SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेवर निसटता विजय, 20 वर्षांनी होणार भारताशी फायनलमध्ये लढत

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनं निसटता पराभव करत आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता, अहमदाबादमध्ये 19 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही फायनल लढत होईल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 2003 साली विश्वचषक स्पर्धेची फायनल झाली होती. त्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाला रविवारी मिळणार आहे.

आफ्रिकेचा प्रतिकार

दक्षिण आफ्रिकेनं दिलेल्या 213 धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड या जोडीनं ऑस्ट्रेलियाला आक्रमक सुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या 6 ओव्हर्समध्येच 60 धावांची भागिदारी केली.

या चांगल्या सुरुवातीनंतरही ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळाला नाही. दक्षिण आफ्रिकेनं शेवटपर्यंत प्रतिकार करत त्यांचा विजय लांबवला.

मार्कारामनं वॉर्नरला बाद करत ही जोडी फोडली. तर मिचेल मार्शनं रबाडाला शून्यावरच बाद केलं. रॅसी वेन देर ड्युसेननं त्याचा अप्रतिम झेल घेतला.

दोन विकेट पडल्यानंतरही हेडनं आफ्रिकन गोलंदाजांवर हल्ला सुरुच ठेवला होता. त्यानं 40 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अखेर केशव महाराजनं हेडला 62 धावांवर बाद केलं.

तबरेझ शम्सीनं मार्नस लबुशेन (18) आणि ग्लेन मॅक्सवेल (1) यांना झटपट बाद करत ऑस्ट्रेलियावर दडपण वाढवलं.

अनुभवी स्टिव्ह स्मिथनं जॉश इंग्लिससोबत 5 विकेटसाठी 37 धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. कोट्सझीनं स्मिथला 30 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला.

स्मिथनंतर जॉश इंग्लिसही 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क या जोडीनं कोणताही धोका न पत्कारता ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

ऑस्ट्रेलियानं आठव्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. तर दक्षिण आफ्रिकेला पाचव्यांदा सेमी फायनलचा अडथळा ओलांडण्यात अपयश आलंय.

दोन अव्वल टीममध्ये फायनल

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन फॉर्मात असलेल्या टीममध्ये आता फायनल मॅच होणार आहे. 10 टीम आणि 47 सामन्यांनतर अंतिम फेरीतील दोन संघ निश्चित झाले आहेत.

भारतानं यापूर्वी सर्वच्या सर्व 10 सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर ऑस्ट्रेलियानं पहिले दोन सामने गमावले होते. पण त्यानंतर सलग 8 सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केलाय.

दोन अव्वल टीममधील ही लढत चांगलीच रंगतदार होणार आहे.

मिलरची झुंझार खेळी

त्यापूर्वी डेव्हिड मिलरच्या झुंझार शतकामुळे दक्षिण आफ्रिकेनं 49. 4 ओव्हर्समध्ये सर्वबाद 212 धावा केल्या. मिलर मैदानात उतरला तेंव्हा दक्षिण आफ्रिकेची अवस्था 4 बाद 24 अशी नाजूक होती.

मिलरनं सुरुवातीला सावध फलंदाजी केली. त्यानं हाईनरीक क्लासेनसोबत पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागिदारी केली आफ्रिकेच्या इनिंगमधील ही सर्वोच्च भागिदारी ठरली.

आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्लासेननं सेट झाल्यावर काही चांगले फटके लगावले. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच कमिन्सची चाल यशस्वी ठरली.

एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स

मिलर – क्लासनेन जोडी प्रमुख गोलंदाजांना दाद देत नव्हती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्यावेळी ट्रॅव्हिस हेडला गोलंदाजी दिली.

हेडनं पहिल्याच ओव्हरमध्ये क्लासेनला 46 धावांवर बाद केलं. हेडनं त्याच्या पुढच्याच बॉलवर मार्को जॅन्सनला शून्यावर बाद केलं. हेडनं एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत मोठी धावसंख्या करण्याच्या आफ्रिकेच्या आशा संपुष्टात आणल्या.

ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा

टॉस हरल्यानं पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं पहिलं सत्र गाजवलं. मिचेल स्टार्कनं पहिल्याच ओव्हरमध्ये टेंबा बवुमाला शून्यावर बाद केलं.

या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 4 शतकं झळकावणारा क्विंटन डी कॉक देखील अपयशी ठरला. जॉश हेझलवूडनं त्याला 3 धावांवर बाद केलं.

रॅसी वेन देर ड्युसेन (6) आणि एडन मार्काराम (10) हे या स्पर्धेत सातत्यानं धावा जमवणारे फलंदाज सेमी फायनलमध्ये अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जॉश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)