रामलीला आणि एम. एफ. हुसैन यांच्या 119 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या चित्राचं नातं

हुसैन यांच्या याच चित्राला विक्रमी बोली लागली आहे. ग्राम यात्रा

फोटो स्रोत, Christie's

फोटो कॅप्शन, हुसैन यांच्या याच चित्राला विक्रमी बोली लागली आहे.
    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मकबूल फिदा हुसैन अर्थात एम एफ हुसैन या नावाभोवती एक वलयही आहे आणि वादही.

त्यामुळेच ते हयात असताना चर्चेत राहिले आणि त्यांच्या मृत्यूनंतर 14 वर्षांनीही अनेक भारतीयांना चित्रकार म्हटलं की हुसैन यांचं नावच लगेच आठवतं.

प्रकाशझोतात राहणारा आणि ती प्रसिद्धी आवडणारा हा कलाकार पुन्हा चर्चेत आला, याला कारण ठरलंय त्यांचं एक चित्र जे अलीकडेच एका लिलावात विक्रमी किंमतीला विकलं गेलं.

19 मार्च 2025 रोजी न्यूयॉर्कच्या ख्रिस्टीजच्या लिलावात हुसैन यांचं 'ग्राम यात्रा' नावाचं चित्र 13.75 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 119 कोटी रुपयांना विकलं गेलं.

आजवर कोणत्याही भारतीय चित्रासाठी लागलेली ही आजवरची सर्वात मोठी बोली ठरली.

जन्मानं पंढरपूरचे आणि पुढे इंदौरला राहिलेल्या हुसैन यांची कारकीर्द मुंबईत घडली होती. पण त्यांच्या चित्रांमध्ये अनेकदा अख्ख्या भारताचं प्रतिबिंब दिसतं.

रामलीला पाहात वेगवेगळ्या प्रांतांचा प्रवास करताना दिसलेला भारत हुसैन यांनी मांडला होता. 'ग्राम यात्रा' हेही त्याच ग्रामीण भारताची गोष्ट सांगणारं चित्र आहे.

ग्राफिक्स

जवळपास पाच दशके हे चित्र नॉर्वेमधल्या एका रुग्णालयाच्या भिंतीवर होतं आणि काहीसं दुर्लक्षित राहिलं.

तिथं ये-जा करणाऱ्या रुग्णांना आणि डॉक्टर्सना त्या चित्राचं महत्त्व ठाऊक असण्याची शक्यता कमीच होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पण याच चित्रानं आत दक्षिण आशियाई आणि विशेषतः भारतीय चित्रकार आणि चित्रकलेला नव्या उंचीवर नेलं आहे.

'ग्राम यात्रा' खास का आहे?

'ग्राम यात्रा' हे चित्र खास ठरलं, कारण त्याचा आकार, हुसैननं ज्या काळात ते काढलं तो काळ आणि या चित्रानं केलेला प्रवास.

14 फूट लांब आणि 3 फूट उंचीचं हे तैलरंगात रंगवलेलं चित्र एखाद्या म्युरलसारखं म्हणजे भित्तीचित्रासारखं आहे.

मातीशी नातं सांगणाऱ्या, मातकट-लाल-पिवळसर रंगांमध्ये हे चित्र रंगवलेलं आहे.

खरं तर हे एकच एक सलग चित्र नाही- तर चित्रमालिका आहे. 'ग्राम यात्रा'मध्ये तेरा वेगवेगळ्या आकारांच्या चौकटींमध्ये ग्रामीण जीवनाची क्षणचित्रं रेखाटली आहेत.

भारतीय 'मिनिएचर' शैलीतल्या पारंपरिक लघुचित्रांमध्ये जशी एखादी कहाणी गुंफलेली असते ना, त्या शैलीवरच हे चित्र आधारीत आहे, पण त्यावर अर्थातच हुसैन यांचा ठसाही दिसून येतो.

हुसैन यांनी 1954 मध्ये 'ग्राम यात्रा' काढलं, तेव्हा तेव्हा ते फारसे प्रसिद्ध झालेले नव्हते. त्यांनी तर या चित्राला काही नाव दिलं नव्हतं – 'ग्राम यात्रा' हे नाव नंतर मिळालं.

