You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
World Automobile Day: कार्ल बेंझ यांच्या माहेरी जाणाऱ्या बायकोमुळे असा झाला आधुनिक गाड्यांचा जन्म
आज 29 जानेवारी. World Automobile Day म्हणजेच जागतिक स्वयंचलित वाहन दिवस.
1886 साली याच दिवशी नेऋत्य जर्मनीतील मॅन्हाईम (Mannheim) शहरात राहणारे उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना त्यांच्या स्वयंचलित मोटारवाहनाचं पेटंट देण्यात आलं होतं. म्हणजे एकप्रकारे 29 जानेवारी 1886 रोजी गाडीचा जन्म झाला होता.
तोवर जगभरात फक्त घोडागाडी, टांगा किंवा बैलगाड्यांसारखी वाहनं पाहायला मिळायची. म्हणून इथे स्वयंचलित हा शब्द महत्त्वाचा ठरतो.
कार्ल बेंझ यांचं स्वयंचलित वाहन अगदी साधसुधं. ते दिसायला टांग्यासारखंच होतं - एक आसनी, लाकडी फ्रेम, लाकडी चाकं वगैरे. मात्र त्याच्या पुढे घोडे नव्हते आणि मागे एक चुक-चुक असं आवाज करणारं, धूर सोडणारं दोन हॉर्सपावरचं इंजिन होतं.
29 जानेवारीनंतर लगेचच जगभरातल्या रस्त्यांवर ती गाडी काही दिसू शकली नाही. कार्ल बेंझ यांना वाटायचं की या गाडीवर अद्याप बरंच काम करण्याची गरज आहे, ती कुठल्याही रस्त्यावर प्रवाशांसाठी सुरक्षित नाही.
तेव्हाचे रस्तेही फक्त टांग्यांसाठी बनलेले, म्हणजे ना डांबराचे ना सीमेंटचे. फक्त माती-खडकांचे, म्हणजे खऱ्या अर्थाने खडतर प्रवास. त्यामुळे कार्ल बेंझ संशोधनासाठी बऱ्यापैकी आपला वेळ घेत होते.
त्यांची पत्नी बर्था बेंझ मात्र अस्वस्थ होत होती. त्यांच्या लग्नात आलेला हुंडा तिने तिच्या पतीच्या व्यवसायात घातला होता, मात्र आपल्या पतीचा त्याच्याच अविष्कारावर भरवसा नाही, यामुळे तिची जरा चिडचिड होत होती.
दोन वर्ष अशीच उलटली. मग एके दिवशी कार्ल काही कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, बर्थाने ठरवलं - ही गाडी अगदी सुरक्षित आहे, ती लांबचा पल्ला गाठू शकते, हे सिद्ध करण्यासाठी आपणच नवऱ्याची गाडी बाहेर काढायची.
जर एका महिलेने एकटीने काही शहरांमधून प्रवास केला, तर लोकांचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असं तिला वाटायचं.
कार्ल यांना ज्या पहिल्या 'मोटरवॅगन'साठी पेटंट मिळालं होतं, त्याचीच थोडी सुधारित आवृत्ती म्हणजे मोटरवॅगन-3 त्यांच्या गॅरेजमध्ये होती. बर्थाने तिच्या दोन मुलांना सोबत घेतलं आणि पतीच्या नकळत तिच्या माहेरी फॉर्झएमला (Pforzheim) जाण्याचा निश्चय तीने केला .
तिने एक मार्ग निश्चित केला - मॅन्हम ते माहेर फॉर्झएम आणि परत. या राउंड ट्रिपचं एकूण अंतर होतं 194 किलोमीटर. त्या काळी ना धड रस्ते होते, ना रस्त्यांवर साईनबोर्ड वा गुगल मॅप्स. बर्था यांना त्यांच्या माहेरी जाण्याचा मार्ग फक्त नद्या आणि वाटेत पडणाऱ्या रेल्वे रुळांमुळे थोडाफार माहिती होता. वाटेत काही गावंही होतीच.
