'आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सांगितले..'

फोटो स्रोत, social media
देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पूनावालाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रातील काही गोष्टी समोर न्यायालयीन सुनावणीत समोर येत आहेत. पोलिसांची दिशाभूल व्हावी या हेतूने आफताबने पोलिसांनी सांगितले होते की श्रद्धाचा मृतदेह जाळून तिच्या राखेची विल्हेवाट लावली.
यात 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 17 तुकडे केले आणि ते फ्रीज तसेच कपाटात लपवून ठेवल्याचे म्हटलं आहे. आफताबचे वकील एम. एस. खान यांनी खटल्यावेळी आपले म्हणणे मांडले जाईल, असं सांगितलं.
आफताबने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबावर आधारित असलेले 6,629 पानी आरोपपत्र दिल्लीतील न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
आधी चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. आपण श्रद्धाचा मृतदेह जाळून राखेची विल्हेवाट लावली आणि तिच्या हाडांची भुकटी करून ती फेकून दिली, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केल्याचे कबूल केले, असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे.
श्रद्धा वालकर प्रकरणी तपासाला वेग आला आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ज्या ठिकाणी टाकले, त्या ठिकाणी पोलिसांनी आफताब पुनावालाला आज सकाळी (15 नोव्हेंबर) नेलं होतं.
आपल्या प्रेयसीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.
सहा महिन्यांपूर्वी दिल्लीतल्या मेहरौली भागात झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा गुंता सोडविल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.
लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आफताब पुनावाला नावाच्या व्यक्तिला अटक केली आहे. आफताबने 18 मे रोजी आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची हत्या केली आणि मग तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा आरोप आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आफताब आणि श्रद्धा वालकर मुंबईत काम करताना एकमेकांच्या जवळ आले होते. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं.
मुलीचे कुटुंबीय महाराष्ट्रातील पालघरमध्ये राहतात. कुटुंबियांच्या नाराजीमुळे ते दोघेही दिल्लीत आले आणि छत्तरपूर भागात घर भाड्याने घेऊन राहायला लागले, असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी सांगितलं की, मुलीने जेव्हा आफताबला लग्नासाठी आग्रह करायला सुरूवात केली, तेव्हा दोघांमध्ये वाद व्हायला लागले.
18 मे रोजीही त्या दोघांमध्ये लग्नावरूनच भांडण सुरु झालं आणि चिडलेल्या आफताबने गळा दाबून तिची हत्या केली.
दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त (दक्षिण) अंकित चौहान यांनी म्हटलं, “प्रेयसीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं आफताबने कबूल केलं आहे. मृतदेहामधून दुर्गंध येऊ नये म्हणून त्यानं एका मोठ्या आकाराचा फ्रीज खरेदी केला आणि त्यात ते तुकडे ठेवले. रात्रीच्या वेळी तो थोडे थोडे तुकडे घेऊन जायचा आणि वेगवेगळ्या भागात जंगलामध्ये टाकून द्यायचा.”

फोटो स्रोत, ANI
एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांना पोलिसांकडून याप्रकरणातील एफआयआरची कॉपी मिळाली आहे. त्यातून अनेक महत्त्वाचे दुवे समोर आले आहेत.
श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांमध्ये जी तक्रार दाखल केली त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, ते आणि त्यांच्या पत्नी काही वर्षांपूर्वी विभक्त झाले होते. महाराष्ट्रात ते आपल्या आईसोबत राहायचे.
त्यांची मुलगी श्रद्धा 2018 मध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथेच तिची ओळख आफताब पूनावाला नावाच्या तरुणाशी झाली.
श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार, “2019 मध्ये श्रद्धाने आपल्या आईला सांगितलं होतं की, तिला आफताबसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. पण माझ्या पत्नीने या गोष्टीला परवानही दिली नाही. कारण आमच्यात दुसऱ्या धर्मात किंवा जातीमध्ये लग्न होत नाही.
आईने नकार दिल्यावरही श्रद्धानं ऐकलं नाही. मी 25 वर्षांची आहे आणि मला माझे निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं तिने म्हटलं.”
याच मुद्द्यावरून श्रद्धाचं तिच्या आईसोबत भांडण झालं आणि ती घरातून बाहेर पडून आफताब सोबत राहायला लागली.
एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे “श्रद्धा आणि आफताब काही काळ नायगावमध्ये राहिले आणि मग पुन्हा वसई भागात राहायला लागले. माझी मुलगी अधूनमधून तिच्या आईला फोन करायची. आफताब तिला मारहाण करतो अशी तक्रारही करायची.”
हत्येचं गूढ कसं उलगडलं?

श्रद्धा आपल्याला भेटायला आली होती आणि तिने तिच्या तक्रारीही सांगितल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे.
त्यानंतर वडिलांनी श्रद्धाला आफताबला सोडून दे असा सल्ला दिला, पण त्यानं माफी मागितल्यावर ती त्याच्यासोबत गेली.
श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, माझं ऐकलं नाही म्हणून त्यांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. पण सप्टेंबर महिन्यात श्रद्धाच्या एका मैत्रिणीने तिच्या भावाला फोन करून सांगितलं की, दोन महिन्यांपासून श्रद्धाचा फोन बंद येत आहे. श्रद्धाचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे तिच्या वडिलांनी महाराष्ट्रातल्या माणिकपूर पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली. एफआयआरमध्ये त्यांनी आफताबच्या श्रद्धासोबतच्या नात्याचाही उल्लेख केला. श्रद्धाच्या गायब होण्यामागे आफताबचा हात असू शकतो, असाही संशय त्यांनी व्यक्त केला. श्रद्धाच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आफताबचा शोध घ्यायला सुरूवात केली. अटकेनंतर चौकशीच्या वेळी आफताबने हे कबूल केलं की, लग्नावरून दोघांमध्ये वाद-विवाद झाले होते आणि त्याने रागानं तिची हत्या केली.
हेही वाचलंत का?
डेटिंग अॅपवर भेटले होते दोघे
दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) अंकित यांनी म्हटलं, "मुलीशी काहीच संपर्क होत नाहीये म्हटल्यावर वडिलांना ती बेपत्ता असल्याचं जाणवलं. त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं की, तिचं शेवटचं लोकेशन दिल्लीमधलं होतं. त्यानंतर मग मुलीच्या नातेवाईकांनी दिल्लीतल्या मेहरौली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली."
ते दोघंजण डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेटले होते. मुंबईमध्ये ते दोघे लिव्ह इनमध्ये राहात होते. दिल्लीमध्येही सोबत राहायचे. त्यांच्या दरम्यान अनेकदा वादविवाद व्हायचे. मारहाण व्हायची.
पोलिसांनी सांगितलं की, सर्व डिजिटल आणि वैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत आणि पोलिस त्यांचा तपास करत आहेत. ज्यामध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले होते, तो फ्रिजही पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांचं म्हणणं आहे की, आफताबच्या जबाबानुसार मेहरौलीच्या जंगलातून हाडं जप्त करण्यात आली आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









