वर्गणी काढून 250 रुपयांचं तिकिट घेतलं; सफाई कामगार महिलांना लागली 10 कोटींची लॉटरी

फोटो स्रोत, ARUN CHANDRABOSE
- Author, अश्रफ पदन्ना
- Role, त्रिवेंद्रम, केरळ
यावर्षीच्या जून महिन्यात केरळच्या 11 महिला सफाई कामगारांनी मिळून एक लॉटरीचं तिकीट खरेदी केलं.
मागच्याच आठवड्यात त्यांना कळलं की, या महिलांना तब्बल दहा कोटी रुपयांचा जॅकपॉट लागलाय. ही बातमी ऐकून या सगळ्या महिला प्रचंड आनंदी झाल्या.
या महिला केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातल्या परप्पनगडी या शहरात घरोघरी जाऊन अविघटनशील कचरा वेचणाऱ्या गटाच्या सदस्य आहेत. या शहरात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या सेवेसाठी महिन्याला काही पैसे मोजावे लागतात आणि यातून या महिला दिवसाला 250 रुपये कमवतात.
एवढंच नाही तर काही पैसे स्थानिक नगरपालिकासुद्धा कधी कधी या महिलांना देते कारण गोळा केलेल्या कचऱ्याचं काळजीपूर्वक वर्गीकरण करून तो कचरा नगरपालिकेला विकला जातो.
कचरा वेचून आणि विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यात घरखर्चही चालत नाही असं या महिलांनी सहजच सांगून टाकलं. मुलांची शिक्षणं आणि इतर कामांसाठी यापैकी बहुतेक महिलांनी एकतर कर्ज घेतलंय किंवा इतर व्यक्तींकडून उसने पैसे घेतलेत.
त्यामुळे कधीकधी स्वतःच नशीब आजमावण्यासाठी म्हणून या महिला एकत्र येऊन एखादं लॉटरीचं तिकीट विकत घेतात.
भारतातल्या बहुतेक राज्यांमध्ये लॉटरी बेकायदेशीर आहे, पण केरळ मात्र याबाबत थोडंसं वेगळं आहे.
केरळचं राज्य सरकार स्वतःच प्रचंड लोकप्रिय असणारा स्वतःचाच एक लॉटरी उपक्रम चालवतं. पण खाजगी लॉटरीवर मात्र या राज्यात कठोर बंदी घालण्यात आलीय.

