औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग?: प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाची हत्या

ऑनर किलिंग औरंगाबाद

प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी तरुणाच्या अल्पवयीन भावाची तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातील लाख खंडाळा इथे घडली. भीमराज गायकवाड (17) असे या मुलाचे नाव होते.

ही हत्या झाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही घटना ऑनर किलिंगचा प्रकार असल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. या घटनेत भीमराजचे वडील बाळासाहेब गायकवाड आणि आई अलकाबाई गायकवाड हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

लाख खंडाळा गावाजवळच एका वस्तीवर बाळासाहेब गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. बाळासाहेब गायकवाड यांचा मोठा मुलगा अमोल गायकवाड (22) 12 मार्चला घराबाहेर पडला. त्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली व पोलिसांनी त्याची माहिती कळविली.

याचदरम्यान गावातील देवकर कुटुंबातील मुलगीही घरी न परतल्याने मुलीचे वडील देवीदास देवकर आणि चुलते रोहीदास देवकर यांनी गायकवाड कुटुंबाकडे चौकशी केली.

अमोलसोबत आपली मुलगीही असल्याच्या संशय आल्यामुळे त्यांनी गायकवाड कुटुंबीयांना धमकी दिली. त्याची तक्रार बाळासाहेब गायकवाड यांनी वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी पोलिसांना कळवलं होतं.

पोलिसांनी याची योग्य दखल न घेतल्याने पुढील प्रकार घडल्याचा आरोप दलित संघटनांतर्फे केला जात आहे.

आपल्या मुलीला अमोल यानेच पळवल्याचा संशय देवकर यांना होता. शनिवारी 14 मार्च रोजी याच संशयावरून देवीदास देवकर आणि त्याचा लहान भाऊ रोहीदास देवकर हे गायकवाड वस्तीवर आले. बाळासाहेब गायकवाड आणि पत्नी अलकाबाई यांना अमोलबाबत विचारणा करत त्यांच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी गायकवाड दांपत्य दुसऱ्या वस्तीकडे पळाले.

हा सगळा प्रकार सुरू असताना अमोलचा लहान भाऊ भीमराज गायकवाड (17) हा घरात झोपलेला होता. देवकर बंधूंनी नंतर घरात झोपलेल्या भीमराज गायकवाड याच्यावर हल्ला केला. त्यातच भीमराजचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद ऑनर किलिंग

याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. देविदास आणि रोहिदास यांना त्याच रात्री अटक केली होती. तिसरा आरोपी सागर देवकर याला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. अशी माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बीबीसी मराठीला दिली.

हे प्रकरण हाताळण्यात पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही असा आरोप दलित संघटनांनी केला आहे. यासंदर्भात आम्ही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना विचारले असता त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही चौकशी सोपवली असल्याचं सांगितलं.

पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा आणि प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीला पळवून नेल्याच्या संशयातून हा प्रकार घडला असल्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांनी बीबीसी मराठीला सांगितले.

अमोल आणि बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी आणि पोलीस उपअधीक्षक कार्यालयाने तक्रारीची योग्य दखल न घेतल्याने हे सगळं घडल्याचा आरोप होत आहे. त्याचीही चौकशीही केली जात आहे.

भीमराज याने बारावीची परीक्षा दिली होती. त्यानंतर तो मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. तर अमोल हा केटरिंगचं काम करत होता. अमोलचे वडील बाळासाहेब गायकवाड आणि आई अलकाबाई गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अमोल आणि तरुणी 12 मार्चला बेपत्ता झाल्यानंतर त्याच रात्री 8.30 वाजता देवीदासचा मुलगा सागर याने आमच्या कुटुंबीयांना जिवंत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बाळासाहेबांनी पोलिसांकडे केली होती.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)