You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
IND vs NZ वर्ल्डकप सेमीफायनल: वानखेडेवर भारताला अनुकूल खेळपट्टी बनवली का?
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना खेळवला जात आहे.
टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 398 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतलं पन्नासावं शतक झळकावून सर्वाधिक शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. विराटसोबत श्रेयस अय्यरनेही वर्ल्डकपमध्ये सलग दुसरं शतक केलं आहे.
तत्पूर्वी शुबमन गिलने देखील आक्रमक फलंदाजी करत 80 धावांची खेळी केली. पण वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवरून सुरू झालेला वाद सध्या चर्चेत आहे.
खेळपट्टीबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाची विनंती मान्य करून भारतीय संघाला साजेशी खेळपट्टी बनवल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. याबाबत आयसीसीने देखील त्यांची बाजू मांडली आहे.
वानखेडेच्या खेळपट्टीबाबत 'जे काही घडलं त्यात नवीन काही नाही', असं आयसीसीने म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांतील बातम्यांमध्ये काय दावा केला आहे?
या प्रकरणी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की सेमीफायनलपूर्वी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीवरील गवत काढून टाकण्याची विनंती केली होती.
भारतीय फिरकीपटूंना खेळपट्टीची मदत मिळावी म्हणून ही विनंती केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, गवत काढून टाकल्यानंतर त्याचा फायदा न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांना होणार नाही असंही या बातम्यांमध्ये सांगितलं गेलं.
'डेली मेल'च्या वृत्ताचा हवाला देत असा दावा करण्यात आला आहे की, आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांनी या प्रकरणावर निराशा व्यक्त केली आहे.
त्यांच्या मते, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना आधी नव्या खेळपट्टीवर खेळवला जाणार होता, पण आता मात्र तो वापरलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाईल.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान खेळपट्टी बदलण्यात आल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
आधीच्या नियोजनानुसार भारत आणि पाकिस्तानचा सामना सामना खेळपट्टी क्रमांक 7 वर खेळवला जाणार होता पण खेळपट्टी बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
आयसीसीचं काय म्हणणं आहे?
वाद वाढल्यानंतर याप्रकरणी आयसीसीनेही त्यांची बाजू स्पष्ट केलीय.
सेमीफायनलचे वार्तांकन करणारे बीबीसीचे प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात नियोजनात बदल होणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे आणि यापूर्वीही एकदा असं झालं आहे. ग्राउंड क्युरेटरच्या सल्ल्यानुसार यजमान देशाची परवानगी घेऊन हा बदल करण्यात आला आहे."
आयसीसीचे प्रवक्ते पुढे म्हणाले की, "आयसीसीच्या स्वतंत्र खेळपट्टी सल्लागाराला याची कल्पना दिली गेली होती आणि यामुळे असं म्हणता येणार नाही की या खेळपट्टीवर चांगला खेळ होणारच नाही."
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)