आफताब पुनावालाच्या कबुलीजबाबावर आधारित खटला कोर्टात टिकेल का?

    • Author, दिनेश उप्रेती,
    • Role, बीबीसी प्रतिनिधी.

श्रद्धा वालकर हत्याकांड सध्या प्रचंड चर्चेत आहे. श्रद्धाच्या हत्येच्या संदर्भात रोज नवी तथ्यं समोर येत आहेत.

माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांपैकी अनेक बातम्या या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर चालवल्या जात आहेत.

पोलिसांच्या दाव्यानुसार, श्रद्धासोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत असलेला आफताब पुनावाला हाच मारेकरी आहे. सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 18 मे 2022 रोजी त्याने श्रद्धाचा खून केला, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

श्रद्धा आणि आफताब हे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये होते. ते मुंबईहून दिल्लीला राहण्यासाठी आले होते.

'आपण श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मेहरौलीनजीकच्या जंगलात हे तुकडे फेकले', अशी कबुली आफताबने दिली, असा दावाही पोलिसांनी केला आहे.

 आता पोलीस आफताबला जंगलात नेऊन मृतदेहाचे तुकडे (हाडे) जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र पोलीस कोठडीत असलेल्या आफताबच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांचा हा खटला कोर्टात कितपत टिकेल, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे श्रद्धाला न्याय मिळणार का, हासुद्धा प्रश्न आहे.

कबुलीजबाब हा सबळ पुरावा आहे का?

या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या सगळ्या गोष्टी या आफताब पुनावालाच्या कथित कबुलीजबाबावरच आधारित आहेत.

दिल्ली पोलिसांतील निवृत्त उपायुक्त आणि सध्या वकिली करणारे अॅड एल. एन. राव यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “कायद्यानुसार, पोलिसांच्या समोर दिलेला जबाब हा न्यायालयात स्वीकारार्ह नाही, हे खरं आहे. मात्र या कबुलीजबाबाला कोणतंच महत्त्व नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. आरोपी त्याचा गुन्हा कबूल करतो. परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार ती गोष्ट सिद्ध होत असेल, तर न्यायालयही ते मान्य करतं.”

या प्रकरणात एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. शिवाय, मृतदेहसुद्धा सापडलेला नाही. अशा स्थितीत गुन्हेगाराला शिक्षा देणं, पोलिसांसाठी सोपं नाही, हे राव यांनी मान्य केलं.

त्यांनी म्हटलं, “श्रद्धा वालकर प्रकरणाचा विचार केल्यास पोलिसांकडे परिस्थितीजन्य पुरावे उपलब्ध आहेत. अशा खटल्यांमध्ये ‘लास्ट सीन थेरी’ म्हणजे श्रद्धा अखेरच्या क्षणी कुठे दिसली होती, हे प्रामुख्याने न्यायालयात मांडलं जातं. पोलिसांना DNA, फॉरेन्सिक एक्सपर्टच्या (रक्त आणि हाडे चाचणी) मदतीने श्रद्धाची हत्या झाली, हे सिद्ध करावं लागेल.

राव म्हणतात, आतापर्यंतचा तपास पाहिला तर आफताबच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी म्हटलं की 18 मे रोजी श्रद्धाची गळा दाबून हत्या झाली. त्यानंतर 300 लीटर फ्रिज खरेदी केलं. त्याचं राहतं घर पाहता इतका मोठा फ्रिज खरेदी करण्याचा हेतू काय होता? हा फ्रिज 19 मे रोजी खरेदी करण्यात आला होता, याचे पुरावेही पोलिसांनी जमवले आहेत.”

श्रद्धाचा फोन अद्याप सापडला नाही

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की हत्येनंतर आफताबने श्रद्धाचा फोन फेकून दिला. हा फोन शोधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.

श्रद्धाच्या हत्येनंतरही ती जीवंत आहे, असं भासवण्यासाठी जून महिन्यापर्यंत आफताब तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

इतकंच नव्हे तर, श्रद्धाच्याच फोनवरून बँकिंग अपच्या मदतीने आफताबने 18 मे रोजी 50 हजार ट्रान्सफर केले होते. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येनंतर काही दिवसांनी आफताबने श्रद्धाचा फोन महाराष्ट्रात कुठेतरी फेकून दिला.

 या फोनचा शोध घेतल्यास पुरावे जोडण्यास मदत होऊ शकते, असंही तज्ज्ञांना वाटतं.

फॉरेन्सिक पुरावे शोधणं किती अवघड?

गेल्या 3 दिवसांपासून पोलीस मेहरौलीच्या जवळच्या जंगलांमध्ये तपास करत आहेत. याच ठिकाणी कथितरित्या आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले होते. येथून आतापर्यंत 10 तुकडे हाडांच्या स्वरुपात मिळाले आहेत, ते श्रद्धाचे असू शकतात, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

फॉरेन्सिक चाचणीनंतरच ही हाडे श्रद्धाची आहेत किंवा नाही, याची खात्री पटवता येऊ शकते, हे पोलिसांना माहीत आहे. मात्र हे काम इतकं सोपं नक्कीच नाही.

