पोलिसांना सुरुवातीला आफताबचा संशय आलाच नाही, कारण...

फोटो स्रोत, ANI
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
- Reporting from, वसई
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसतशी नवीन माहिती समोर येत आहे.
दिल्ली पोलिस आफताब पूनावाला याच्या जबानीनंतर श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे शोधत आहेत. आफताब पूनावाला याने 18 मे रोजी आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा हिची गळा दाबून हत्या केली होती.
आफताब आणि श्रद्धा दोघेही छत्तरपूर भागात एक फ्लॅट घेऊन भाड्याने राहात होते.
एकीकडे दिल्ली पोलिस या हत्येचा तपास करत आहेत, तर दुसरीकडे श्रद्धाशी कोणताही संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. कारण श्रद्धा ही मूळ वसईची होती.
या सगळ्या प्रकरणातील काही गोष्टी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी सांगितलं की "श्रद्धाच्या वडिलांनी सुरुवातीला केवळ बेपत्ता असल्याचा अर्ज दिला होता. खरंतर आमच्या अखत्यारित मुलगी राहत नसल्याने आम्हाला अडचणी आल्या. पण तरीही मुलगी मे महिन्यापासून बेपत्ता किंवा संपर्कात नाही म्हटल्यावर आम्ही स्यू मोटो दाखल करून घेतलं."
श्रद्धा वालकरचा बालपणीचा मित्र लक्ष्मण नडार याचाकडूनही पोलिसांनी माहिती घेतली.
मे महिन्यापासून श्रद्धाशी आपला काहीच संपर्क झाला नसल्याचं लक्ष्मणने पोलिसांना सांगितलं होतं.
श्रद्धाचे तिचा बॉयफ्रेंड अफताब पूनावाला याच्याशी वाद व्हायचे आणि तो तिला मारहाण करत असल्याचंही तिने लक्ष्मणला सांगितलं होतं, अशीही माहिती पोलिसांनी दिली.
यानंतर माणिकपूर पोलिसांनी 26 ऑक्टोबरला अफताब पूनावाला ह्याला चौकशीसाठी बोलवलं.

फोटो स्रोत, ANI
‘...म्हणून आफताबवर आम्हाला संशय आला’
चौकशीदरम्यान अफताबने पोलिसांना सांगितलं, "ती कायम चिडचिड करायची. विनाकारण भांडण करायची. आमचं भांडण झालंय आणि ती निघून गेलीये. कुठे गेली आहे माहिती नाही. तिला शोधायला मी तुम्हाला सहकार्य करेन." संपतराव पाटील पुढे सांगतात, "सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नाही. कारण तो एकदम नजरेला नजर मिळवून बोलत होता. कुठेही घाबरल्याचं त्याने दाखवलं नाही. एकदम कॉन्फिडन्ट होता.” माणिकपूर पोलिसांनी त्यानंतर श्रद्धा आणि आफताबच्या मोबाईलचा तपास केला. सीडीआर, एसडीआरच्या मार्फत माहिती काढली. यावेळी श्राद्धाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन दिल्ली येथे ती राहत असलेले ठिकाण छत्तरपूरचं होतं. संपतराव पाटील म्हणाले, "श्रद्धाच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा भांडण करून जायची. पण राग शांत झाल्यावर पुन्हा त्याच्याकडे यायची. जुलै 2021 मध्ये अफताब आणि श्रद्धाचं मोठं भांडण झालं होतं.
त्यावेळी श्रद्धाने आपल्या मित्रांना सांगितलं की, मला घेऊन जा. ते तिला घेऊन आले, पण पुन्हा काही दिवसांनी ती त्याच्याकडे परत गेली."

फोटो स्रोत, ANI
"या घटना पाहता आम्हाला संशय आला की, कायम त्याच्याजवळ परत जाणारी मुलगी किंवा किमान आपल्या मित्राकडे बोलणारी मुलगी आता सहा महिने झाले तरी बेपत्ता कशी काय? तेव्हा आम्हाला घातपाताची शक्यता असल्याचं वाटलं. मग आम्ही दिल्ली इथे आमची टीम पाठवली."
श्रद्धा आणि ऑफताबचे बँक अकाऊंट्सही पोलिसांनी तपासले. 18 ऑक्टोबर 2022 रोजी अफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये काढले आहेत. त्यानंतर 2 हजार, 3 हजार असे ट्रान्झॅक्शन दिसून आले.
खरंतर 16-17 ऑक्टोबरपासून श्रद्धाचा फोन बंद होता. त्यानंतर हे ट्रान्झॅक्शन झाल्याचं दिसून येतं, असंही संपतराव पाटील यांनी सांगितलं.
8 नोव्हेंबर रोजी माणिकपूर पोलिसांची टीम दिल्ली इथे गेल्यावर आफताब आणि श्रद्धा ‘लिव्ह इन’ राहत असलेल्या पत्त्याची पडताळणी करण्यात आली.
छत्तरपूर पोलिसांसह माणिकपूर पोलीस या पत्त्यावर गेले असता त्याठिकाणी अफताब सापडला आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यापुढील चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