फोटो स्रोत, ARUN CHANDRABOSE
तर या महिलांसाठी नेहमी लॉटरी खरेदी करणाऱ्या एम. पी. राधा म्हणतात की, "आम्हाला एकदा हजार रुपयांची लॉटरी लागली होती आणि ते पैसे आम्ही सगळ्याजणींमध्ये वाटून घेतले."
गेल्या महिन्यात, या बायकांनी मान्सून बंपर प्राइज लॉटरीसाठी 250 रुपयांचे तिकीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला (बंपर प्राईझ लॉटरी विशेष प्रसंगी जसे की सणावाराला सरकारतर्फे जारी केल्या जातात).
72 वर्षीय कुट्टिमलू सांगत होत्या की, "राधा जेव्हा या लॉटरीच्या तिकिटासाठी पैसे गोळा करत होती तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते."
"त्यानंतर आमच्याच समूहाच्या चेरुमन्नील बेबी (या समूहाच्या आणखीन एक सदस्य) म्हणाली की, तिच्याकडे 25 रुपये आहेत आणि त्यातले अर्धे ती मला तिकिटासाठी उसने देऊ शकते."
त्यानंतर मग कुट्टिमलू आणि बेबी यांनी मिळून साडेबारा रुपये दिले आणि एक तिकीट खरेदी केलं समूहाच्या इतर महिलांनी मात्र प्रत्येकी 25 रुपये देऊन एकेक तिकीट खरेदी केलं.
कुट्टिमलू म्हणतात की, "आम्ही दोघींनी असं ठरवलं होतं की जर या लॉटरीचं बक्षीस म्हणून काही पैसे मिळाले तर आम्ही ते पैसे समसमान वाटून घेऊ. मात्र आम्हाला कधीही वाटलं नव्हतं की आम्ही एवढी मोठी रक्कम जिंकू."
खरंतर या लॉटरीचा निकाल लागल्याच्या एक दिवसानंतर या महिलांना त्यांनी ही रक्कम जिंकल्याचं कळलं होतं. कारण यापैकी एका महिलेने त्यांच्या नवऱ्याला हा निकाल लागलाय का ते बघायला सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
राधा म्हणतात की, "बंपर प्राइज लॉटरीसाठी तिकीट खरेदी करण्याची ही आमची चौथी वेळ होती. चारदा तिकीट खरेदी केल्यावर अखेर आम्ही नशीबवान ठरलो."
62 वर्षीय बेबी यांना वाटतं की त्यांनी ही लॉटरी जिंकलीय यावर त्यांचा विश्वासच बसत नाहीये.
त्या म्हणतात की, "माझं नशीब कधीच चांगलं नव्हतं."
2018 मध्ये केरळला आलेल्या पुरात त्यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं. आता लॉटरीच्या पैश्यातून त्यांना घर बांधून डोक्यावर असलेलं कर्ज फेडायचंय.
इतर महिलांच्याही गोष्टी अशाच
50 वर्षीय के. बिंदू यांच्या पतीचा किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा पैसा मात्र या कुटुंबाकडे त्यावेळी नव्हता.
त्या म्हणतात की, "घर चालविण्यासाठी मी वाचवलेल्या पैशातून माझा नवरा लॉटरीचं तिकीट खरेदी करायचा. घराचं बांधकाम सुरु होतं पण ते पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. आता या पैशातून मला घर बांधावं लागेल."
बिंदूंना त्यांच्या 15 वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी या पैश्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून तिला नोकरी मिळू शकेल.
49 वर्षीय लक्ष्मी म्हणतात की, "ज्या दिवशी आम्ही लॉटरी जिंकल्याचं कळलं त्याच्या आदल्या रात्री आम्ही आमच्या कुटुंबाच्या भविष्याबाबत खूप चिंतीत होतो. राज्यात सुरु असलेल्या प्रचंड पावसामुळे बांधकाम मजूर म्हणून काम करणाऱ्या माझ्या पतीला कामच मिळत नव्हतं."
आता या पैश्यांचा वापर करून त्यांच्या मुलीचं शिक्षण आरामात होईल म्हणूनही हे दोघे नवरा बायको समाधानी आहेत.
56 वर्षीय लीला यांच्यासमोर त्यांच्या मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा पैसा उभारण्याचा मोठा प्रश्न होता. त्या म्हणतात की, "माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी माझं घर गहाण ठेवून आधीच कर्ज काढलं होतं."

फोटो स्रोत, CANVA
आता सरकारचा कर भरल्यानंतर या महिलांना 63 कोटी रुपये मिळतील. त्यामुळे आता बेबी आणि कुट्टिमलू यांच्या वाट्याला येणारे 6.3 कोटी रुपये त्या दोघी अर्धे अर्धे वाटून घेतील आणि इतर नऊ जणींना मात्र प्रत्येकी 6.3 कोटी रुपये मिळतील.
सुचित्वा मिशनचे संचालक केटी बालाभास्करन म्हणतात की, "कचरा गोळा करण्याव्यतिरिक्त या महिला सार्वजनिक शौचालये बांधण्यात आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी लागणाऱ्या सुविधा बसविण्यातही मदत करतात." सुचित्वा मिशन ही संस्था राज्यभर या क्षेत्रात काम करते.
या महिलांचं आयुष्य बदलू शकणारी ही लॉटरी जिंकल्यानंतरही या अकराजणी त्यादिवशी नेहमीप्रमाणे सुचित्वा मिशनच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांचं नेहमीच काम करू लागल्या.
लीला म्हणतात की, "आम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ठरवली होती की आमचं नशीब बदलणारी ही नोकरी आम्ही कधीही सोडणार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








