मजूर टंचाईवर उपाय म्हणून 35 प्रकारचे शेती अवजारं बनवणारं इंजिनियर मित्रांचं स्टार्टअप

अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे यांनी बनवलेलं पॉवर वीडरवरील वखर.
फोटो कॅप्शन, अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे यांनी बनवलेलं पॉवर वीडरवरील वखर.
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे हे दोघे इंजिनियरिंचे वर्गमित्र. दोघेही मेकॅनिकल इंजिनियर.

पुण्यात काही वर्षं नोकरी केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरू करावा, असं दोघांना वाटलं आणि ते गावाकडे म्हणजेच अकोल्याला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं.

आज त्यांच्या स्टार्टअपची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जात आहे.

20 जून 2023 रोजी, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि अटल इनोव्हेशन मिशन, NITI आयोग यांच्यातर्फे यावर्षीचा 'युवा को:लॅब' कार्यक्रमांतर्गत 'लैंगिक व समानता आणि महिला आर्थिक सक्षमीकरण', या थीमअंतर्गत अक्षयच्या स्टार्टअपला देशपातळीवर नुकताच 2 लाख 40 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला.

अकोला स्टार्टअप

फोटो स्रोत, AKSHAY VAIRALE

या दोघांनी तयार केलेल्या यंत्रामुळे स्थानिक महिलांना शेतीतली कामं करणं सोपं होत आहे.

शेतकरी महिलांसाठी अधिकाअधिक यंत्र बनवण्याचा या दोघांचं उद्दिष्ट आहे.

आयडिया कशी सुचली?

अक्षय वैराळेच्या घरी 5 एकर शेतजमीन आहे. वडील एमएसईबीमधून निवृत्त झाल्यानंतर शेतीची कामं तेच करून घेत आहेत.

वडिलांसोबतच्या चर्चेत शेतीसमोर शेतजमुरांची टंचाई हा गंभीर प्रश्न असल्याचं अक्षयच्या लक्षात आलं.

आणि मग यावर त्यांनी काम करायचं ठरवलं.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

अक्षय वैराळे सांगतो, “माझ्या घरी 5 एकर शेती आहे. कोरडवाहू प्रकारची शेती असल्यामुळे एक टाईमच शेती होते. वडील शेतीत काम करायचे, त्यांच्यासोबत शेतीविषयी चर्चा व्हायची तेव्हा वडिलांकडून जी काही उत्तरं यायची त्यात मुख्य म्हणजे मजुरांची खूप जास्त प्रमाणात टंचाई आहे हे लक्षात यायचं.

“एकतर मजूर जे दोन-चार दिवसात येणार होते ते आठ-पंधरा दिवस येत नाही. तसंच एका एकरासाठी दोन-तीन हजार खर्च अपेक्षित असताना मजूर चार ते पाच हजार रुपये सांगायचे. हे एक मुख्य कारण होतं.”

 ‘अॅग्रोशुअर प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड’

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

दुसरं कारण म्हणजे अकोल्यासारख्या ठिकाणी स्वत:चा व्यवसाय सुरू करावा आणि त्यातून काही जणांच्या हाताला काम द्यावं, स्टार्टअप सुरू करण्यामागे हाही उद्देश असल्याचं अक्षय सांगतो.

अकोल्यातील शिवणी परिसरात ‘अॅग्रोशुअर प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी आहे.

ही कंपनी शेतीसाठी लागणारी अवजारं तयार करते. यातील काही अवजारं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं वापरता येणारी आहेत, तर काही स्वयंचलित आहेत.

अक्षय वैराळे सांगतो, “आमची कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंग करते. शेतीची अवजारं आम्ही बनवतो. ट्रॅक्टरवरील 20 ते 25 प्रकारची अवजारं आम्ही बनवतो. त्यानंतर पॉवर विडर्स आणि पॉवर टिलर्सवर आम्ही 5 ते 6 प्रकारची अवजारं बनवतो.

शेती अवजारं

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

“जमीन तयार करण्यापासून ते कापणीपर्यंत विविध अवजारे बनवतो. यामध्ये जवळजवळ 35 प्रकारची विविध अवजारं आम्ही बनवतो.”

