You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीच्या 'बाबा का ढाबा'वर शेकडोंची गर्दी का लोटली?
सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची प्रचंड चर्चा आहे. विशेष म्हणजे, दोन्ही फोटो एकाच व्यक्तीचे आहेत. फोटोत दिसणारे हे आजोबा एका फोटोत रडताना तर दुसऱ्या फोटोत हसताना दिसतात.
काही तासांमध्येच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटण्याचं कारण म्हणजे सोशल मीडिया. या घटनेमुळे आपल्याला सोशल मीडियाची ताकदसुद्धा लक्षात येईल. सोशल मीडियावरील अभियानामुळेच फोटोतील आजोबांना मदत मिळाली आहे.
दिल्लीच्या दक्षिण भागात मालवीय नगर परिसरात एक वयस्कर दांपत्याचं छोटंसं हॉटेल आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते हा ढाबा चालवत असल्याचं आजोबा सांगतात.
सदर आजोबांचा एक व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता. यामध्ये ते आपलं दुःख लोकांना सांगताना दिसतात. 80 वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी सकाळी सहा वाजता उठून जेवण बनवण्याची तयारी करतात. साडेनऊ वाजेपर्यंत जेवण तयार होतं.
पण इतके कष्ट करूनसुद्धा त्यांची कमाई नाममात्रच असल्याचं आजोबा सांगतात. चार तास काम केल्यानंतर त्यांना कसेबसे 50 रुपये मिळतात. कोरोना संकटापूर्वीही त्यांचं उत्पन्न कमीच होतं. आता कोरोनामुळे त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे.
स्वाद ऑफिशियल या युट्यूब चॅनेलने सर्वप्रथम धाबावाल्या आजोबांचा व्हीडिओ बनवला. त्यानंतर वसुंधरा तन्खा शर्मा यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला. सोबत कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "या व्हीडिओमुळे मला खूप दुःख झालं. दिल्लीकरांनो, शक्य असल्यास 'बाबा का ढाबा'ला नक्की जा आणि जेवण करा."
पाहता पाहता हा व्हीडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आणि टॉप ट्रेंडमध्ये आला. वयस्कर दांपत्याच्या मदतीसाठी अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला.
यानंतर गरीब श्रीमंत प्रत्येक जण बाबा का ढाबावर जेवणासाठी जाऊ लागला.
अभिनेत्री स्वरा भास्कर यांनीही हा व्हीडिओ ट्वीट केला. "'ट्विटर भलंही करू शकतो," असं त्या म्हणाल्या.
रवीना टंडन यांनीसुद्धा व्हीडिओ ट्वीट केला आणि लिहिलं, "बाबा का ढाबावर जेवण करणाऱ्यांनी मला त्यांचे फोटो पाठवून द्यावेत. मी प्रेमळ संदेशासोबत हा फोटो पोस्ट करीन."
कृष्णा यांनी ट्वीट केलं, "फक्त सोशल मीडियावर ट्रेंड आहे म्हणून तिथं गर्दी करू नका, सगळं शांत झाल्यानंतरही तिथं जात राहा."
आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती ट्वीट करून म्हणाले, "सांगितल्याप्रमाणे मी बाबांच्या ढाब्यावर गेलो. आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी हे आवश्यक होतं. त्यांची मी काळजी घेईन. त्यांच्यासारख्या लोकांची मदत होण्यासाठी मी एक अभियान सुरू करत आहे."
अभिनेत्री सोनम कपूर यांनीसुद्धा आजी-आजोबांची मदत करण्याचं आवाहन केलं.
अभिनेता सुनील शेट्टी यांनी त्यांचा व्हीडिओ शेअर केला. म्हणाले, "चला आपण त्यांचं हास्य परत आणू. आपण आपल्या शेजारी दुकानदारांची मदत केली पाहिजे."
वयस्कर दांपत्याचे अश्रू पुसण्यासाठी हा व्हीडिओ फॉरवर्ड करत राहा, असं पोलीस अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी लिहिलं.
या घटनाक्रमानंतर आजी-आजोबांची परिस्थिती बदलून गेली.
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना आजी म्हणाल्या, "काहीच कमाई होत नव्हती. कोणताच ग्राहक येत नव्हता. उरलेलं जेवण घरी नेऊन तेच आम्ही खात होतो. आमची मुलं आमच्याकडे लक्ष देत नाहीत. मुलगीसुद्धा आमच्याकडेच राहते. ती काहीही काम करत नाही."
पुढे आजी म्हणाल्या, "आज सकाळपासूनच लोकांची इथं गर्दी आहे. लोक चहा पिऊन गेले. जेवण करून गेले. गॅससुद्धा संपला होता. आता घरून सिलेंडर मागवला आहे. आज इतके लोक ढाब्यावर जेवले, मला खूप आनंद होत आहे."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)