फवारणी करताना भावाला विषबाधा, मग त्यानं बनवलं असं यंत्र ज्यामुळे सुरू झालं स्वतःचं स्टार्ट अप

 योगेशनं बनवलेलं फवारणी यंत्र

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, योगेशनं बनवलेलं फवारणी यंत्र
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

योगेश गावंडे हा तरुण कॉलेजला असताना त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडला. तो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या चित्ते पिंपगळगावात राहतो.

इंजिनियरिंगला संभाजीनगरमधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तो पहिल्या वर्षी होता. त्यावेळी शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना त्याच्या चुलत भावाला विषबाधा झाली.

या घटनेनं योगेशच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं. पुढे याचं रुपांतर एका स्टार्टअप कंपनीत झालं.

आज याच स्टार्ट अप कंपनीत तयार होणाऱ्या फवारणी यंत्रांना देश-विदेशातून मागणी वाढली आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

पण, आपल्या प्रवासाची सुरुवात ज्या प्रसंगांमुळे झाली, तो प्रसंग योगेशला लख्ख आठवतो.

अशी झाली सुरुवात...

योगेश सांगतो, “इंजिनियरिंगच्या फर्स्ट इयरला असताना माझ्या चुलत भावाला शेतात औषधांची फवारणी करताना विषबाधा झाली. तो हॉस्पिटलला अॅडमिट असताना माझ्या वडिलांनी मला सांगितलं की, तुम्ही इंजिनियरिंग करताय, तर आमच्यासाठीपण काहीतरी करा. माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी पण काहीतरी करा.”

योगेशचे आई-वडील शेती करतात.

योगेशनं वडिलांचा हा सल्ला मनावर घेत इंजिनियरिंगला असताना एक फवारणी यंत्र बनवलं.

त्याच्या या यंत्राला कॉलेजच्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. दुसऱ्या एका कॉलेजच्या स्पर्धेत या यंत्राला दीड हजार रुपये बक्षीस मिळालं.

योगेश गावंडे

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

त्यानंतर मग यंत्राच्या विक्रीतून पैसे मिळू शकतात, याची खात्री त्याला पटली आणि त्यानं आपलं प्रोडक्ट कर्मशियलाईज करायला सुरुवात केली.

योगेश सांगतो, “2016 डिसेंबरमध्ये, महाअॅग्रोचं एक प्रदर्शन संभाजीनगरच्या आरटीओ ऑफिसच्या समोरच्या ग्राऊंडवर भरलं होतं. तिथं आम्हाला आमच्या सरांच्या मदतीनं फ्रीमध्ये स्टॉल मिळाला. पहिल्यांदा आम्ही त्या प्रदर्शनात शेतकऱ्यांसमोर मशीन ठेवलं. तिथून आम्हाला जवळपास 60 ते 65 मशीन्सची ऑर्डर मिळाली.”

कॉलेज संपेपर्यंत 10 लाखांची उलाढाल

यानंतर योगेशचा आत्मविश्वास चांगलाच बळावला. 2018 ला कॉलेज संपेपर्यत योगेशनं 500 हून अधिक फवारणी यंत्रांची विक्री केली. यातून 10 लाखांची उलाढाल केली.

पुढचं एक वर्षं त्यानं या प्रॉडक्टवर अधिक काम केलं आणि 2019 मध्ये स्वत:ची स्टार्टअप कंपनी सुरू केली.

तो सांगतो, “कंपनी सुरू केल्यानंतर आम्हाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील उत्कर्ष अॅग्रीबिझनेस इन्क्यूबेशन सेंटरची आम्हाला मिळाली. राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) या योजनेतून आम्हाला फंडिंग मिळालं. त्यातून आम्ही आमचा नवीन प्रोडक्ट डेव्हलप केला. त्याचं आम्ही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून टेस्टिंग करुन घेतलं.”

योगेश यांच्या फवारणी यंत्र निर्मितीचा कारखाना संभाजीनगरमधल्या वाळूज एमआयडीसीमध्ये आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, योगेश यांच्या फवारणी यंत्र निर्मितीचा कारखाना संभाजीनगरमधल्या वाळूज एमआयडीसीमध्ये आहे.

संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरात असलेली ही ‘नियो फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी सध्या 4 ते 5 प्रकारचे फवारणी यंत्र बनवते. यात स्वयंचलित, बॅटरीवर चालणाऱ्या यंत्रांचा समावेश आहे.

पाईप कटिंग, वेल्डिंग, ग्राईंडिंग आणि असेंबलिंग या प्रक्रियेतून गेल्यावर यंत्र तयार होतं.

फवारणी यंत्राचे फायदे काय?

पारंपरिक फवारणीचा पंप पाठीवर घेऊन फवारणी करावी लागते. यामुळे विषबाधा होण्याची शक्यता असते. किंबहुना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यूही झाल्याची प्रकरणं अनेकदा समोर आली आहे.

त्यामुळे या फवारणी यंत्राचे फायदे काय आहेत, या प्रश्नावर योगेश सांगतो, “नियो स्प्रे पंपमध्ये तुम्हाला पाठीवर पंप घ्यायची गरज नाही. तुम्हाला फक्त हँडल पकडून ढकलायचं आहे. त्यामुळे औषध अंगावर येणं, सांडणं, विषबाधा होणं, अंगाची खाज होणं या सगळ्या प्रॉब्लेम्सपासून तुम्ही वाचू शकता. चार माणसांचं काम हे एकटं मशीन करतं.

“पाठीवरच्या पंपानं एक एकर फवारणीसाठी जिथं दीड ते दोन तास लागतात, तिथं तुम्ही 20 ते 30 मिनिटांत एक एकर क्षेत्र फवारू शकता.”

नियो फार्मटेक कंपनी लिमिटेड

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या योगेशनं आजवर 4 हजारहून अधिक यंत्रं विकलीत. देशातील 20 हून अधिक राज्यांत आणि केनियासारख्या देशांपर्यंत हे यंत्र पोहचलंय.

तो सांगतो, “पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 20 ते 21 लाखांचा बिझनेस केला. त्यानंतर कोव्हिड आला. त्यात आम्ही सस्टेन करू शकलो. आम्ही 22 लाखांची उलाढाल केली. त्यानंतर 55 लाख आणि मागच्या वर्षी आम्ही 1 कोटींचा टर्नओव्हर क्रॉस केला.”

पुढचं पाऊल...

योगेश आता स्वयंचलित इलेक्ट्रिक फवारणी यंत्राची निर्मिती करणार आहे. यासाठी त्याच्या स्टार्टअपला अटल न्यू इंडिया चॅलेंज या कार्यक्रमाअंतर्गत नीती आयोग आर्थिक मदत करतंय.

योगेश सांगतो, “आपली जशी इलेक्ट्रिक स्कूटर असते तर तशा पद्धतीचच आम्ही एक इलेक्ट्रिक स्प्रेयर बनवतोय. ज्यामध्ये शेतकऱ्याला ढकलायची गरज नाही. ते मशीन स्वत: चालेलसुद्धा आणि फवारणीही करेल.”

योगेश सध्या त्याचा बिझनेस विस्तारण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यानं वाळूज येथेच नवीन जागा घेतली आहे. जिथं सध्या दुरुस्तीचं काम सुरू आहे.

योगेश यांनी 6 जणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc

पण, योगेशच्या स्टार्टअपच्या यशाचा मूलमंत्र काय आहे?

“मूळात आपण काय सर्व्हिस देतोय, काय प्रोडक्ट बनवतोय आणि तो लोकांच्या खरंच किती गरजेचा आहे, त्यासाठी लोक आपल्याला पैसे द्यायला तयार आहेत का हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे.”

सध्या योगेशला एका खासगी कंपनीकडून 1000 यंत्रांची ऑर्डर मिळाली आहे. ती पूर्ण करण्यासाठी तो मेहनत घेत आहे.

योगेशनं या स्टार्टअपच्या माध्यमातून 6 जणांना रोजगार मिळवून दिला आहे.

फवारणी यंत्राच्या प्रकारानुसार त्याची किंमत 10 हजारांपासून सुरू होते.

आता हे फवारणी यंत्र सरकारी अनुदानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी योगेश प्रयत्न करत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)