दर्ग्याच्या लंगरवर भूक भागवणारा अनाथ शाहजेब बनला लाखोंच्या संपत्तीचा वारसदार

    • Author, आसिफ अली
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

पुस्तकांशी मैत्री करण्याच्या, हसण्या-खेळण्याच्या वयात शाहजेबला उत्तराखंडच्या 'पिरान कलियार शरीफ' दर्ग्यात अनाथ म्हणून जीवन कंठावं लागत होतं.

पण एकवेळ अशी आली की, दर्ग्याच्या लंगरवर भूक भागवणारा अनाथ शाहजेब लाखोंच्या संपत्तीचा वारसदार बनला.

आता ही गोष्ट तुम्हाला काल्पनिक वाटेल, पण शाहजेबची ही गोष्ट खरी आहे.

'पिरान कलियर'मध्ये घडलेल्या या चमत्काराची चर्चा जगभर सुरू आहे.

इथं अनाथ म्हणून वावरणाऱ्या मुलाला त्याचं कुटुंब मिळालं. एवढंच नाही तर आता तो लाखोंच्या मालमत्तेचा वारसदारही आहे.

आईवडिलांच्या भांडणात बदललं शाहजेबचे आयुष्य

शाहजेब आठ वर्षांचा असताना त्याचं आयुष्य खूप वेगळं होतं. तो मोठ्या प्रेमात, लाडात वाढला होता. तो आपली आई इमराना बेगम आणि वडील मोहम्मद नावेद यांच्यासोबत सहारनपूर तालुक्यातील देवबंदच्या नागल ब्लॉक 'पंडोली' गावात राहायचा.

पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. 2019 मध्ये त्याच्या आईचं आणि वडिलांचं किरकोळ कारणावरून भांडण झालं.

भांडण वाढतच गेल्यामुळे शाहजेबच्या आईने त्याला घेऊन तिचं महेर यमुनानगर (हरियाणा) गाठलं. शाहजेबच्या वडीलांना 2015 साली अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते.

पत्नी आणि मुलगा घरातून निघून जात असताना देखील नावेद असहाय्यपणे अंथरुणावर पडून होते. इमराना आणि शाहजेब घर सोडून चाललेत म्हटल्यावर त्यांना दुःख झालं होतं.

थोड्या दिवसांनी नावेदने इमरानाला घरी बोलावलं पण ती काही यायला तयार नव्हती. इतकंच नाही तर काही दिवसांनी इमरान बेगमने तिचा फोन नंबरही बदलला.

कोरोनामध्ये आईला गमावलं...

असेच दिवस सरत होते. दरम्यान इमरानने तिच्या मुलासह शाहजेबसह माहेर सुद्धा सोडलं आणि ती उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील पिरान कलियर इथं राहू लागली.

इमराना बेगमने 'पिरान कलियर'मध्ये राहण्यासाठी पंधराशे रुपये महिना भाड्याने एक खोली घेतली. तिथं ती दर्गा झाडून पैसे कमवायची. यात तिचा स्वतःचा आणि मुलगा शाहजेबचा गुजराण व्हायचा.

पुढं थोड्याच दिवसात देशभरात कोव्हीडची साथ आली. शाहजेब सांगतो की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ आलं. आई इमरानाचा या लाटेत मृत्यू झाला.

आज घरातल्या मखमली सोफ्याला रेलून बसलेला शाहजेब सांगतो, "अम्मीच्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणी मी सोबत होतो."

शाहजेबने सांगितलं की, दर्ग्यात आलेल्या काही लोकांनीच इमरानावर अंतिम संस्कार केले.

शाहजेब सांगतो, "अम्मीच्या आठवणीत मी खूप रडायचो. भूक लागल्यावर दर्ग्यातल्या लंगरवर पोट भरायचो. कधीकधी उपाशी झोपायची सुद्धा वेळ यायची."

चहाच्या टपरीवर भांडी घासून उदरनिर्वाह केला

या अनोळखी शहरात शाहजेबच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, कोणी जवळचा माणूस नव्हता. छोटा शाहजेब आता दर्ग्याच्या रस्त्यावरून एकटाच भटकायचा.

इथूनच त्याच्या संघर्षाची सुरुवात झाली. भूक भागवण्यासाठी शाहजेब जवळच्या चहाच्या टपरीवर काम करू लागला. ग्राहकांसाठी शाहजेब आता छोटू बनला होता. हा छोटू चहा द्यायचा, खरकटे ग्लास धुवायचा, आणि हे त्याच्यासाठी रोजचं काम झालं होतं.

टपरीवर आलेले काही लोक त्याच्यासोबत वाईट सुद्धा वागायचे. त्याला दिवसाला 150 रुपये रोजंदारी मिळायची. यातल्या तीस रुपयांची तर त्याला रजई भाड्याने घ्यावी लागायची.

या दीडशे रुपयातले काही पैसे वाचवून तो तिथंच असलेल्या दर्ग्याच्या खादिमाकडे (सेवक) जमा करायचा.

