You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निक्की यादव हत्याः प्रेयसीचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवणाऱ्याला अटक, आतापर्यंत काय घडलं?
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखंच आणखी एक धक्कादायक प्रकरण व्हॅलेंटाईन डे दिवशी उघडकीस आलं.
नैऋत्य दिल्लीतल्या मित्रांओ गावात राहणाऱ्या साहील गहलोत या तरुणाला पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे.
विशेष म्हणजे गर्लफ्रेंडच्या हत्येच्या काही तासांतच तो बोहल्यावर चढला आणि दुसऱ्या एका मुलीशी लग्नही केलं.
नेमकं प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीुसार, "मित्रांओ गावात राहणाऱ्या साहील गेहलोतचं निक्की यादवसोबत प्रेमप्रकरण होतं. निक्की हरिया णातील झज्जरची रहिवासी होती. निक्की मेडिकलच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्लीत आली होती. या परीक्षेच्या तयरीसाठी तिने एक प्रायव्हेट क्लास लावला होता.
तर साहिलने 2018 मध्ये ग्रेटर नोएडामधील एका कॉलेजमध्ये डी फार्मसाठी अॅडमिशन घेतलं होतं.
निक्कीने देखील त्याच कॉलेजमध्ये बीएसाठी अॅडमिशन घेतलं.
बसमधून येता जाताना या दोघांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं."
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर हे दोघे ग्रेटर नोएडामध्ये एकत्र राहू लागले.
कोव्हिड साथीच्या काळात हे दोघेही आपापल्या घरी निघून गेले.
पण नंतर दिल्लीत परतल्यावर त्यांनी द्वारकामध्ये भाड्याने घर घेऊन एकत्र राहायला सुरुवात केली.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9-10 फेब्रुवारीच्या रात्री त्या मुलीला कळलं की साहिलचं दुसरीकडे लग्न होतंय. तिने त्याला धमकी दिली की जर त्याने इतरत्र लग्न केलं तर ती पोलिसात त्याची तक्रार करेल.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, निक्कीने 9 फेब्रुवारीला गोव्याला जाण्याचा प्लॅन केला होता. यासाठी तिने फ्लाइटचं तिकीटही बुक केलं होतं, पण साहिलने अचानक एक निमित्त करून प्लॅन कॅन्सल केला. पुढे 9 फेब्रुवारीलचा साखरपुडा झाल्याची माहिती निक्कीला मिळाली."
त्यानंतर निक्कीने साहिलशी संपर्क साधला. यावर हे लग्न आपल्या इच्छेविरुद्ध होत असल्याचं साहिलने निक्कीला सांगितलं आणि तिला भेटायला बोलावलं. दोघेही गोव्याला पळून जाणार होते, पण जेव्हा ती काश्मिरी गेटवर पोहोचली तेव्हा साहिलने तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला."
मोबाईलच्या केबलने केला खून - पोलीस
दिल्लीच्या राजोरी गार्डन क्राइम ब्रँचचे डीसीपी सतीश कुमार यांनी मंगळवारी मीडियाशी बोलताना सांगितलं की, साहिलच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न ठरवलं होतं. 9 तारखेला साखरपुडा आणि 10 तारखेला लग्न होतं.
पोलिसांनी सांगितलं की, "साहिलने निक्कीला याविषयी सांगितलं नव्हतं. जेव्हा निक्कीला याविषयी समजलं तेव्हा तिने साहिलला बोलावून घेतलं."
"जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा त्यांच्यात वाद झाला. वादाच्या वेळी दोघेही कारमध्ये होते. यादरम्यान रागाच्या भरात त्याने तिचा गळा मोबाईलच्या चार्जिंग केबलने आवळून खून केला."
सतीश कुमार सांगतात की, त्याने शेतातील एका ढाब्यावर निक्कीचा मृतदेह नेला आणि तिथे बंद पडलेल्या फ्रीजमध्ये तो लपवला. त्या फ्रिजला त्याने कुलूप घातलं. हा ढाबा साहिलच्या कुटुंबीयांच्या मालकीचा आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, "आत्तपर्यंत जी माहिती पोलिसांच्या हाती आली आहे त्यानुसार तर निक्कीचा खून ज्या गाडीत झाला त्याच गाडीतून तिचा मृतदेह ढाब्यापर्यंत नेण्यात आला होता."
साहिल तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावणार होता याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून सध्या साहिलची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
खून करताच मोबाईल फोनमधला डेटा केला डिलिट..
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, "निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काही तासांनंतर आरोपी साहिल गेहलोतने तिचा फोन घेतला आणि त्यातून सर्व डेटा हटवल्याचं दिल्ली पोलिसांनी गुरुवारी सांगितलं."
दिल्लीचे विशेष पोलीस गुन्हे आयुक्त रवींद्र यादव म्हणाले की, "आम्ही त्याच्याकडचे दोन फोन जप्त केले आहेत. आम्हाला कॉल डिटेल रेकॉर्डसह चॅट्स आणि फोटो तपासायचे होते. पण त्याने खुनानंतर दोन्ही फोनमधील सर्व डेटा डिलीट केला होतं. फोनमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी आम्ही फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले आहेत."
पोलिसांचं म्हणणं आहे की, साहिलच्या कुटुंबीयांना या दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.
पोलिसांना टीप कोणी दिली?
पोलिसांनी सांगितलं की, साहिलने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केल्याची माहिती त्यांना गुप्त सूत्राकडून मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलिसांनी प्राथमिक तपासात पाहिलं की कुठली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही.
तपास सुरू असताना साहिलचा फोन बंद असल्याचं आढळलं. शिवाय तो घरातूनही गायब होता.
त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या कैर गावातून त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना दिल्लीचे विशेष पोलीस गुन्हे आयुक्त रवींद्र यादव म्हणाले की, "पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत जलदगतीने पावलं उचलली. साहिलने लग्नानंतर निक्कीच्या मृतदेहाची काहीतरी विल्हेवाट लावली असती. जर तसं झालं असतं तर पुरावे गोळा करण्यात पोलिसांना अडचणी आल्या असत्या, आमचं टायमिंग एकदम परफेक्ट होतं."
ते पुढे म्हणाले की, "मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर डीएनए मॅचिंग, पुरावे गोळा करणं, त्याचा आरोपीशी सहसंबंध जोडणं खूप अवघड असतं. यातून केस बऱ्याच काळासाठी लांबते. साहिलला शिक्षा मिळण्यासाठी निक्कीचा मृतदेह हा एकमेव मोठा पुरावा आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, निक्की यादवच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम बुधवारी दिल्लीतील एका रुग्णालयात करण्यात आलं.
निक्की यादवची हत्या ज्या गाडीत करण्यात आली होती ती गाडी सुध्दा दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने जप्त केली आहे.
निक्कीच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
निक्की यादवचे वडील सुनील यादव मीडियाशी बोलताना म्हणाले की, त्यांना पोलिसांनी फोन करून निक्कीच्या हत्येची माहिती दिली.
निक्कीची हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी मागणी त्यांनी केलीय.
सुनील यादव म्हणाले, "आरोपींना फाशी झालीच पाहिजे. आमच्या मुलीच्या मृत्यूविषयी आम्हाला कालच समजलं. निक्की दीड महिन्यापूर्वीच घरी आली होती."
दुसरीकडे निक्की आणि साहिल लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची गोष्ट एका गावकऱ्याने नाकारली आहे.
ते म्हणाले की, त्यांच्या मुलीला फूस लावली होती. मीडियामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी दाखवल्या जातात ते साफ चुकीचं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)