जेव्हा कन्नड अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याच्या मदतीने बॉयफ्रेंडचे 12 तुकडे करून जाळले होते...

मारिया सुसायराज, नीरज ग्रोव्हर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारिया

मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात 3 जून रोजी 32 वर्षीय सरस्वती वैद्यची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 20 हून अधिक तुकडे करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

हे हत्याकांड मीरा रोडच्या 'गीता आकाशदीप' इमारतीत काही दिवसांपूर्वी घडलं होतं.

क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या हत्याकांडानंतर मुंबईत 2008 साली घडलेल्या घटनेची अनेकांना आठवण झाली.

मीरा रोड हत्याकांडात प्रेशर कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपीने केला. मुंबईत 2008 मध्ये घडलेल्या हत्याकांडात मृतदेहाचे 12 तुकडे जाळून टाकण्यात आले होते.

मुंबईत 2008 साली घडलेल्या नीरज ग्रोव्हर हत्या प्रकरणाबाबत आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

नीरज ग्रोव्हर कोण होता?

नोएडाच्या अॅमिटी यूनिव्हर्सिटीतून मास कम्युनिकेशनचं पदवी मिळवून नीरज ग्रोव्हर मनोरंजन क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता. नीरज मूळचा कानपूरचा होता.

सुरुवातीला टीव्ही कंपन्यांमध्ये बारीक-सारीक कामं करत, नंतर एका जाहिरात कंपनीत काम करू लागला होता.

याच दरम्यान नीरजची कन्नड अभिनेत्री मारिया सुसायराज हिच्याशी ओळख झाली. मारिया सिनेक्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आली होती. ती मुंबईतील मालाडच्या धीर सॉलिटर नावाच्या इमारतीत राहत होती. नीरज मारियाला काम मिळवून देण्यासाठी मदत करत होता.

मारियाचं जेरोम जेरोम मॅथ्यू याच्याशी साखरपुडा झाला होता. जेरोम हा नौदलात लेफ्टनंट पदावर कार्यरत होता आणि केरळमधील कोचीमध्ये त्याची नियुक्ती होती.

नीरज ग्रोव्हर, मारिया सुसायराज आणि जेरोम जेरोम मॅथ्यू ही तीन नावं या हत्येच्या केंद्रस्थानी होती. यातील नीरजची हत्या आणि त्यात मारिया आणि जेरोम हे आरोप असं हे प्रकरण होतं. या हत्येत नेमकं काय झालं, हे आता आपण पाहूया.

चॉपरनं नीरजचे 12 तुकडे

6 मे 2008 च्या रात्री नीरज मारियाच्या घरी आला आणि तो रात्रभर तिथेच राहिला.

रात्री 11.30 च्या सुमारास जेरोमनं मारियाला फोन केला. त्यावेळी त्याला तिच्यामागून एका पुरुषाचा म्हणजेच नीरजचा आवाज आला. मात्र, नीरज रात्रभर इथं राहणार नाही, याची खात्री मारियानं जेरोमला दिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 7 मे 2008 च्या सकाळी 7.30 वाजता दरवाजाची बेल वाजली. मारियानं दरवाजा उघडला असता, समोर जेरोम होता.

त्यावेळी फ्लॅटमध्ये मारिया आणि नीरज दोघेही होते. मारियानं खात्री दिल्याप्रमाणे नीरज रात्री गेला नव्हता, तर तो मारियाच्या इथेच थांबला होता.

जेरोम हा नौदलात लेफ्टनंट पदावर कार्यरत होता. त्यामुळे सुट्टीवर जाण्याआधी त्याला अधिकृतरित्या सुट्टीची परवानगी घेणं बंधनकारक होतं. मात्र, आपण अचानक सुट्टीवर गेल्यास कारवाई होऊ शकते, हे माहिती असूनही जेरोमनं कुठलीच परवानगी न घेता, कोचीहून थेट मुंबईत मारियाच्या घरी धडकला होता.

मारिया सुसायराज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मारिया

मारिया आणि नीरजला एकत्र पाहूम जेरोम भडकला. त्याने रागाच्या भरात नीरजचा चाकूने भोसकून खून केला.

त्यानंतर जेरोम आणि मारियाने मिळून बाथरूममध्ये नीरजच्या मृतदेहाचे 12 तुकडे केले होते. यासाठी त्यांनी चॅापरचा वापर केला होता. नीरजच्या मृतदेहाचे तुकडे एका बॅगमध्ये भरून दोघं गाडीने पालघरच्या दिशेने निघाले.

