You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॉलिग्राफ चाचणी कशी केली जाते? या चाचणीत आफताबने काय सांगितलं?
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी
कोलकात्यातील आर. जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीवर कथितरित्या बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आज नवी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची स्वतःच दखल घेत सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणातील आरोपी संजीव रॉय याची पॉलीग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली जात आहे.
याआधी, श्रद्धा वालकर प्रकरणातील हत्येचा आरोपी आफताब पुनावालाची पॉलीग्राफ टेस्ट करण्याची परवानगी न्यायालयाने दिली होती.
श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील या चाचणीतून मिळण्याच्या उद्देशाने पोलिसांनी ही मागणी केली होती.
त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती. यापैकी नार्को टेस्ट काय असते, हे तुम्ही इथे वाचू शकता.
पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या.
पॉलिग्राफ टेस्ट काय असते?
पोलिसांकडे एखाद्या गुन्ह्याची माहिती आहे, गुन्हेगारही आहे आणि काही पुरावेसुद्धा. पण ते पुरावे कोर्टात टिकतील की नाही, याची जेव्हा शाश्वती नसते, तेव्हा पोलीस मधल्या मिसिंग लिंक्स जोडायला या टेस्ट्सचा आधार घेऊन एक पक्की केस तयार करतात.
पॉलिग्राफ टेस्ट होते कशी? तर आपण काही खोटं सांगत असतो तेव्हा आपल्या शरीरात काही गोष्टी स्वतःहूनच बदलतात – हृदयाची धडधड वाढते, श्वसनाचा पॅटर्न बदलतो, रक्तदाब वरखाली होतो, हातापायाला घाम सुटतो, वगैरे.
याच मानकांच्या आधारे तज्ज्ञांनी एक अशी सिस्टिम तयार केली आहे, ज्यातून एका व्यक्तीचा सामान्य प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे, आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांना प्रतिसाद कसा आहे, यातलं अंतर मोजता येतं. म्हणजे एखादी व्यक्ती खरं सांगतेय की प्रश्न विचारणाऱ्याला फसवतेय, हे शरीरातले बदल सांगत असतात.
पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?
कोर्टाने पॉलिग्राफ टेस्टची परवानगी दिल्यावर आणि अर्थात आरोपीची सहमती असल्यास, आधी त्याची सामान्य शारीरिक चाचणी केली जाते. त्याला कुठला आजार नाही, तो कुठल्या शारीरिक अडचणीत नाही, याची खात्री पटली की मग त्याच्या शरीराला काही सेन्सर जोडले जातात – रक्तदाब मोजायला दंडावर पट्टा, पोटाला-छातीला प्रेशर सेन्सर असलेले पट्टे, आणि बोटाला रक्तप्रवाह मोजणारे सेन्सर, इत्यादी.
या सगळ्या सेन्सर्समधून येणारे सिग्नल एका डिजिटल मॉनिटरवर नोंदवले जातात.
आधी काही सोपे प्रश्न विचारले जातात – तुझं नाव काय, वय काय, जन्म कुठे झाला, शिक्षण, आईवडिलांची माहिती, इत्यादी. म्हणजे असे प्रश्न ज्यांची उत्तरं नाकारण्याची किंवा खोटी सांगण्याची गरज नसावी. यातून आरोपीला कम्फर्टेबल केलं जातं आणि त्याच्या शरीराचा सामान्य रिस्पॉन्स नोंदवला जातो. सोबतच, यातून प्रश्नोत्तरांची दिशा ठरवली जाते, जेणेकरून तो मुद्द्याला धरून पुढची उत्तरं देईल.
मग पुढच्या निर्णायक प्रश्नांना सुरुवात होते, ज्यांची उत्तरं हो किंवा नाही स्वरूपात असू शकतात किंवा विस्तृतही. या उत्तरांवरच्या शारीरिक प्रतिसादावरून ती व्यक्ती खरं बोलतेय की खोटं, याचा अंदाज बांधला जातो.
पॉलिग्राफ टेस्ट किती अचूक?
पॉलिग्राफ टेस्ट ही शास्त्रीयदृष्ट्या 100 टक्के अचूक टेस्ट म्हणता येणार नाही. या चाचणीचा शोध लागल्यापासूनच तिच्यावर प्रश्न उपस्थितीत केले गेलेत. कारण याचा निकाल तुलनात्मक असतो, आणि यातून कुठलाही ठोस निष्कर्ष निघत नाही.
काही तज्ज्ञांनुसार एका विशेष ट्रेनरसोबत खूप जास्त सराव केल्यानंतर आरोपी या चाचणीला फसवूही शकतो. युकेमध्ये पॉलिग्राफ चाचणी घेणाऱ्या तज्ज्ञांना प्रशिक्षण देणारे प्रो. डॉन ग्रबिन सांगतात की “तुम्ही चाचणीपूर्वी बुटात एखादा दगड ठेवलात तर त्यामुळे तुम्हाला जास्त घाम सुटतो आणि तुमचा शारीरिक प्रतिसाद बदलतो, त्यामुळे तुम्ही खोटं बोलताना अनेकदा शरीरातले बदल नोंदवले जात नाहीत.”
तुम्ही तापसी पन्नूचा हसीन दिलरुबा हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहिला असेल तर त्यात ही अशाप्रकारची शक्कल लढवताना दिसते. पण प्रत्यक्षात मात्र गोष्टी बऱ्याच वेगळ्या असतात.
आणखी एक गोष्ट म्हणजे, ही टेस्ट घेण्यापूर्वीच अनेकांना टेन्शन आलेलं असतं, मग ते खरं बोलत असतील आणि निर्दोष असतील तरीसुद्धा या चाचणीत ते अडकण्याची भीती असते, असं फॉरेन्सिक सायकोलॉजीमध्ये अनेक वर्षं संशोधन करणाऱ्या डॉ. सोफी व्हॅन डर झी सांगतात.
पॉलिग्राफ टेस्टचा निकाल कोर्टात मान्य?
खरंतर नार्को टेस्टप्रमाणेच पॉलिग्राफ टेस्टचा निकालही पुरावा म्हणून कोर्टात सादर करता येत नाही. पण या टेस्टमधून काही नवीन सुगावा लागला - जसं की मर्डर वेपन किंवा हत्येचं मोटिव्ह - तर ते पुरावा म्हणून पोलीस कोर्टात सादर करू शकतात.
वकील असीम सरोदे सांगतात, “तपास यंत्रणांच्या तपासाला दिशा मिळण्यासाठी किंवा तपासात काही धागेदोरे मिळण्यासाठी ते अशा टेस्टचा वापर करत असतात. त्याचा फायदाही अनेक केसेसमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे."
तपास यंत्रणांचा युक्तिवाद असा असतो की अनेकदा आरोपी सहकार्य करत नाही तेव्हा त्याच्यावर थर्ड डिग्री वापरण्याऐवजी अशा मार्गांनी माहिती काढणं कधीही चांगलं. पण चुकीच्या एका मार्गाला पर्याय म्हणून दुसरा चुकीचा मार्गही अवलंबणं योग्य नाही, असं सुप्रीम कोर्टाने अशा टेस्टच्या बाबतीत म्हटलं होतं.
म्हणजेच काय, तर आफताबने श्रद्धा वालकरचा खून का केला, कसा केला, कुठली हत्यारं वापरली, तिचा फोन कुठे फेकला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर त्याच्याविरोधात एक पक्की केस तयार करून पोलीस त्याला शासन करू शकतील. यासाठीच पॉलिग्राफ टेस्टचा आधार घेतला जातोय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)