ऑनर किलिंग : 'भावाने तिच्या कापलेल्या मुंडक्यासोबत सेल्फी काढला, कपडे बदलले आणि पोलिसात गेला'

फोटो स्रोत, Avinash Thore
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(या बातमीतले काही तपशील तुम्हाला विचलित, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करू शकतात.)
"बाई, अशी दनादना चालायची घरात. पूर्ण घरभर तिचा वावर असायचा.अजूनही वाटतं ती इथेच आहे. तिचाच भास होतो कायम," त्या बाई मला हुंदके देत सांगत होत्या.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातल्या लाडगावमध्ये ज्या कीर्ती मोटे-थोरे हिचा अमानुष खून झाला, तिच्या त्या सासूबाई.
आम्ही लाडगावाला पोहचलो तेव्हा कोणत्याही गावात सकाळी असते तशी लगबग दिसली. कोणाकडे तरी कीर्तन चालू होतं, त्याचा आवाज गावात घुमत होता. बाजारात नेहमीसारखी गर्दी होती.
इथून काही अंतरावर थोरेंच्या शेतात रविवारी, 5 डिसेंबरला कीर्ती उर्फ किशोरी मोटे-थोरेची तिच्याच भावाने आणि आईने अतिशय अमानुषपणे हत्या केली.
कोयत्याने वार करून तिचं शीर धडावेगळं केलं आणि ते शीर तसंच पकडून भावाने बाहेर ओट्यावर आणून ठेवलं.
घरच्याच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणून त्यांनी असं केलं.
त्या दिवशी नक्की काय झालं?
कीर्तीचे सासरे अविनाशचे वडील संजय थोरे सांगतात, "त्या दिवशी आम्ही (कीर्तीचे सासू-सासरे) वावरात कापूस निंदायला गेलो होते. ती इथेच होती."
"थोरेंच्या भावकीतली सगळी शेतं आसपास आहेत. तिच्या चुलत सासूबाई घरासमोरच काम करत होत्या. शेजारी असणाऱ्या घरात तिच्या आजेसासूबाई होत्या. घरात अविनाशची तब्येत बरी नाही म्हणून तो झोपून होता आणि कीर्ती घराबाजूला जे कांदे लावलेत तिथे निंदणी करत होती."
"ते नेहमीच्या रस्त्याने न येता बाहेरच्या रस्त्याने आले. ती आईला पाहून इतकी खूश झाली. आम्ही कोणी इथे असतो तर त्यांना घरात पण घुसू दिलं नसतं. त्यांनी लग्न झालं तेव्हाच म्हटलं होतं की आमची मुलगी मेली. मग जर ती तेव्हाच मेली होती तर आता यायची काय गरज," तिचे सासरे उद्विग्नपणे म्हणतात.
त्याच्या मागच्याच आठवड्यात तिची आई कीर्तीला भेटून गेली होती. लग्नानंतर सहा महिन्यांनी घरचं कोणी आलं म्हणून ती खूश झाली, आईसोबत सेल्फी काढले. अविनाशलाही वाटलं, वातावरण निवळतंय.
"त्यांच्या मनात असं आहे याची जराही कल्पना आली नाही. उलट आई आली म्हणून ती किती खूश झाली होती," अविनाश भकास चेहऱ्याने सांगतो.
"दिवाळीचा लाडू चिवडा खाऊन गेली ती बाई," तो म्हणतो.

फोटो स्रोत, Mangesh Sonwane
कीर्ती दोन महिन्यांची गर्भवती होती. रविवारी येताना तिच्या आईने तिला सांगितलं तुझ्यासाठी खास गावरान तूप घेऊन येते.
"तो तुपाचा डबा तसाच अजून पडलाय तिथे," कीर्तीच्या सासू पुन्हा रडतात.
"पाच महिन्यात आम्हाला ती इतकी जवळची झाली, तर सख्ख्या आईला असं कसं करवलं असेल?" स्वतःशीच बोलल्यागत त्या प्रश्न विचारतात.
शेजारीच बसलेली बाई म्हणते, "आई असली म्हणून काय झालं, कसायाच्या जल्माला आली असेल ती."
तिथे असलेला त्यांचाच भाचा म्हणतो, "तूप आणलं पण ते शेवटी तिच्या चितेवर घालायलाच. त्याच हेतूने आले होते ते."

