वैजापूर ऑनर किलिंग : बहिणीला ठार करणारा भाऊ अल्पवयीन आहे की नाही?

अविनाश - कीर्ती

फोटो स्रोत, Avinash Thore

फोटो कॅप्शन, अविनाश आणि कीर्तीने आळंदीला जाऊन लग्न केलं आणि कोर्टातही लग्न केलं होतं.
    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात लाडगावमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली हे आता एव्हाना महाराष्ट्राला कळून चुकलं आहे.

सख्या भावाने आणि आईने कीर्ती मोटे-थोरे हीचा शिरच्छेद केला कारण तिने घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला होता.

कोयत्याने वार करून भावाने तिचं शीर धडावेगळं केलं आणि ते शीर तसंच पकडून भावाने बाहेर ओट्यावर आणून ठेवलं.

प्रत्यक्षदर्शींनी बीबीसी मराठीला सांगितलं की, या घटनेनंतर तिचा भाऊ आणि आई आपल्या घरी गेले, त्यांनी रक्ताचे कपडे बदलले आणि वैजापूर पोलीस स्टेशनात स्वतःहून खुनाची कबुली द्यायला हजर झाले.

या प्रकरणी शिरच्छेद करणारा भाऊ अल्पवयीन आहे की नाही हा प्रश्न उभा राहिला आहे.

काही माध्यमांनी आरोपी अल्पवयीन नसल्याच्या बातम्या दिल्या आहेत, तर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप केला आहे.

त्यांनी ट्वीट करून म्हटलं की, "आरोपी मुलगा सज्ञान आहे परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे."

काल चित्रा वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, "अंगावर शहारा येईल अशी घटना घडली आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत पण काही गोष्टींवरती मतभेद आहेत. जो मुलीचा भाऊ आहे तो लहान नाहीये, तो अज्ञान नाहीये तर सज्ञान आहे.

"त्याच्या सोबतची, राहाणारी, शिकणारी, एकाच गावातली मंडळी त्याला ओळखतात. पण आता कुठेतरी त्याचा जन्म झाला त्या येवला तालुक्यातले दाखले दाखवले जातात आणि जिथे शिक्षण झालं तिथे त्याचं वय 18 पूर्ण झालं असं दाखवत आहेत."

पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोपही त्यांनी केला.

याप्रकरणी बीबीसी मराठीनं हा गुन्हा जिथे दाखल झालाय त्या वीरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय नरवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "मुलगा अल्पवयीन आहे. आमच्याकडे तशी नोंद झालीये आणि यासाठी आम्ही जन्मतारखेचा दाखला ग्राह्य धरला आहे."

अविनाश थोरे

फोटो स्रोत, Mangesh Sonwane

फोटो कॅप्शन, अविनाश आणि कीर्ती एकाच कॉलेजमध्ये होते. प्रेमात पडून त्यांनी 6 महिन्यांपूर्वी लग्न केलं होतं.

तसंच या दोन्ही आरोपींना वैजापूर न्यायाधीश एस. एस. निचळ यांच्यासमोर हजर केल्यानंतर कीर्तीचा भाऊ अल्पवयीन असल्याचं कोर्टासमोर सिद्ध झालं, त्यामुळे त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर करायचे आदेश दिले तर आईला पोलीस कोठडी सुनावली.

पण कीर्तीच्या सासरच्यांचा दावा आहे की तिचा भाऊ अल्पवयीन नाही आणि त्याला वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत.

बीबीसी मराठीची टीम कीर्तीचा नवरा अविनाश आणि सासरच्या इतर मंडळींना भेटायला गेली असतानाही त्यांचं हेच म्हणणं होतं.

"एवढ्या अमानुष पद्धतीने खून करूनही तो सुटावा म्हणून तो अल्पवयीन असल्याचा ते सांगताहेत," तिचे सासरे संजय थोरे म्हणाले होते.

गुन्हा करूनही तिचा भाऊ सुटून येणार पहा, ही भावनाही अविनाशच्या मामेभावाने बोलून दाखवली.

कीर्ती थोरे हत्याकांडात मुख्य आरोपी असलेला आणि तिचं शीर धडावेगळं करणाऱ्या तिच्या भावाच्या वयाचे दोन दाखले समोर आले आहेत. एक जन्मतारखेचा दाखला ज्यावरून तो अल्पवयीन ठरतो, तर दुसरा शाळेचा दाखला ज्यावरून तो सज्ञान ठरतो.