मनोर परिसरातील जंगलात त्यांनी नीरजचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर जेरोम पुन्हा निघून गेला. तर मारिया मुंबईत राहिली.

हत्येची घटना अशी आली उघडकीस

नीरज रोज संध्याकाळी किंवा रात्री आई-वडिलांना फोन करायचा.

6 मेच्या रात्रीही त्यानं तसा फोन केला होता. मात्र, 7 मे च्या रात्री त्यांना तसा फोन केला नाही, त्यामुळे काळजीपोटी त्याचे वडील अमररनाथ ग्रोव्हर मुंबईत आले आणि त्यांनी चौकशी करून त्यांनी मग नीरज बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली.

नीरजच्या कुटुंबीयांनी मारियावर संशय व्यक्त केला. मात्र, पुराव्यांअभावी तिला अटक करण्यात आली नव्हती.

दोन आठवड्यांनी पोलिसांनी मारिया आणि जेरोम या दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी मारिया आणि जेरोमची चौकशी सुरू केली. मात्र, पुढे चौकशीदरम्यान पोलिसांच्या लक्षात आलं की, मारियाच्या जबाबात काही महत्त्वाच्या गोष्टी परस्परविरोधी आहेत.

उदाहरणार्थ, सुरुवातीला मारियाने पोलीस चौकशीत नीरज रात्री 12 वाजता निघून गेल्याचं सांगितलं होतं.

मग पोलिसांनी आणखी वेगानं तपास सुरू केला. ज्या गाडीतून मारिया आणि जेरोमने नीरजचा मृतदेह ती गाडी जप्त केली.

मारियाने तिच्या मित्राकडून सामान आणण्याच्या सबबीखाली गाडी आणली आणि त्या गाडीत नीरजचा मृतदेह मनोरला नेला.

अमरनाथ सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नीरजचे आई-वडील

पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. या गाडीत पोलिसांना अनेक पुरावे मिळाले.

तसंच, नीरजचा बंद फोन माझ्या घरी होता, असं मारियानं तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं होतं. पण 7 मे 2008 च्या संध्याकाळी 5.15 वाजता फोनचं लोकेशन दहिसर दाखवत होतं.

मारियाचा चुकून हात लागल्याने नीरजचा मोबाईल सुरू झाला होता. त्यात एक मेसेज पडला होता. हा हत्येचा पहिला पुरावा पोलिसांना मिळाला.

मोबाईलवरील लोकेशन आणि गाडीतले पुरावे हे पोलिसांना सापडल्यानंतर मारियानं क्राईम ब्रांचसमोर नीरजच्या हत्येची घटना मान्य केली.

मारिया

फोटो स्रोत, Getty Images

मग मारियाला 3 आणि जेरोमला 10 वर्षांची शिक्षा का?

2008 मध्ये घडलेल्या या घटनेचा अंतिम निकाल तीन वर्षांनी म्हणजे 30 जून 2011 रोजी लागला. दरम्यानच्या काळात मारिया आणि जेरोम तुरुंगातच होते.

यावेळी कोर्टानं मारियाला पुरावे नष्ट करण्याप्रकरणी दोषी ठरवलं, तर जेरोमला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याप्रकरणी दोषी ठरवलं.

त्यामुळे मारियाला 3 वर्षांची शिक्षा, तर जेरोमला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, दोघेही हत्येच्या घटनेपासून तीन वर्षे तुरुंगात राहिल्यानं तेवढी शिक्षा कमी केली गेली. त्यामुळे मारियाला अंतिम निकालानंतर तुरुंगात राहावं लागलं नाही.

तसंच, मारिया आणि जेरोम यांनी दोघांनीही प्रत्येकी 50 हजार रुपये नीरजच्या कुटुंबाला देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.

या निकालावर ग्रोव्हर कुटुंबीयांनी खंत व्यक्त केली की, मारिया हीसुद्धा या हत्येत सहभागी असताना तिला केवळ पुरावे नष्ट करण्याप्रकरणी दोषी ठरवलं.

मारिया आणि जेरोम दोघेही हत्येच्या घटनेत सहभागी असताना, दोघांना वेगळ्या शिक्षा का, असं प्रश्न नीरजचे वडील अमरनाथ सिंह यांनी विचारला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)