. पण टीव्हीवर किम यांच्याबद्दल फार कमी दाखवलं जातं. तसंही उत्तर कोरियाला युद्ध आवडतं. खरंतर काळजी याच विषयाची आहे."
योंगाम री या गावासारखी डझनभर गावं उत्तर कोरियाच्या सीमेवर वसली आहेत. प्रत्येक गावात मोठाले बंकर तयार आहेत. असं म्हटलं जात की या बंकरमध्ये लपलं तर अणूबाँब आणि रासायनिक हल्ल्यापासूनही बचाव करता येतो.
अनेक विनंत्या केल्यानंतर आम्हाला एका बंकरमध्ये जाण्याची आणि तिथं शूटिंग करण्याची परवानगी मिळाली.
लोखंड आणि काँक्रीट यांचा वापर करून ही बंकर बांधण्यात आले आहेत. या भिंतींची रुंदी 4 फूट इतकी आहे. या बंकरमध्ये फक्त मेणबत्त्या आणि टॉर्च आहेत. वीज आणि जनरेटरची सोय इथं आहे.
मोठमोठ्या फ्रीजमध्ये तीन महिने पुरेल इतकं खाद्यपदार्थ, ब्लॅंकेट, बॅटरीवर चालणारे शॉर्टव्हेव रेडिओ इथं आहेत. जर युद्ध झालंच तर बाहेरील जगाशी संपर्क साधता यावा यासाठी या रेडिओंची सोय करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात डिजिटल स्क्रीन आणि महाकाय लाऊडस्पीकर अलार्म नेहमी सज्ज असतात. हे गाव दक्षिण कोरियाची राजधानी सोलपासून चार तासांवर आहे. इथं पोहचण्यासाठी उणे 10 डिग्री तापमान, हिमवर्षाव आणि कधीही न संपणाऱ्या सुरुंगांचा सामना करावा लागतो.
पाच लाख सैन्य तैनात
या गावांपासून सर्वांत जवळचं शहर आहे ते म्हणजे चुनचियों. जसजसं हे शहर जवळ येतं तसतसं इथं सामान्य माणसं कमी, सैन्य जास्त दिसू लागतात. दक्षिण कोरियाचे पाच लाखांपेक्षा जास्त सैन्य या सीमेवर दिवस रात्र तैनात असतं.
उत्तर कोरियाच्या तोफांची तोंडं आजही या दिशेने रोखली आहेत. असं असतानाही जे सीमेवर राहात आहेत, त्यांना तिथून दुसरीकडे जायचं नाही.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)