श्रद्धा वालकर हत्या : आफताबच्या आई-वडिलांचीही चौकशी करून कारवाई करावी - विकास वालकर

श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, आरोपी आफताब पुनावाला याच्या आई-वडिलांच्या चौकशीचीही मागणी केली. तसंच, आफताब पुनावालाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.

"आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आहे. आफताबसह त्याचे आई-वडील, भाऊ यांचीही चौकशी करण्यात यावी," अशी मागणी श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी केली आहे.

आज (9 डिसेंबर) आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विकास वालकर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हेसुद्धा उपस्थित होते.

विकास वालकर म्हणाले की, "दिल्ली गव्हर्नर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. वसई पोलीसांनी जर योग्यवेळी सहकार्य केले असते तर माझी मुलगी कदाचित आज जिवंत असती. "

तसंच ते पुढे म्हणाले, "श्रद्धाचा मृत्यू झाल्यानंतर माझी तब्येत बिघडली आहे. जितकं शक्य आहे तितकं मी बोलेन. आफताब पुनावालाला याने माझ्या मुलीची क्रूरतेने हत्या केली त्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहीजे.

18 वर्षांवरील मुलांना जे स्वातंत्र्य मिळते त्यावर विचार व्हायला हवा. समाजातील धार्मिक जागृती होणं गरजेचं आहे."

तत्पूर्वी, विकास वालकर यांनी नातेवाईकांसोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या सुद्धा उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, “मला माझ्या मुलीसाठी न्याय मिळावा, यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य, तसेच न्यायव्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि राहील.

“आफताब पुनावालाने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली असून त्याला कठोर शिक्षा व्हावी. तसंच आफताबचे आई-वडील, भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. त्यांच्याशिवाय इतर कुणी सहभागी असतील, तर त्यांचीही चौकशी करून त्यांना शिक्षा देण्यात व्हावी,” अशी अपेक्षा विकास वालकर यांनी व्यक्त केली.

आफताबवर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालावर दिल्ली येथे तलवारीने हत्या करण्याचा प्रयत्न झाला.

पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबला पोलीस व्हॅनमधून नेलं जात होतं. त्यावेळी किमान दोन जणांनी नंग्या तलवारी घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी तात्काळ मध्ये येत व्हॅनचे दार लावून घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांचा प्रतिक्रार केला.

हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्लेखोरांनी आपण हिंदूसेना नावाच्या संघटनेचे सदस्य आहोत असा दावा केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आफताब पुनावालाने त्याची प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या केली आणि तिचे 35 तुकडे केले. आणि नंतर ते दिल्लीतील मेहरोलीच्या जंगलात फेकून दिले असा आफताबवर आरोप आहे.

आफताब आणि श्रद्धा हे दोघे मुंबईतील वसईचे होते. मे महिन्यात ते दोघे जण दिल्लीत आले. सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून आफताबने श्रद्धा वालकरची हत्या केली होती.

तिचे तुकडे करून ते एका मोठ्या फ्रीजमध्ये ठेवले होते, नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने ते तुकडे जंगलात फेकून दिले.

पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. आफताबने हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी वापरलेले शस्त्र अद्याप सापडले नाही.

त्याची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात येणार होती. ती झाल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

आफताबने दिली हत्येची कबुली

याआधी, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.

बार अँड बेंचच्या माहितीनुसार, दिल्लीतल्या साकेत कोर्टात मंगळवारी (22 नोव्हेंबर) आफताब पुनावालाला व्हीडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आलं. कोर्टासमोर गुन्ह्याची कबुली देतानाच आफताबनं म्हटलं की, "जे काही मी केलंय, ते चुकून केलंय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली."

आफताबनं असंही म्हटलं की, "माझ्याविरोधात जी माहिती पसरवली जातेय, ती बरोबर नाहीय. पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य मी करतोय. मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे फेकले, हे मी पोलिसांना सांगितलं."

माध्यमांच्या वृत्तांनुसार, आफताबने पोलीस तपासात हेही सांगितलं की, श्रद्धाला मारण्यासाठी वापरलेलं ब्लेड गुरुग्राममधील डीएलएफ फेज तीनच्या जवळील झाडांमध्ये फेकलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)