अमेरिका: निवडणुकीच्या तोंडावर एका दिवसात तब्बल 94 हजार रुग्णांची वाढ

अमेरिकेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि अमेरिकेत गेल्या 24 तासात (31 ऑक्टोबर) कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तब्बल 94 हजार नवे रुग्ण गेल्या 24 तासात सापडले. एका दिवसात झालेली ही आजवरची सर्वाधिक वाढ आहे.

खरंतर नव्वद हजाराचा आकडा पार करण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. 30 ऑक्टोबरला म्हणजे काल 91 हजार रुग्णांची नोंद झाली होती.

अमेरिकेत आता एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 90 लाखांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीने दिली आहे.

येत्या मंगळवारी (3 नोव्हेंबर) डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या दोन-तीन दिवस आधी अमेरिकेत रुग्णांनी एका दिवसातील सर्वाधिक संख्येची नोंद केली आहे.

अमेरिकेतील 21 राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्यांमध्ये तर कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर आहे.

दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या डिबेटमध्ये कोरोनावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. त्याचा वृत्तांत खालीलप्रमाणे :

अमेरिका निवडणूक : कोरोनावरून ट्रंप-बायडन यांच्यात खडाजंगी

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप आणि विरोधी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यातील शेवटचा वादविवाद (डिबेट) गुरुवारी (22 ऑक्टोबर) रात्री उशिरापर्यंत सुरू होता.

या वादविवादादरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

शेवटच्या डिबेटकरिता कोव्हिड-19ची साथ, अमेरिकन कुटुंब, अमेरिकेतील वंशवाद, हवामान बदल, राष्ट्रीय सुरक्षा, नेतृत्व हे विषय नियोजित करण्यात आले होते.

मात्र सर्वाधिक लक्ष कोव्हिडसंदर्भातील डिबेटकडे लागून होतं. या विषयावर ट्रंप आणि बायडेन दोघांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली.

काही आठवड्यांत लस येणार - डोनाल्ड ट्रंप

शेवटची डिबेट परराष्ट्र धोरणाबाबत असणं गरजेचं होतं, अशी तक्रार ट्रंप यांच्या पक्षाने सुरुवातीला केली. या माध्यमातून आखाती देश, व्यापार, सिरीया आणि चीनबाबत भूमिका मांडता आली असती, असं त्यांनी म्हटलं.

कोरोना व्हायरसवरची लस काही आठवड्यांतच तयार होणार आहे, असं ट्रंप यांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी स्वतःचा अनुभवही यावेळी लोकांना सांगितला. कोव्हिडवरील उपचारासाठी नव्या औषधांच्या शोधाला प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, असं ट्रंप म्हणाले.

2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू, आणखी 2 लाख जणांचा बळी जाईल - जो बायडन

जो बायडन यांनी सुरुवातीपासूनच आक्रमकपणे ट्रंप यांच्यावर हल्लाबोल केला. ट्रंप स्वतःच कोरोना व्हायरस गायब होईल, असं बिनबुडाचं आश्वासन देत आहेत, असं बायडन म्हणाले.

शिवाय, आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 2 लाख 20 हजार अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वर्षाअखेरपर्यंत आणखी 2 लाख अमेरिकन नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडतील, अशा इशारा यावेळी बायडेन यांनी दिला.

'लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत'वरून वाद-प्रतिवाद

डिबेटमधील आपल्या युक्तिवादादरम्यान ट्रंप यांनी लवकरच व्यापारी संकुलं आणि शाळा सुरू करण्याबाबत वक्तव्य केलं. तसंच लोक कोरोनासोबत जगायला शिकत आहेत, असंही ट्रंप म्हणाले.

ट्रंप यांच्या या वक्तव्यावर बायडन यांनी जोरदार टीका केली. लोक कोरोनासोबत जगायला शिकत नसून ते कोरोनामुळे मरायला शिकले आहेत, अशा शब्दांत बायडेन यांनी ट्रंप यांच्यावर निशाणा साधला. अखेर, ट्रंप यांनी आता हा विषय इथेच थांबवा असं म्हणून आता इतर विषयावर बोलण्याबाबत म्हटलं.

कोरोना व्हायरसबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का?

डिबेटदरम्यान डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांना 'कोरोना व्हायरसच्या साथीबाबत चीनने नुकसान भरपाई द्यावी का,' हा प्रश्न विचारण्यात आला.

'याबाबत चीनला आंतरराष्ट्रीय नियमांनुसार नुकसान भरपाई भरायला लावू,' असं उत्तर बायडन यांनी दिलं. चीनला कोरोनापेक्षाही व्यापार आणि आर्थिक आघाड्यांवर कोंडीत पकरण्याचा रोख बायडेन यांचा होता.

तर वरील प्रश्नाला उत्तर देताना ट्रंप म्हणाले, "चीन आधीच नुकसान भरपाई देत आहे. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना लाखो डॉलर दिले आहेत."

तसंच, चीनच्या स्टीलबाबतचे नियम कडक केल्यामुळे अमेरिकेचा स्टील उद्योग वाचला, असंही ट्रंप म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)