मकबूल फिदा हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मकबूल फिदा हुसैन

एक 'मॉडर्न आर्टिस्ट' म्हणजे आधुनिकतावादी कलाकार म्हणून हुसैन यांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याआधीच्या काळातलं हे चित्र आहे आणि म्हणूनच इथे भारतीय लोकपरंपरा आणि आधुनिकतावाद या दोन्हीचं मिश्रण दिसतं.

"आधुनिक दक्षिण आशियाई कलेचं सार मंडणारी एकच कलाकृती तुम्ही शोधत असाल, तर ती ही आहे," असं या चित्राविषयी ख्रिस्टीज या लिलावसंस्थेत दक्षिण आशियाई आधुनिक आणि समकालीन कला विभागाचे प्रमुख निशाद आवारी सांगतात.

त्यांच्या मते 1952 मध्ये हुसैन यांनी केलेल्या चीन दौऱ्याच्या प्रभावही या चित्रात दिसून येतो.

हुसैन यांनी 'ग्राम यात्रा'मध्ये मारलेले ब्रशचे फटकारे चीनच्या झू बेहोंग सारख्या कलाकारांच्या कॅलिग्राफिक ब्रशवर्कची आठवण करून देतात.

हुसैन पुढे 'सुधारित क्यूबिस्ट' शैलीसाठी ओळखले जाऊ लागले. भौमितिक आकार आणि ठळक रेषांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शैलीच्या पाऊलखुणाही 'ग्राम यात्रा'मध्ये दिसतात.

ग्रामीण भारताचं चित्रण

'ग्राम यात्रा' हे चित्र नेमकं भारताच्या कुठल्या एका भागावर आधारीत असल्याचा काही उल्लेख नाही. कदाचित ते वेगवेगळ्या भागांचं प्रतिबिंब असावं.

पण त्यातली जात्यावर दळायला बसलेली बाई पाहून कुणाला महाराष्ट्रातल्या महिला आणि जात्यावरच्या ओव्यांची आठवण सहज येईल.

महिलांचं अस्तित्व या चित्रात प्राधान्यानं जाणवतं. मुलांची काळजी घेणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, कामं करणाऱ्या, गाडीतून प्रवास करणाऱ्या महिला.

चौकटीत राहणाऱ्या आणि तरीही उठून दिसणाऱ्या महिला. गावाच्या आणि पर्यायानं देशाच्या रहाटगाडग्याचं चाक सुरू ठेवणाऱ्या महिला.

Close up

फोटो स्रोत, Christie's

फोटो कॅप्शन, 'ग्राम यात्रा'मधलं एक दृश्य

'ग्राम यात्रा' चित्राच्या उजवीकडच्या एका चौकटीतल्या एका शेतकऱ्यानं पुढे केलेला हात त्या चौकटीबाहेर गेला आहे आणि त्यानं जणू दुसऱ्या एक चौकटीतल्या जमिनीच्या चित्राला हातावर पेललं आहे.

आजही शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि भारताच्या याच कृषीप्रधान समाजाला हुसैन यांनी केलेलं हे वंदन आहे, असं काही कला समीक्षकांना वाटतं.

या चित्रातला संदेशही महत्त्वाचा आहे. म्हणजे हुसैन यांनी असा काही संदेश देण्याच्या उद्देशानं हे चित्र काढलेलं नाही. पण आज सहा दशकांनंतर ते भारताच्या इतिहासातल्या एका काळाचं प्रतीक बनलं आहे.

तो काळ भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सुरुवातीचा काळ होता. ब्रिटीश साम्राज्यवादाचं जोखड झुगारून भारत तेव्हा नव्यानं आपली ओळख शोधत होता.

त्या काळात भारतीय कलेला आधुनिकतेकडे नेणाऱ्या पिढीचे हुसैन हेही एक प्रणेते ठरले.

'ग्राम यात्रा'चं रामलीलेशी नातं

आपल्या बहुसंख्य समकालीनांसारखं पॅरिस किंवा न्यूयॉर्कमध्ये न जाता हुसैन यांनी भारतातल्या खेड्यांमध्ये प्रेरणा शोधली, असं चित्रकार आणि हुसैन यांचं चरित्र लिहिणरे अखिलेश (जे फक्त पहिलं नाव वापरतात) सांगतात.

