गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह ठेवला फ्रीजमध्ये, अन् तो चढला बोहल्यावर

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखंच आणखी एक धक्कादायक प्रकरण व्हॅलेंटाईन डे'लाच उघडकीस आलं आहे.

नैऋत्य दिल्लीतल्या मित्रांओ गावात राहणाऱ्या साहील गहलोत या तरुणाला पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात अटक केली आहे.

हत्येच्या काही तासांतच तो बोहल्यावर चढला आणि दुसऱ्या एका मुलीशी लग्नही केलं.

साहील 24 वर्षांचा आहे तर त्याची गर्लफ्रेंड निक्की यादव ही 24 वर्षांची होती.

2018मध्ये एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर दोघांचे सूत जुळले. त्यानंतर दोघे अनेक वर्षं दिल्ली आणि नॉयडामध्ये लिव्ह-इन मध्ये राहिले.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 9-10 फेब्रुवारीच्या रात्री त्या मुलीला कळलं की साहिलचं दुसरीकडे लग्न होतंय.

तिने त्याला धमकी दिली की जर त्याने इतरत्र लग्न केलं तर ती पोलिसात त्याची तक्रार करेल.

PTI वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार साहिलने आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.

तिला तो गाडीत फिरवायला घेऊन गेला, पण नंतर त्याने तिचा गळा मोबाईलच्या चार्जिंग केबलने आवळला आणि नंतर तिचा मृतदेह त्याच्या ढाब्याच्या फ्रीजमध्ये ठेवला.

आणि त्यानंतर 10 तारखेलाच त्याने दुसऱ्या एका मुलीशी त्याचं ठरलेलं लग्नही पार पाडलं.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी एक निनावी टीप मिळाली की साहिलने 10 फेब्रुवारीला निक्कीचा खून केला आहे आणि त्याच दिवशी त्याने दुसऱ्या एका मुलीशी लग्न केलं आहे.

पोलिसांनी प्राथमिक तपासात पाहिलं की कुठली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार आलेली नाही.

पण तिचा फोनही तीन-चार दिवस बंद राहिल्याने संशय बळावला.

अखेर पोलिसांनी सापळा रचून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.

दिल्ली पोलिसांनी तूर्तास साहीलला अटक करून फॉरेन्सिकसह इतर चाचण्यांसाठी नेलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असं सांगण्यात आलंय.

पण श्रद्धा वालकर प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचं जे काम झालं, ते या आरोपीने करण्यापूर्वीच त्याला अटक केल्याचं समाधान दिल्ली पोलिसांनी व्यक्त केलं आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)