मुंबई पोलीस व्हायरल व्हीडिओ: आयडिया तर 'कडक' पण अंमलात कशी आणणार, नेटकऱ्यांचा सवाल

रेड सिग्नल असतानाही हॉर्न वाजवणाऱ्या वाहनचालकांना चाप बसवण्यासाठी मुंबई पोलिसांनी भन्नाट आयडिया शोधून काढलीय. या आयडियाच्या जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी एक व्हीडिओ तयार केलाय आणि या व्हीडिओची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

मुंबई पोलिसांची आयडिया अशी आहे की, रेड सिग्नल असताना हॉर्नचा आवाज 85 डेसिबलपेक्षा जास्त नोंदवला गेल्यास, सिग्नल आपोआप रिसेट होईल आणि त्यामुळं आणखी 90 सेकंद सिग्नल रेड होईल. यासाठी सिग्नलवर मुंबई पोलिसांनी सध्या काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर यंत्र बसवलंय.

या काहीशा हटके प्रयोगाचा मुंबई पोलिसांनी व्हीडिओ तयार केलाय आणि तो सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हीडिओतून पोलिसांनी विचारलयं, "कशी वाटली आयडिया?"

मग काय... या भन्नाट आयडियाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

सर्वसामान्य ट्विटरकरांपासून क्रिकेट, सिनेमा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मुंबई पोलिसांचा व्हीडिओ रिट्विट करत, लाईक करत कौतुकाचा वर्षाव केलाय.

सिनेनिर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी एका शब्दात मुंबई पोलिसांचं कौतुक केलंय.

क्रिकेटर हार्दिक पंड्यानं इमोजी पोस्ट करत मुंबई पोलिसांची स्तुती केलीय.

बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनीही मुंबई पोलिसांचं कौतुक केलंय. शिवाय, असा प्रयोग आपणही करण्याचा प्रयत्न करू, असं म्हटलंय.

मुंबई पोलिसांची ही आयडिया कशी वाटली आणि ती तुम्ही अंमलात कशी आणणार हे विचारण्यासाठी बीबीसी मराठीने बंगळुरूच्या आयुक्तालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. भास्कर राव यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नाही.

मुंबई पोलिसांनी या व्हीडिओखाली एका प्रतिक्रियेत पोवाडाही शेअर केलाय आणि त्यातून डेसिबल मर्यादेच्या यंत्रामागे काय हेतू आहे, हे स्पष्ट केलंय. या पोवाड्याचंही कौतुक होताना दिसतंय.

कुणी असा प्रयोग प्रत्येक सिग्नलवर राबवण्याची विनंती केलीय, तर इतर शहरांमधील काहीजणांनी आमच्या शहरातही असा प्रयोग राबवण्याची इच्छा व्यक्त केलीय.

नवी मुंबईचा रहिवाशी असलेला शशांकनं मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाला 'एकदम कडक' म्हटलंय.

अर्थात, काहीजणांनी मुंबई पोलिसांच्या कल्पनेवर आक्षेपही नोंदवलाय.

रुग्णवाहिका अडकली तर काय?

आक्षेप नोंदवणाऱ्यांचं म्हणणं आहे की, काही जणांच्या चुकीची शिक्षा सगळ्यांनी का भोगावी? तर काहीजणांचं म्हणणं आहे की, रुग्णवाहिकेसारखी वाहनं अशा कोंडीत अडकल्यास त्याला जबाबदार कोण?

कुठं या व्हीडिओचं कौतुक होतंय, तर कुठं टीकाही. मात्र एक नक्की की, हॉर्नच्या त्रासाला कंटाळलेल्यांनी मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचं स्वागत केलंय.

तर तुम्हीही रेड सिग्नल लागल्यावर हॉर्न वाजवू नका, अन्यथा तुम्हालाही सिग्नलवर अतिरिक्त वेळ थांबावं लागेल. अशावेळी मुंबई पोलिसांच्याच भाषेत सांगायचं तर 'आता बसा बोंबलत'.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)