"अशा वेळेस मेडिकल ऑफिसर तपासणी करून आरोपीचं वय निश्चित करू शकतात. त्या रस्त्याचा अवलंब करायला हवा," सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल म्हणतात.

"गुन्हा कोणी केला लक्षात घ्या, एक बाई आणि लहान मुलगा. समजा तो मुलगा खरंच अल्पवयीन असला तरी ज्यांनी त्यांना हे करायला भाग पाडलं ते घरचे पुरुष तर उजळ माथ्याने बाहेर फिरत आहेत. एका दिवसात तर त्यांनी हा निर्णय घेतला नाही. कोणी ना कोणी त्या आईला आणि भावाला सतत टोचून बोलत असेल, त्यांना भरीला घातलं असेल, त्या पुरुषांविरुद्ध कारवाई नाही का? आमची मागणी आहे की मुलीच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल व्हावा."

मी या घटनेचा ग्राऊंड रिपोर्ट करायला जेव्हा लाडगावात गेले होते तेव्हा काही गावकऱ्यांनी हेही बोलून दाखवलं की, कीर्तीच्या आईलाही तिने घर सोडल्यानंतर बोल लावले गेले.

अविनाश म्हणतो, "तिच्या आईला तिचे वडील बोलायचे सतत. ती (कीर्ती) फोनवर बोलायची तर तुला कसं कळलं नाही, तिने लग्न ठरवलं तर तुला कसं कळलं नाही, तुझ्या डोळ्यादेखत कशी पळून गेली ती. याचाच राग येऊन तिच्या आईने या कृत्यात साथ दिली."

त्या दिवशी नक्की काय झालं?

कीर्तीचे सासरे अविनाशचे वडील संजय थोरे सांगतात, "त्या दिवशी आम्ही (कीर्तीचे सासू-सासरे) वावरात कापूस निंदायला गेलो होते. ती इथेच होती.

"थोरेंच्या भावकीतली सगळी शेतं आसपास आहेत. तिच्या चुलत सासूबाई घरासमोरच काम करत होत्या. शेजारी असणाऱ्या घरात तिच्या आजेसासूबाई होत्या. घरात अविनाशची तब्येत बरी नाही म्हणून तो झोपून होता आणि कीर्ती घराबाजूला जे कांदे लावलेत तिथे निंदणी करत होती."

"ते नेहमीच्या रस्त्याने न येता बाहेरच्या रस्त्याने आले. ती आईला पाहून इतकी खूश झाली. आम्ही कोणी इथे असतो तर त्यांना घरात पण घुसू दिलं नसतं. त्यांनी लग्न झालं तेव्हाच म्हटलं होतं की आमची मुलगी मेली. मग जर ती तेव्हाच मेली होती तर आता यायची काय गरज," तिचे सासरे उद्विग्नपणे म्हणतात.

अविनाशचे वडील

फोटो स्रोत, Mangesh Sonwane

फोटो कॅप्शन, अविनाशचे वडील संजय थोरे

त्याच्या मागच्याच आठवड्यात तिची आई कीर्तीला भेटून गेली होती. लग्नानंतर सहा महिन्यांनी घरचं कोणी आलं म्हणून ती खूश झाली, आईसोबत सेल्फी काढले. अविनाशलाही वाटलं, वातावरण निवळतंय.

आई आणि भाऊ आलेला पाहून काम सोडून कीर्ती आनंदाने पळत आली आणि त्यांना भेटली.

त्यांना पाणी वगैरे देऊन कीर्ती चहा करत होती, तेवढ्यात आईने आणि भावाने तिची निर्घृण हत्या केली.

यावेळी कीर्ती दोन महिन्यांची गरोदर होती.

खोट्या प्रतिष्ठेच्या बळी

आपल्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा ही अनेक मुद्द्यांवरून ठरवली जाते आणि ही सामाजिक प्रतिष्ठा महिलांवर लादली जाते, त्यातून असे प्रकार घडत असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा म्हणाल्या.

"आपल्याकडे असलेल्या पुरुष प्रधान व्यवस्थेमुळं अशा प्रकरणांमध्ये काय महिलाच या खोट्या प्रतिष्ठेच्या बळी पडत असतात आणि अशा घटना घडतात," असंही त्या म्हणाल्या.

या सर्वाची सुरुवात कुटुंबापासून होत असते. कुटुंबामध्ये पुरुष हा प्रमुख असतो आणि त्यातून महिलांना दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न होतो. शिवाय सामाजिक प्रतिष्ठा जपण्याचं सगळं ओझं हे महिलांवर टाकलं जातं, असंही त्या म्हणाल्या.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)