You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यातल्या सेक्सटॉर्शनमागे राजस्थानातलं अख्खं गाव, 2500 जणांची टोळी असल्याचा खुलासा
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा
1. पुण्यात सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीला राजस्थानातून अटक
सेक्स्टॉर्शनमुळे कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. राजस्थानचं गुरुगोठडी हे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे.
तरुणांच्या आत्महत्येप्रकरणा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
पुण्यात सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून तरुणांना धमकावलं जात होतं, त्यामुळे दोघांनी आत्महत्या केली होती. त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते. ज्या मोबाईल नंबरवरुन या मुलांना खंडणी मागितली जात होती, त्या नंबर्सचं लोकेशन पुणे पोलिसांनी शोधलं. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले.
पुणे पोलिसांच्या एका पथकाने थेट ते गाव गाठलं आणि तेथून अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा गावातील लोकांनी पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवलं.
गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास 2500 लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत, असं त्याने सांगितलं.
2. आसाम- मेघालय सीमेवर पुन्हा गोळीबार, सहा ठार
आसाम आणि मेघालय या राज्यांच्या वादग्रस्त सीमाभागात झालेल्या हिंसाचारात किमान सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (22 नोव्हेंबर) ला पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.
दोन्ही राज्यांनी आपापल्या पद्धतीने कारणमीमांसा केल्यामुळे हा पेच आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे चर्चेची पुढील फेरी सुरू होण्याआधी काही दिवस आधीच ही घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
आसामच्या पश्चिम काब्री अंगलोग जिल्ह्यात ही घटना घडली. लाकडाची वाहतूक करणारा एक ट्रक अडवल्याने हा हिंसाचार झाला.
याबाबत मेघालयचे मुख्यमंत्री कोर्नाड संगमा यांन आसाम पोलीस आणि वन विभागाच्या जवानांनी मेघालयच्या सीमेवर अनावश्यक गोळीबार केला असं ट्वीट केलं.
मेघालयातून आसाममध्ये लाकडाची तस्करी करणारा एक ट्रक आसाममध्ये गेला. तेव्हा आसामच्या वनरक्षक आणि पोलिसांनी अडवलं आणि ट्रकचालकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर काही वेळाने मेघालयातील काही ग्रामस्थ चाकू -सुरे घेऊन आसाममध्ये आले. त्यांनी पोलिसांना आणि वनरक्षकांना घेराव घातला.
तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. त्यात पाच ग्रामस्थांचा आणि आसामच्या वनरक्षकांचा मृत्यू झाला. आसाम पोलिसांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं सांगितलं. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
3. बारसूमध्ये गुंतवणुकीसाठी ठाकरे गटासह बहुतांश स्थानिकांचा पाठिंबा : सामंत यांचा दावा
सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या बारसू येथील प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाला होणारा विरोध आता मावळू लागला आहे.
प्रकल्पाला 70-80 टक्के ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे समर्थन दिलं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनीही पाठिंबा दिल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
शिंदे- फडणवीस सरकारच्या काळात ‘वेदान्त- फॉक्सकॉन’, ‘टाटा- एअरबस’सारखे मोाठ्या गुंतवणुकीचे उद्योग राज्यातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं.
त्यामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू तेलशुद्धीकरण प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले असून, कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
4. सत्येंद्र जैन यांना मसाज देणारी व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून बलात्काराचा आरोपी
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात मसाज देतानाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
तो मसाज नसून फिजिओथेरपी असल्याचं आप कडून सांगण्यात आलं.
मात्र आता ही व्यक्ती फिजिओथेरपिस्ट नसून बलात्काराची आरोपी आहे, अशी माहिती तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
दिल्ली पोलिसांचे महासंचालक (तुरुंग) यांनी अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. मसाज देणाऱ्या व्यक्तीवर POCSO च्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. त्याला मागच्या वर्षी अटक करण्यात आली होती.
5. कॅगचे अधिकारी मुंबई महापालिकेत दाखल, चौकशी सुरू
राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेतील करोना काळातील 12 हजार कोटींच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी कॅगकडून सुरू झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, मंगळवारी कॅगचे सुमारे दहा ते बारा अधिकारी पालिका मुख्यालयात दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी विविध खात्यांमध्ये जाऊन संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली.
पथकाने लेखापाल विभागात जाऊन काही कागदपत्रांची आणि एकूणच व्यवहाराची माहिती घेतली. यावेळी काही कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे समजते.
करोना काळात निविदा प्रक्रिया न राबवता कोट्यवधी रुपयांची कंत्राटे देण्यात आली. आवश्यक ती वैद्यकीय व इतर वस्तूंची खरेदी करण्यात आली होती. या खरेदीसाठी स्थायी समितीने पालिका आयुक्तांना अधिकार दिले होते. पालिकेच्या जवळपास 10 खात्यांमधून झालेले व्यवहार संशयाच्या फेऱ्यात असून, ते कॅगच्या रडारवर आहेत
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)