शाहजेब सांगतो, दर्ग्याच्या खादिम (सेवक) कडे आजही मी वाचवलेले 600 रुपये जमा आहेत. जेव्हा मी इतर मुलांना खेळताना बघायचो तेव्हा मलाही खेळावंसं वाटायचं.

"मुलांना शाळेत जाताना पाहायचो, तेव्हा मला मलाही शाळेत जाऊ वाटायचं. माझे आई, वडील, आजोबा असते तर मीही शाळेत गेलो असतो."

आणि शाहजेबचं आयुष्य बदललं

एके दिवशी शाहजेबचे दूरचे नातेवाईक असलेले मुबीन अली 'पिरान कलियर' इथं त्यांच्या बहिणीला वाजिदाला भेटायला आले होते. योगायोगाने तिथं त्यांना शाहजेब दिसला. तो बऱ्याचदा वाजिदाच्या मुलासोबत शाहजेनसोबत खेळायला यायचा.

मुबीनची नजर शाहजेबवर पडताच त्याने शाहजेबला त्याचं नाव, गाव विचारलं.

यावर शाहजेबने आपलं नाव सांगितलं आणि सहारनपूर इथल्या घंटाघरचा रहिवासी असल्याचं सांगितलं.

मुबीनने त्याला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं, त्यावेळी शाहजेबने नावेद असं वडिलांचं नाव सांगितलं.

मुबीनने विचारलं "तुझ्या आजोबांचं नाव याकूब होतं का?"

यावर शाहजेबने होकारार्थी उत्तर दिलं.

यावर मुबीनने पुन्हा विचारलं की, "याकुब व्यतिरिक्त तुला आणखीन कोण माहिती आहे?"

त्यावर शाहजेबने 'छोटे दादा शाह आलम, चाचा रियाज आणि फुफी हिना' यांची नावं घेतली.

सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर मुबीनला आश्चर्य वाटलं. मुबिन म्हणाले, अरे तू तर आमचाच मुलगा आहेस.

यानंतर मुबीनने स्वतःचा फोन काढून शाहजेब चार वर्षांचा असतानाचा त्याचा फोटो दाखवला.

फोटो पाहून शाहजेब म्हणाला, होय..हा तर माझाच फोटो आहे.

यानंतर मुबीनने उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात राहणाऱ्या मोहम्मद शाहआलम आणि त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला.

दुसऱ्याच दिवशी शाहजेबचे काका नवाज आलम पिरान कलियरला पोहोचले आणि त्यांनी हरवलेल्या आपल्या वारसाला घरी नेलं.

अनाथ शाहजेब झाला लखपती!

शाहजेबची आणखीन माहिती मिळवण्यासाठी आम्ही हरिद्वार जिल्ह्यातील पिरान कलियर मध्ये असणारं 'साबीर साहेब' यांचा दर्गा गाठला. शाहजेब जवळपास तीन वर्ष इथं राहत होता. इथंच आमची भेट मुनव्वर अलीशी झाली.

मुनव्वरअली आणि त्यांचं कुटुंब 'पिरान कलियर' दर्ग्यासमोर राहतं.

शाहजेब जिथं राहायचा, जिथं त्याने आपलं एकाकीपणाचं आयुष्य काढलं ती सर्व ठिकाणं आम्हाला मुनव्वर अलीने दाखवली.

असंच बोलता बोलता मुनव्वर अलीने सांगितलं की, शाहजेब हा आमचा सुद्धा नातेवाईक आहे. तो इथंच राहत होता पण आम्ही त्याला ओळखू शकलो नाही.

तो दर्ग्याच्या बाहेर टिनाच्या शेडखाली रजईची गादी भाड्याने घेऊन झोपायचा.

मुनव्वर अली सांगतात की, शाहजेब कधी-कधी आमच्या घरी जेवायला यायचा. यावर्षी जरा जास्तच थंडी पडली होती तेव्हा मी शाहजेबला घरी झोपायला बोलावलं होतं.

शाहजेब घरी येऊन जेमतेम चार-पाच दिवस झाले असतील की एके दिवशी आमचे नातेवाईक मुबीन आमच्या घरी आले. शाहजेबला पाहून मुबीनने त्याची चौकशी केली, तेव्हा आम्हाला कळलं की तो आमचा नातेवाईक आहे.

हा तोच मुलगा होता ज्याला आम्ही इतक्या वर्षांपासून शोधतोय.

मुनव्वर अली सांगतात की, दोन वर्षांपूर्वी आमच्या नातेवाईकांनी आम्हाला शाहजेबचा फोटो पाठवला होता. पण हा फोटो त्याच्या लहानपणीचा होता. यामुळे आम्हाला त्याला ओळखता आलं नाही.

दर्ग्याजवळ राहणारे लोक काय सांगतात?

कालचा अनाथ आणि आजचा लखपती बनलेला शाहजेब 'पिरान कलियर' मध्ये कुठं कुठं राहायचा याचा आम्ही शोध घेत होतो.

ज्या टिनच्या शेडखाली शाहजेब राहायचा तिथं आम्ही पोहोचलो.

इथं बरेच लोक आसऱ्यासाठी आलेलं आम्ही पाहिलं. यातले अर्धे अधिक तर जायरीन (श्रद्धाळू) होते.