नोकरी सोडून स्टार्टअप सुरू करायचा म्हटल्यावर दोघांच्याही घरच्यांनी त्यांना थोडा विरोध केला. पण, दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि काम सुरू केलं.

पाठबळ आणि पुढची वाटचाल

ॲग्रोश्युअरच्या माध्यमातून या दोघांनी मिनी दालमिल, पॉवर विडर, कांदा पेरणी यंत्र, बेड मेकर, मल्चिंग यंत्र या अवजारांची निर्मिती केली.

कौशल्य विकास विभागामार्फत स्थापित जिल्हा नाविन्यता परिषदेकडूनही त्यांच्या संकल्पनांना चालना देण्यात आली. त्यांना पाच लाख रुपयांचं अनुदान मिळालं.

पुढे त्यांच्या स्टार्टअपला आयआयटी कानपूर संस्थेकडून स्टार्टअपला 10 लाखांचं फंडिंग मिळालं आणि या दोघांनी अवजार निर्मितीचं काम विस्तारण्यास सुरुवात केली.

कामाची विभागणी करताना दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या.

अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, अक्षय वैराळे आणि अक्षय कवळे

अक्षय कवळे सांगतो, “मला सुरुवातीपासूनच मशिनरी कशा तयार केल्या जातात याच्यामध्ये इंटरेस्ट होता. त्यामुळे कामाची विभागणी करताना कंपनीचं प्रोडक्शन सांभाळणं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अक्टिव्हिटी बघणं माझी जबाबदारी आहे.

"माझा जो को-फाऊंडर आहे अक्षय वैराळे त्याची जबाबदारी आहे शेतकऱ्यांशी संवाद साधणं आणि सेल्स-मार्केटिंगची.”

अवजारं अनुदानास पात्र

कंपनीकडून बनवण्यात येणाऱ्या अवजारांचं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून परीक्षण केलं जातं. या दोघांनी बनवलेल्या अवजारांपैकी जवळपास 7 प्रकारची अवजारं ही कृषी विभागाच्या अनुदानास पात्र ठरली आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना या अवजारांवर अनुदान मिळत आहे.

मजूर टंचाईवर यांत्रिकीकरण हा उपाय असल्याचं या दोघांचं म्हणणं आहे.

अक्षय वैराळे सांगतो, “यामुळे मजुरांचा सर्वांत मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे. जे काम करायला 5 ते 6 दिवस लागायचे, ते काम आता 1 ते 2 दिवसात होणार आहे. याशिवाय हेच अवजारं दुसऱ्याच्या शेतात भाड्यानं देऊन शेतकऱ्यांना दुसरा उत्पन्नाचा स्रोत निर्माण झालेला आहे.”

शेती अवजारे

फोटो स्रोत, shrikant bangale

महाराष्ट्रभर 6 ठिकाणी कंपनीच्या अवजारांचे अधिकृत विक्रेते आहेत आणि सोशल मीडियावरील मार्केटिंगच्या जोरावर ही अवजारं विकली जात आहेत.

सध्या त्यांच्या कंपनीत महिन्याभरात 30 अवजारं तयार होतात, ही संख्या त्यांना 80 पर्यंत न्यायची आहे. त्यासाठी त्यांना स्वत:चं युनिट सुरू करायचं आहे.

अक्षय कवळे सांगतो, “आतापर्यंत आपण जवळपास 1400 ते 1500 शेतकऱ्यांपर्यंत ही उपकरणं पोहचवली आहेत. यात प्रामुख्यानं मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातही आपलं अवजारं गेलेली आहेत.”

अक्षयच्या कंपनीनं 8 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale

फोटो कॅप्शन, अक्षयच्या कंपनीनं 8 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

‘अॅग्रोशुअर प्रोडक्ट्स अँड इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड’ची सध्याची वार्षिक उलाढाल 80 लाखापर्यंत आहे.

या स्टार्टअपच्या माध्यमातून त्यांनी 8 जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

या स्टार्टअपची सरकारच्या ‘अटल इनोव्हेटिव मिशन’ या उपक्रमासाठी नुकतीच निवड झाली आहे.

आता या माध्यमातून देशभरातील जास्तीस्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचं या तरुण उद्योजकांचं उद्दिष्ट आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)