"रामलीलेचा मागोवा घेत हुसैन गावोगाव फिरत होते. रामलीला करणाऱ्या पथकांसोबत भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ते गेले आणि या पथकांसाठी त्यांनी चित्रंही रेखाटली."

एम एफ हुसैन

फोटो स्रोत, Getty Images

इंदौरला असतानाच्या लहानपणीच्या दिवसांत रामलीलेनं आपल्याला कशी प्रेरणा दिली, याविषयी हुसैन यांनीही सांगितलं आहे.

"या सगळ्यातून हुसैन यांना दिसलेला भारत ते चित्रांतून मांडत राहिले. भारताचे लोक कसे राहतात, त्यांना काय आवडतं, ते विचार कसा करतात, या देशाची मानसिकता काय आहे, याचा हुसैन शोध घेत राहिले," असं अखिलेश सांगतात.

'ग्राम यात्रा' चित्रात आणि या चित्राला समकालीन असलेलं हुसैन यांच्या 'जमीन' या चित्रातही त्याची झलक दिसते.

सध्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संग्रहात असलेलं 'झमीन' हे चित्र हुसैन यांनी 1955 साली काढलेलं होतं.

एका चित्राचा दिल्ली ते ऑस्लो प्रवास

'ग्राम यात्रा' हे चित्र भारतातून नॉर्वेमध्ये कसं गेलं याची कहाणीही विलक्षण आहे आणि ती या चित्राच्या गूढतेत भरच टाकते.

ख्रिस्टीज आणि ऑस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलनं दिलेल्या माहितीनुसार 1954 साली डॉक्टर लिऑन एलियास वोलोडार्स्की यांनी हे चित्र अवघ्या 1400 रुपयांना विकत घेतलं होतं.

एम एफ हुसैन
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मूळचे युक्रेनियन असलेले डॉ. वोलोडार्स्की आधी बेल्जियम आणि मग नॉर्वेमध्ये स्थायिक झाले.

ते दुसऱ्या महायुद्धातही सहभागी झाले होते आणि पुढे नुकत्याच स्थापन झालेल्या जागतिक आरोग्य संघटना, म्हणजे WHO सोबत काम करत होते.

क्षयरोगावर उपचारासाठी एक रुग्णालय उभारण्याचं काम करण्यासाठी वोलोडार्स्की तेव्हा भारतात आले होते.

तेव्हा दिल्लीतल्या एका प्रदर्शनातून त्यांनी 1954 सालीच 'ग्राम यात्रा' खरेदी केलं. पुढे हे चित्र त्यांनी नॉर्वेची राजधानी ऑस्लोमधल्या विद्यापीठाच्या रुग्णालयाला दान केलं.

ऑस्लो विद्यापीठात एका कॉरिडॉरमध्ये अनेक वर्ष टांगलेलं ते पेंटिंग कधी कलाजगतासमोर आलं नाही आणि त्यामुळेच विस्मृतीत होतं.

दरम्यान, हुसैन यांचं 2011 साली वयाच्या 95 व्या वर्षी निधन झालं आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2013 मध्ये या चित्राविषयी माहिती पहिल्यांदा प्रकाशात आली.

त्यानंतर हे चित्र दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शनांत मांडलं गेलं आणि अखेर 2025 मध्ये त्याचा लिलाव झाला.

या चित्राच्या लिलावानं भारतीय कलेच्या क्षेत्रात आणि कलाकृतींच्या बाजारात अर्थातच उत्साहाचं वातावरण आहे.

या विक्रमी किंमतीकडे पाहता हुसैन यांच्यासह भारतीय मास्टर्सच्या अन्य काही चित्रांनाही आणखी मोठी किंमत मिळेल असा अंदाज एकीकडे लावला जातो आहे.

तसंच भारतीय चित्रकारांच्या कलाकृतींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी आशाही व्यक्त केली जाते आहे.

डीएजी म्हणजे पूर्वीच्या दिल्ली आर्ट गॅलरीचे सीईओ आशिष आनंद सांगतात, "भारतीय चित्रकृतींकडे केवळ सौंदर्यात्मक मूल्यापुरतं न पाहता ती एक महत्त्वाची आर्थिक संपत्ती बनेल".

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)