फोटो स्रोत, Mangesh Sonwane
कीर्तीची हत्या झाल्यानंतर थोरे कुटुंबाचं राहातं घर पोलिसांनी सील केलंय. बाहेर ओट्यावर जिथे कीर्तीचं धडावेगळं शीर ठेवलं होतं, तिथे अजूनही त्या खुणा आहेत.
कीर्तीने लावलेली फुलंझाडं वारा सुटला की डोलतात... बाकी आता त्या घरात जिवंतपणाचं कोणतंही लक्षण नाही. घरातली मंडळी आता शेजारी भावाच्या घरात राहातात.
भाऊ आणि आई आले म्हणून कीर्ती चहा करायला स्वयंपाक घरात गेली. अविनाश घरात झोपलेलाच होता.
"मांडणीवरचा डबा पडला तो आवाज मला आला म्हणून मी उठलो. मला वाटलं तीच खुर्चीवरून पडली की काय. मी उठून पाहतो तर तिच्या आईने तिचे पाय पकडले होते आणि भाऊ तिच्या मानेवर कोयत्याने वार करत होता. मला पाहून त्याने माझ्यावरही कोयता उगारला, मी बाहेर पळालो आणि काकीला हाक मारली," तो म्हणतो.

फोटो स्रोत, Mangesh Sonwane
समोरच्या शेतात काम करणाऱ्या अविनाशच्या काकू कविता थोरे आणि शेजारच्या घरात असलेली त्याची आजी दोघी धावत आल्या. तोवर तिच्या भावाने तिचं मुंडकं धडावेगळं करून बाहेर ओट्यावर आणलं होतं.
"आम्ही ओरडायला लागलो, आजी रडत रडत गावात पळत गेली. इथे जवळपास कोणीच नव्हतं. हे पण (त्यांचे पती, अविनाशचे काका) वैजापूरला गेले होते. तिच्या आईने तिच्या भावाला सांगितलं आतून कोयता आण. त्याने आणला."
अविनाशला हुंदका फुटतो पण आसपासचे त्याला आवर आवर सांगायला लागतात.
"त्याच्या हातात तिचं शीर होतं. केस पकडून त्याने वर धरलेलं होतं. त्या मुंडक्यासोबत त्याने सेल्फी काढला. ते खाली ओट्यावर ठेवलं आणि ते निघून गेले."
"त्यांच्या लेखी सणच होता म्हणा ना...मुलगी मारली हा त्यांचा सण होता. इथून ते घरी गेले, त्यांनी हातपाय धुतले, रक्ताचे कपडे बदलून चांगले कपडे घातले आणि मग वैजापूर पोलीस स्टेशनात हजर झाले," कीर्तीचे सासरे संजय थोरे म्हणतात.
सध्या हे कुटुंब संजय यांच्या भावाच्या घरात राहात असलं तरी समोरच त्यांचं घर दिसतं. घराशेजारची शेड उघडी आहे, त्यात कांदे तसेच पडलेत.
वारा आला की, तिथे काहीतरी हलतं की यांना पुन्हा धस्स होऊन तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहातो. कीर्तीच्या चुलत सासूबाई, आजेसासूबाई आणि नवरा अविनाश यांनी स्वतःच्या डोळ्यांनी ते होताना पाहिलं आहे.

