You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शबाना आजमी यांना मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात, कोकिळाबेन रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्या शबाना आजमी यांच्या कारला मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर अपघात झाला.
कलमपूर येथे त्यांच्या कारने ट्रकला पाठीमागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. या दोघांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
मुंबईहून जवळपास 60 किमी दूर असलेल्या खालापूरजवळ शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमाराला हा अपघात झाला. रायगडचे एसपी अनिल परासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आजमी यांच्या कारने ट्रकला धडक दिली. अपघातात कारचं मोठं नुकसान झालं आहे.
शबाना आजमी मुंबईला येत असताना त्यांच्या कारने ट्रकला धडक दिली. ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी चारच्या सुमाराला खालापूर टोल नाक्याच्या दोन किमी अलीकडे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शबाना आजमी यांच्या चेहरा, मान आणि डोळ्याजवळ मार लागला आहे. त्या ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसल्या होत्या.
जावेद अख्तर यांची कार मागून येत होती. त्यांना काहीही झालं नाही, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंजादे यांनी हिंदुस्तान टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, "शबाना यांची सफारी गाडी त्यांचा ड्रायव्हर चालवत होता. त्यांच्या मागेच जावेद अख्तर यांची ऑडी गाडी येत होती. ड्रायव्हर ओव्हरटेक करत असताना समोरच्या ट्रकला गाडीने मागून जोरदार धडक दिली."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)