श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे अवशेष कुटुंबियांना का दिले नाहीत? वर्षभरानंतरही अंत्यसंस्कार नाहीत

श्रद्धा वालकर

फोटो स्रोत, ANI

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खटल्यादरम्यान नवी माहिती समोर आलीय. श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष ‘केस प्रॉपर्टी’ असल्यानं खटला पूर्ण होईपर्यंत कुटुंबीयांकडे सोपवले जाऊ शकत नाहीत. पर्यायानं वर्षभरानंतरही श्रद्धा वालकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण वर्षभरापूर्वी प्रचंड गाजलं होतं. या प्रकरणाचा आता खटला सुरू आहे. आजच्या दिवसाची या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर श्रद्धाचे वडील विकास वालकर आणि वकील सीमा कुशवाह यांनी एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली.

गेल्यावर्षी म्हणजे 18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकरची तिचा लिव्ह-इन पार्टनर असलेल्या आफताब पुनावाला यानं हत्या केल्याचा आरोप आहे. या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी आफताब पुनवाला याला अटकही केलीय.

आफताबनं श्रद्धाचे तुकडे करून दिल्लीतल्या मेहरौली भागातील जंगलात फेकल्याचा आरोप आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात एकच गदारोळ माजला होता.

हे प्रकरण काय आहे, हे आपण पाहू. तत्पूर्वी, कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या आजच्या कामकाजानंतर श्रद्धाचे वडील आणि वकील यांनी काय माहिती दिली, हे जाणून घेऊ.

गुन्हेगाराला फाशी होईपर्यंत लढेन – विकास वालकर

श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी या खटल्यानिमित्त वारंवार दिल्लीत यावं लागत असल्यानं अडचणी येत असल्याची तक्रार एएनआयशी बोलताना व्यक्त केली. समोरील वकील म्हणजे आफताबचे वकील जाणीवपूर्वक वेळ वाया घालवत असल्याचं विकास वालकर म्हणाले.

विकास वालकर म्हणाले की, “माझ्या मुलाचा जबाब घेणं अद्याप बाकी आहे. चारवेळा समोरच्या वकिलानं पुढची तारीख मागितली. माझ्या मुलाचं कॉलेज असतं. त्याला वारंवार दिल्लीत यावं लागतं. माझी आई सुद्धा आजारी असते. ती 85 वर्षांची आहे. या सर्व अडचणींचा सामना करून इथं यावं लागतं.

विकास वालकर

फोटो स्रोत, PRAJAKTA POL/BBC

“ज्या स्थितीतून मी जातोय, ते कुणलाही कळू शकत नाही. तरीही शेवटपर्यंत लढून, गुन्हेगाराला फाशी होत नाही, तोपर्यंत लढेन.”

तसंच, ते पुढे म्हणाले की, “फास्ट ट्रॅकवर खटला चालतोय खरा, पण ज्या वेगात चालायला हवा, तेवढा वेग दिसत नाही.”

श्रद्धाच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार नाहीत - वकील

वकील सीमा कुशवाह या विकास वालकर यांच्या बाजूनं कोर्टात लढत आहेत.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष हे ‘केस प्रॉपर्टी’ आहेत. त्यामुळे जोपर्यंत खटला चालू राहील, तोपर्यंत श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करता येणार नाहीत. त्यामुळेच श्रद्धाचा मृतदेह तिच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला नाही.”

कुशवाह यांनी पुढे सांगितलं की, “आज (31 जुलै) सात लोकांचे जबाब नोंदवले गेलेत. त्यातला महत्त्वाचा जबाब म्हणजे श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचा जबाब होता. जबाब देताना विकास वालकर कोर्टात रडू लागले. त्यामुळे वेळ गेल्यानं पुढच्या वेळी जबाब नोंदवला जाईल. श्रद्धाचा भाऊ श्रीधर वालकर यांना क्रॉस करण्यासाठी समोरचा वकील वारंवार तारखा घेत आहे.”

आफताब पुनावाला

फोटो स्रोत, ANI

तसंच, वारंवार पुढच्या तारखा घेत राहिल्यास फास्ट ट्रॅकला अर्थ उरणार नाही, पण मला न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास आहे, असंही कुशवाह म्हणाल्या.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण नेमकं काय आहे?

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पुनावालाविरोधात 6,629 पानी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, पोलीस तपासात काय काय आढळलं, हे पहिल्यांदा अधिकृतपणे उघड झालं.

आरोपपत्रानुसार, 18 मे 2022 रोजी आफताब पुनावालानं श्रद्धा वालकरची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले. ते तुकडे फ्रीज आणि कपाटात लपवून ठेवले.

श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला हे लिव्ह-इन पार्टनर म्हणून दिल्लीत राहत होते.

आधी चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

श्रद्धाचा मृतदेह जाळून राखेची विल्हेवाट लावली आणि तिच्या हाडांची भुकटी करून ती फेकून दिली, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे कबूल केले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणी तपासाला वेग आला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ठिकाणी टाकले, त्या ठिकाणी पोलिसांनी आफताब पुनावालाला 15 नोव्हेंबर 2023 रोजी नेलं होतं.

श्रद्धा वालकर

फोटो स्रोत, ANI

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब आणि श्रद्धा वालकर मुंबईत काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं.

मुलीचे कुटुंबीय महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहतात. कुटुंबियांच्या नाराजीमुळे ते दोघेही दिल्लीत आले आणि छत्तरपूर भागात घर भाड्याने घेऊन राहायला लागले, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी सांगितलं की, मुलीने जेव्हा आफताबला लग्नासाठी आग्रह करायला सुरूवात केली, तेव्हा दोघांमध्ये वाद व्हायला लागले.

18 मे 2022 रोजीही त्या दोघांमध्ये लग्नावरूनच भांडण सुरु झालं आणि चिडलेल्या आफताबने गळा दाबून तिची हत्या केली.

दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (दक्षिण) अंकित चौहान यांनी माहिती दिली होती की, “प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं आफताबने कबूल केलं आहे. मृतदेहामधून दुर्गंध येऊ नये म्हणून त्यानं एका मोठ्या आकाराचा फ्रीज खरेदी केला आणि त्यात ते तुकडे ठेवले. रात्रीच्या वेळी तो थोडे थोडे तुकडे घेऊन जायचा आणि वेगवेगळ्या भागात जंगलामध्ये टाकून द्यायचा.”

हत्येचं गूढ कसं उलगडलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

श्रद्धा आपल्याला भेटायला आली होती आणि तिने तिच्या तक्रारीही सांगितल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला. त्यानंतर वडिलांनी श्रद्धाला आफताबला सोडून दे असा सल्ला दिला, पण त्यानं माफी मागितल्यावर ती त्याच्यासोबत गेली.

श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, “माझं ऐकलं नाही म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. पण सप्टेंबर महिन्यात श्रद्धाच्या एका मैत्रिणीने तिच्या भावाला फोन करून सांगितलं की, दोन महिन्यांपासून श्रद्धाचा फोन बंद येत आहे. श्रद्धाचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी महाराष्ट्रातल्या माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली.

“एफआयआरमध्ये त्यांनी आफताबच्या श्रद्धासोबतच्या नात्याचाही उल्लेख केला. श्रद्धाच्या गायब होण्यामागे आफताबचा हात असू शकतो, असाही संशय त्यांनी व्यक्त केला. श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आफताबचा शोध घ्यायला सुरूवात केली.

“अटकेनंतर चौकशीच्या वेळी आफताबने हे कबूल केलं की, लग्नावरून दोघांमध्ये वाद-विवाद झाले होते आणि त्याने रागानं तिची हत्या केली.”

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त