फोटो स्रोत, Avinash Thore
स्वतःच्या सख्ख्या मुलीला इतक्या निर्घृणपणे ज्यांनी मारलं ते आपल्या मुलाला आता जिवंत सोडतील का ही धास्तीही त्यांना जाणवते, कोणीतरी तीही बोलून दाखवतं.
ज्या भावाने कीर्तीची हत्या केलीये तो तिचा एकटा भाऊ आहे. बारावीपर्यंत शिकून आता शेती करत होता. कीर्ती आणि तो अशी दोनच भावंड.
गावात अशी चर्चा आहे की कीर्तीच्या वडिलांना तिने पळून जाऊन लग्न केलं म्हणून आपली अब्रू गेली असं सतत वाटत होतं.
"ते तिच्या आईला आणि भावाला म्हणायचे, तिचं काहीतरी करा नाहीतर मी स्वतः जीव देतो," तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितलं. तिच्या वडिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यांनी आळंदीला जाऊन ब्राम्हणांच्या साक्षीने लग्न केलं, ते लग्न खोटं ठरवायला निघाले होते. पण कोर्ट मॅरेजही केलं होतं," कविता थोरे सांगतात.
अविनाश-कीर्तीचं लग्न झालं तेव्हा तिच्या घरच्यांनी वैजापूर पोलीस स्टेशन गाठलं. मुलगा-मुलगी सज्ञान होते, दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं, त्यामुळे कायद्याने आता ते पतीपत्नी आहेत असं त्या अधिकाऱ्यांनी तिच्या घरच्यांना सांगितलं.
"ते पोलीस पण सांगत होते, तुम्ही जावई शोधला असता तरी असाच शोधला असता ना? मग आता यालाच जावई माना. आम्ही तर त्यांच्या जमिनीवरचं हक्कसोडपत्र तिथेच लिहून द्यायला तयार होतो. ती म्हणायची, मला घरचं काही नको. जमीन नको, पैसा नको, वावर नको, मला फक्त हा (अविनाश) हवा. त्याच्याशिवाय राहायला ती तयारच नव्हती," संजय म्हणतात.
वाढत्या ऑनर किलिंगच्या घटना
या कुटुंबाला भेटायला यायच्या आधी मी दोन फोटो पाहिले, सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअपवर फिरताहेत ते. एकात स्वयंपाकघरातलं रक्ताच्या थारोळ्यातलं धड दिसतंय.
ते फोटो पाहवले जात नाहीत. भडभडून येतं. खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनांपायी, आम्हाला न विचारता स्वतःच्या लग्नाचा निर्णय घेतलाच कसा या रागाने केलेला अमानुषपणा दिसतो.
अविनाश आणि कीर्ती एकाच कॉलेजमध्ये होते, (एकाच जातीचे होते), प्रेमात पडले आणि सहा महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला.
गेल्या 20 वर्षांची NCRB ची आकडेवारी पाहाल तर त्यांचं प्रमाण 28 टक्क्यांनी वाढलं आहे.
एकट्या 2015 मध्ये ऑनर किलिंगच्या 251 घटना घडल्या होत्या, असं केंद्र सरकारने संसदेत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Avinash Thore
अविनाशने मे महिन्यात व्हॉट्सअपच स्टेटस ठेवलं होतं, ते अजूनही तसंच आहे. त्याने लिहिलंय, "तू ना मला सोडून जायचा विचार पण करू नको. तुझ्याशिवाय मला दोन मिनिटं पण राहाता येत नाही, मग विचार कर पूर्ण आयुष्यभर मी तुझ्याशिवाय का जगू?"
आता त्याला प्रश्न पडलाय इथे कसा राहू मी?
त्या कीर्तनातून अवघाची संसार भजन ऐकू येत येतंय, केळी, सफरचंद विकणाऱ्या माणसाकडे गर्दी आहे, माणसं बाईकवर ट्रिपल सीट बसून घाई घाईने कुठे तरी चाललीत, नाश्ता अँड टी हाऊस ची पाटी चमकतेय, भागवताचं पारायण सुरू आहे... गाव, काळ त्याच्या गतीने पुढे सरकतोय. पण या सगळ्यात कीर्ती नाहीये. आता ती कधीच नसेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)