फॉरेन्सिक तज्ज्ञ इंद्रजित राय यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “आतापर्यंत समोर आलेल्या गोष्टी पाहिल्या तर सगळी मदार फॉरेन्सिक तपासावरच आधारलेली आहेत.”

श्रद्धाची हत्या मे महिन्यात झाली, असं सांगितलं जातं. मग सहा महिन्यांनंतर फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या हाती काही लागेल का?

दिल्लीजवळच्या नोएडामध्ये घडलेल्या निठारी हत्याकांडाचं उदाहरण देताना इंद्रजित म्हणाले, “त्या प्रकरणातही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते. त्यामुळे फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारावरच हत्याकांड झाल्याचं न्यायालयात सिद्ध झालं. त्याच आधारावर आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.”

ते पुढे सांगतात, “रक्त हे ‘न्यूक्लिअस फॉर्म’मध्ये असतं. त्यामुळे या प्रकरणात गांभीर्याने फॉरेन्सिक तपास केल्यास त्याचे परिणाम दिसू शकतात. हाडांची झीज हळूहळू होत असते. त्यामुळे शस्त्र हस्तगत करता आलं तर ते आणि हाडांच्या कटचा पॅटर्न जोडून पाहिला जातो. त्याच्या मदतीने याच शस्त्राने हत्या झाली, हे सिद्ध होऊ शकतं.”

राहता राहिला DNA चा प्रश्न तर श्रद्धाचे वडील किंवा भाऊ यांच्या रक्ताचे नमुने घेऊन DNA चाचणी करता येऊ शकते, हे नमुने मृतदेहाच्या हाडांशी मिळतेजुळते असल्यास गुन्हा सिद्ध करता येऊ शकतो, असं इंद्रजित यांनी सांगितलं.

माजी पोलीस महासंचालक मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीतही यासंदर्भात अधिक विस्ताराने सांगितलं.

त्या म्हणाल्या, “ही दुर्मिळातली दुर्मिळ घटना मानली जाऊ शकते. पहिली अडचण आहे ती म्हणजे यात कोणताही साक्षीदार नाही. त्याचबरोबर मृतदेह मिळालेला नसून त्याचे काही तुकडे किंवा हाडं मिळण्याची शक्यता आहे. ते जेव्हा मिळतील तेव्हा ते श्रद्धाचे आणि मुख्य म्हणजे एका महिलेचे आहेत हे सिद्ध करण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल.

त्यांच्या मते, “हत्येचा मोटिव्ह काय होता? हे ठरवावं लागेल. मात्र, ते ठरवताना आरोपीवर विश्वास न ठेवता थेट पोलिसांना सखोल अभ्यास करून हा मोटिव्ह काय होता हे बाहेर काढावं लागेल. आफताब जर म्हणत असेल की तो रोज रात्री जंगलात जात होता. तर तो तिथे जात असतानाचे किंवा गेल्याचे लोकेशन डिटेल्स काढावे लागतील. जरी ही घटना सहा महिन्यांपूर्वी घडली असेल तर प्रत्यक्ष घटनास्थळी किंवा त्या जंगलात कुठे ना कुठे तरी ब्लड सँपल्स मिळवावे लागतील.”

“याचबरोबर केसांचे नमुने पोलिसांना जमा करावे लागतील. हे सगळे फॉरेन्सिक पुरावे पोलिसांना गोळा करून त्यांची तपासणी करावी लागेल. तो रात्री रोज जंगलात जायचा अशावेळी कोणत्या ना कोणत्या सीसीटीव्हीमध्ये तो दिसला असेल. तर ते खोलात जाऊन पोलिसांना काढावं लागेल. तसंच या काळात त्याला कोणत्या तरी सिक्युरिटी गार्डने पाहिलंय किंवा नाही, हे देखील पाहावं लागेल. म्हणजेच साक्षीदार, त्याचा मोटिव्ह आणि फॉरेंसिक रिपोर्ट्स पोलिसांना गोळा करावे लागतील, असं मीरा चढ्ढा-बोरवणकर यांनी म्हटलं.

त्या पुढे म्हणतात, “केस जुनी असल्याने मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांवरच ही केस उभी राहू शकेल. अशा प्रकरणांमध्ये आरोपीवर विश्वास न ठेवता पोलिसांना काम करावं लागेल. मी अधिकारी असताना माझ्या तपासी अंमलदारांना आरोपीच्या जबाबावर शून्य विश्वास ठेवा हेच सांगायचे. आरोपी त्याचा जबाब कधीही फिरवू शकतो, तो खोटं बोलू शकतो. त्यामुळे स्वतंत्र तपास करून मोटिव्ह शोधणं आणि पुरावे गोळा करणं हाच तपासाचा योग्य मार्ग असला पाहिजे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)