इथंच आमची ओळख इस्तिखार नावाच्या व्यक्तीशी झाली. इस्तिखार शाहजेबला ओळखत होते.

इस्तिखार इथं चहाची टपरी चालवतात आणि रात्री झोपायला रजई आणि गाद्या भाड्याने देतात. इस्तिखार सांगतात, शाहजेबही त्यांच्याकडून झोपण्यासाठी रजई भाड्याने घ्यायचा.

ते सांगतात की, शाहजेब इथं चहा प्यायचा. कधी-कधी शाहजेबकडे रजई आणि गादी घेण्यासाठी पैसे नसायचे. पण मी त्याला पैसे न घेता रजई द्यायचो.

शाहजेबचं नवं आयुष्य कसं आहे?

मोठं घर, सर्व सुखसोयी आणि कुटुंब अशा सगळ्या गोष्टी आज शाहजेबकडे आहेत. बरीच वर्ष तो या गोष्टींपासून वंचित होता.

आता शाहजेब सहारनपूर जिल्ह्यातील त्याच्या धाकट्या आजोबांकडे शाह आलम यांच्या घरी राहतो. आता त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय.

शाह आलम व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबात शाहजेबची आजी शहनाज बेगम आणि चार काका फैयाज आलम, रियाझ आलम, शाहनवाज आलम आणि नवाज आलम राहतात.

या घरात नऊ मुलं आहेत, जी नात्याने शाहजेबची भावंडं आहेत.

शाहजेबला धरून आता घरात दहा मुलं आहेत. या मुलांसोबत खेळताना शाहजेबच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहताना दिसतोय.

शाहजेबचे आजोबा शाह आलम कोण आहेत?

मोहम्मद शाह आलम हे शाहजेबचे वडील मोहम्मद नावेद यांचे सख्खे काका आहेत. त्यामुळेच शाहजेब त्यांना लहाने आजोबा म्हणजेच छोटे दादा असं म्हणतो.

मोहम्मद शाह आलम हे कुटुंब प्रमुख आहेत.

आम्ही मोहम्मद शाह आलम यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की, इमराना आणि शाहजेब घरातून निघून गेल्यावर काही दिवसांतच शाहजेबच्या वडिलांचं नावेद यांचं निधन झालं.

शाहआलम सांगतात की, शाहजेबचे वडील नावेद अकरा वर्षांचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यामुळे नावेदच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली.

त्यावेळी त्यांचे मोठे सख्खे भाऊ आणि शाहजेबचे आजोबा मोहम्मद याकूब हे हिमाचल प्रदेशमध्ये शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होते.

शाहजेबबद्दल बोलताना मोहम्मद शाहआलम सांगतात की, आपल्या हरवलेल्या नातवाला त्याचा हक्क मिळावा अशी शाहजेबचे आजोबा याकूब यांची इच्छा होती.

ते पुढे सांगतात की, आधी सून आणि नातवाने घर सोडलं, त्यानंतर मुलगा गेला यामुळे याकूबला धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी याकुबचंही निधन झालं.

मोहम्मद शाहआलम यांनी प्रॉपर्टीचे काही कागदपत्र दाखवले. यात शाहजेबचे वडील नावेद स्वतःची काही प्रॉपर्टी मागे सोडून गेलेत.

यात साडेचार एकर जमिन आणि साडेतीन गुंठ्यांवर बांधलेलं घर अशी ही प्रॉपर्टी आहे.

ही प्रॉपर्टी उत्तरप्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात देवबंद तालुक्याच्या नागल ब्लॉकमधील पंडोली गावात आहे.

शाहआलम सांगतात की, आज या मालमत्तेची किंमत जवळपास पन्नास लाखांपर्यंत आहे.

ते सांगतात की, आज शाहजेबचे वडील नावेद ह्यात नाहीत आणि हरवलेला शाहजेबही सापडलाय. त्यामुळे ही सर्व संपत्ती त्यांनी स्वत: शाहजेबच्या नावावर करून दिलीय.

आज इतक्या वर्षानंतर शाहजेबला बघून त्याची आजी शहनाज बेगम खूश आहेत. आज शाहजेब घरी परतल्यामुळे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी असल्याचं त्या सांगतात.

त्या सांगतात, शाहजेबला जे करायचं आहे, जितकं शिकायचं आहे, जिथं कुठं काम करायचं आहे ते सर्व आम्ही करू. त्याच्या प्रत्येक इच्छा आम्ही पूर्ण करू. त्याची प्रेमाने काळजी घेऊ.

अकरा वर्षांचा शाहजेब आता आपल्या घरी आलाय. तो म्हणतो की, मोठं होऊन त्याला एक अनाथाश्रम सुरू करायचं आहे.

यामागे कारण काय असं विचारलं असता तो सांगतो की, "मी ज्या पद्धतीने दारोदार हिंडलो तशी वेळ इतर कोणत्याही मुलावर येऊ नये असं मला वाटतं."

शाहजेब सांगतो की, अनाथ मुलांना मदत करून त्यांच्या जीवनात मला आनंद निर्माण करायचा आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)