You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'बाबा का ढाबा'ला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या गौरव वासन विरोधात पैशांच्या अफरातफरीची तक्रार
कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे जगण्याची भ्रांत निर्माण झालेल्या एका वृद्ध ढाबा मालकाची कहाणी एका व्हीडिओनं देशभरात पोहोचवली.
दक्षिण दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा' चे वयोवृद्ध मालक कांता प्रसाद या व्हीडिओमुळे केवळ प्रसिद्धच झाले नाहीत, तर त्यांना देशभरातून मदतीचा हातही मिळाला. हेच कांता प्रसाद आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
त्यांनी यू-ट्युबर गौरव वासन यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मदत म्हणून आलेल्या पैशांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार कांता प्रसाद यांनी दिल्ली पोलिसांकडे नोंदवली आहे.
कांता प्रसाद यांनी यू-ट्युबर वासन याच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अजून कोणतीही एफआयआर दाखल झालेली नाही.
गौरव वासन यांनीच सर्वांत पहिल्यांदा 'बाबा का ढाबा' चा व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी इथं खाण्यासाठी गर्दी केली. कांता प्रसाद यांना मदत म्हणून अनेकांनी डोनेशनही दिलं होतं.
कांता प्रसाद यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे की, "वासन यांनी त्यांचा व्हीडिओ शूट करून ऑनलाइन पोस्ट केला आणि लोकांना पैसे डोनेट करायला सांगितलं. वासन यांनी जाणीवपूर्वक त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे बँक डिटेल्स लोकांना दिले आणि त्यातून मोठी रक्कम जमा केली."
वासन यांनी आर्थिक देवाणघेवाणीची माहितीही आपल्याला दिली नसल्याचा आरोपही ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी केला.
द इंडियन एक्प्रेसशी बोलताना कांता प्रसाद यांनी म्हटलं की, "वासन यांच्याकडून आपल्याला केवळ 2 लाख रुपये मिळाले आहेत."
"सध्या आमच्याकडे फार लोक जेवायला येत नाहीत. जे येतात ते सेल्फी काढायला येतात. आधी माझी रोजची कमाई 10 हजार रुपये होती. आता मला केवळ तीन ते पाच हजार रुपये मिळतात."
काय आहे वासन यांची बाजू?
द इंडियन एक्सप्रेसनं गौरव वासन यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी सांगितलं की, "मी आलेले सर्व पैसे हे प्रसाद यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत."
आपल्यावरील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
त्यांनी म्हटलं, "मी जेव्हा हा व्हीडिओ शूट केला होता, तेव्हा तो इतका व्हायरल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. लोकांनी बाबांना त्रास देऊ नये अशी माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी माझे बँक डिटेल्स दिले होते."
काही यूट्युबर्सनं आरोप केला आहे की, "वासन यांना डोनेशनच्या रुपात 20 ते 25 लाख रुपये मिळाले आहेत." वासन यांनी हा आरोपही फेटाळला आहे.
कसा प्रसिद्ध झाला होता 'बाबा का ढाबा?'
दिल्लीतल्या मालवीयनगरमध्ये असलेल्या 'बाबा का ढाबा' चा व्हीडिओ यूट्युबर गौरव वासन यांनी शूट करून 7 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
लॉकडाऊनमुळे ढाब्याच्या मालकावर ओढावलेली परिस्थिती दाखवून त्यांनी लोकांना इथं येऊन खाण्याचं आणि प्रसाद दाम्पत्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी गेल्या वीस वर्षांपासून हा ढाबा चालवत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांची कमाई ठप्प झाली होती.
पण सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी इथं खाण्यासाठी रांगा लावल्या. अनेक सेलिब्रिटींनीही हा व्हीडिओ शेअर केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)