मोटरवॅगन-3 सुद्धा अगदीच बेसिक होतं - लाकडी फ्रेम, लाकडी चाकांचा एक आसनी टांगा, ज्यामागे एक धूर सोडणारं तो फोरस्ट्रोक इंजिन लागलेलं. त्याला सुरू करण्यासाठी कुठलीही चावी नव्हती - इंजिनलाच जोडलेलं एक मोठं चाक होतं, जे फिरवावं लागायचं. त्याचंच अद्ययावत रूप म्हणजे आपण आज गाड्यांना जी किक मारतो ती, किंवा आता तर सेल्फ स्टार्ट आलंय ते.
ती या गाडीवर बसली आणि तिच्या दोन मुलांनी सुरुवातीला ते चाक फिरवून गाडी सुरू करून दिली. मग सुरू झाला हा खडतर प्रवास. ना धड रस्ते, ना गाडीला कुठले शॉकअप आणि सारंकाही लाकडी आणि खिळखिळं. आणि सीटबेल्टच्या जन्माला अजून शतकभराचा अवधी होताच.
त्यामुळे हा प्रवास, जरी माहेरच्या दिशेने होता, तरी बर्थासाठी काही सुखद अनुभव नक्कीच नव्हता. वाटेत अनेक आव्हानं आली, इंजिन बिघडलं, एखादा वॉल्व तुटला आणि कधी इंधनच संपलं. मात्र तिने यासाठी जिथे असेल, तसा जुगाड करत आपलं मार्गक्रमण सुरूच ठेवलं.
वाटेत कुणी तिच्या या गाडीकडे पाहून भारावून जायचं, कुणाला विश्वासच बसायचा नाही तर कुणी याला काळी जादू म्हणायचं. एखाद्या गावात बर्था आपल्या या स्वयंचलित वाहनाने प्रवेश करायची तेव्हा लोक तिला 'चेटकीण चेटकीण' म्हणायचे, तिचा रस्ता अडवायचे.
150 वर्षांपूर्वीची ही घटना अगदी तितकीच क्रांतिकारी होती, जितकं भारतात सावित्रीबाई फुलेंची शिक्षणासाठीची धडपड.
अखेर बर्था फॉर्झएमला पोहोचली, माहेरी काही काळ विसावली आणि परतीचा प्रवास त्याच वाटेवरून सुरू केला.
नवऱ्याच्या नकळत तिने केलेला हा प्रवास आज मानवजातीसाठी अक्षरशः मैलाचा दगड ठरला. कार्ल बेंझ स्वगृही परतले तेव्हा त्यांना यावर आधी विश्वास बसला नाही. मात्र तोवर त्यांचा हा अविष्कार त्यांच्या गॅरेज आणि पेटंट ऑफीसपलीकडे पोहोचला होता आणि आता त्यांच्या 'मोटरवॅगन'ची चर्चा पंचक्रोशीत होत होती.
"गाडीचा शोध एकट्या कार्ल बेंझ यांनी नाही लावला, ही कार्ल आणि बर्था यांची टीम होती. त्या दोघांनीही मोटरवॅगनसाठी एकत्र खूप मेहनत घेतली," असं एडजार मेयर म्हणाले. त्यांनी बर्था यांनी घेतलेल्या त्या रस्त्यावरूनच एक थीम ड्राईव्ह बर्था बेंझ यांच्या स्मरणार्थ सुरू केली.
बर्था यांनी त्या काळी घेतलेला तोच मार्ग हा तंतोतंत नसला तरी एडजार यांनी संशोधन करून तो मार्ग पुन्हा आखण्याचा प्रयत्न केला आहे. "आपण नेहमीच गाडीचं जनक म्हणून कार्ल बेंझ यांचंच नाव घेतो. मला बर्था यांना इतिहासात जो मान मिळायला हवा, तो मिळवून द्यायचाय," असं मेयर यांनी बीबीसीला सांगितलं.
खरंतर बर्था यांच्याच त्या धाडसी निर्णयामुळे आज जर्मनीचं नाव जागतिक वाहन उद्योगात अग्रस्थानी आहे. आजही जगभरातले सर्वांत शक्तिशाली आणि आलिशान ब्रॅँड्स जर्मनीचे आहेत. एवढंच नव्हे तर अलीकडच्या काळात होऊ घातलेल्या इलेक्ट्रिक वाहन क्रांतीतही जगाच्या नजरा अमेरिकेनंतर चीन आणि जर्मनीकडेच आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)