You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इसाक मुंडा: रोजंदारीवर काम करणारा मजूर बनला ‘सोशल मीडिया स्टार’
- Author, संदीप साहू
- Role, बीबीसी न्यूज
कोव्हिडमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नाना अडचणींना सामोरं जावं लागलं. मात्र, या काळातही काहीजणांनी आपला मार्ग शोधला आणि त्यातून अडचणींवर मात केली.
ओडिशात रोजंदारीवर काम करणारे इसाक मुंडा हे अशातीलच एक.
रोजंदारीवर काम करणारे मजूर ते कोव्हिडच्या काळात यूट्यूबवर आपले व्हीडिओ अपलोड करून बनलेले 'सोशल मीडिया स्टार' अशी नवी ओळख इसाक मुंडांनी मिळवलीय.
कोव्हिडच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना उदरनिर्वाहाचं साधनच उरलं नव्हतं. इसाकही त्यातीलच एक होते.
इसाक बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून काम करत होते. लॉकडाऊनच्या काळात म्हणजे मार्च 2020 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला व्हीडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता आणि आता तर ते महिन्याला लाखो रुपये कमावत आहेत.
पण त्यांना ही कल्पना सूचली कशी आणि पुढे ते 'सोशल मीडिया स्टार' कसे बनले, त्याचा हा प्रवास...
व्हीडिओ अपलोड करण्याची कल्पना कशी सूचली?
लॉकडाऊनच्या काळात इसाक मुंडा यांची मुलं मोबाईलवर कार्टून बघत होती. त्या वेळात मोबाईलवर एक जाहिरात आली. ती जाहिरात यूट्युबवर व्हीडिओ अपलोड करून लोक पैसे कसे कमवतात, या संदर्भात होती. ती जाहिरात मुंडा यांनी पाहिली.
यातूनच मुंडा यांनी विचार केला की, आपण असा प्रयत्न करायला काही हरकत नाही. असं ही आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. यातूनच त्यांनी युट्यूब चॅनेल सुरू करण्याच्या टिप्स देणारे व्हीडिओ शोधून काढले आणि एक यूट्यूब चॅनेल सुरू केलं.
त्यांच्या पहिल्या व्हीडिओमध्ये मुंडा जेवणाचं ताट घेऊन बसलेले दिसतात. त्या ताटात भात, डाळ, हिरव्या भाज्या, एक टोमॅटो आणि मिरची दिसते. या व्हीडिओच्या सुरुवातीला ते प्रेक्षकांशी बोलतात आणि उर्वरित व्हीडिओत शांतपणे आपल्या जेवणावर फोकस करतात. पण त्यांच्या या व्हीडिओला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद काही मिळाला नाही.
यावर मुंडा सांगतात, "पूर्ण एक आठवडा तो व्हीडिओ कोणीच पाहिला नव्हता. यामुळे माझी निराशा झाली."
पण नंतर त्यांनी आणखी एक प्रयत्न करून पाहायचं ठरवलं. त्यांनी यूट्युबर पाहिलं की, बाकीचे यूट्युबर्स त्यांच्या व्हिडिओचं प्रमोशन इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही करतात.
मुंडा सांगतात, "मी माझ्या यूट्युब चॅनेलचं एक फेसबुक अकाऊंट सुरू केलं. त्यावर मी माझे व्हीडिओ शेअर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर गोष्टी बदलत गेल्या. अंदाजे 10 ते 12 लोकांनी माझा व्हीडिओ पाहिला होता."
त्यानंतर त्यांचा पहिला व्हीडिओ व्हायरल झाला. यात मुंडा ओडिशामध्ये लोकप्रिय असलेल्या बासी पखाला नावाच्या आंबवलेल्या तांदळाच्या डिशचा आस्वाद घेताना दिसत होते.
मुंडा सांगतात, "काही दिवसातच 20 हजाराहून जास्त लोकांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं. माझे व्हीडिओ अमेरिका, ब्राझील, मंगोलियामधील लोकांनीही पाहिलं. या सर्व गोष्टींमुळे माझा उत्साह वाढला."
दोन वर्षानंतर आज इसाक मुंडा यांच्या 'इसाक मुंडा इटिंग' या चॅनेलचे सबस्क्राइबर्स 8 लाखांच्या घरात आहेत. त्यांचे व्हीडिओ 100 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आले आहेत. आज मुंडा कॅमेर्यासमोर अगदी सहज वावरताना दिसतात. ते त्यांच्या गावात चिकन पार्टी आयोजित करताना दिसतात.
मागच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा त्यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात इसाक मुंडा यांचं कौतुक केलं होतं.
'इंटरनेट सेन्सेशन बनण्यासाठी इसाक मुंडानी संस्कृती आणि पाककृती यांचं मिश्रण केलं आहे' या शब्दात मोदींनी त्यांचं कौतुक केलं होतं.
"मोदींच्या या कौतुकाने तर मला आभाळच ठेंगणं झालं होतं, त्यावेळी माझे सबस्क्राइबर्स ही वाढले होते," असं मुंडा सांगतात.
इसाक मुंडाांचे व्हीडिओ यूट्युबच्या 'मूकबँग' या प्रकारात मोडतात. हा प्रकार म्हणजे, लोक खूप खातात आणि खात खातचं त्यांच्या प्रेक्षकांशी संवाद साधतात.
हा ट्रेंड 2010 च्या सुमारास दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये सुरू झाला आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाला. मूकबँग प्रकारातल्या व्हीडिओ चॅनेलचे लाखो सबस्क्रायबर्स असतात. भारतातील मॅडीइट्स हे चॅनेल सुद्धा लोकप्रिय आहे.
या शैलीचे चाहते सांगतात की, जेव्हा ते जेवत असतात तेव्हा त्यांना असे व्हीडिओ बघायला आवडतात. आणि विशेषतः जर ते एकटे जेवत असतील तर हे व्हीडिओ पाहिल्याने त्यांना वाटणारा एकटेपणा कमी होतो.
पण मुंडा यांनी जेव्हा त्यांचे व्हीडिओ पोस्ट करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती नव्हती. जेवणाचे व्हीडिओ बनवण्याआधी त्यांनी बऱ्याच कॅटेगरीमधले व्हीडिओ पाहिले. पण त्यांना हे माहीत होतं की, आपण आपल्या पत्नीच्या मदतीने स्वयंपाक करू शकतो.
यावर ते सांगतात की, "आमच्या जेवणाच्या पद्धतीतून आमचं राहणीमान कशाप्रकारचं असेल हे लोकांना बघायला आवडेल असं मला वाटलं."
आणि यूट्यूबलाचं मुंडा यांचं गुरू बनवलं.
सुरुवातीला व्हीडिओ बनवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा कॅमेरा वापरला पाहिजे, व्हीडिओ कशाप्रकारे शूट केले पाहिजेत, त्यांना कसं एडिट केलं पाहिजे, स्वतः खात असताना तो व्हीडिओ कशाप्रकारे शूट केला पाहिजे, यासाठी त्यांनी यूट्यूबची मदत घेतली. त्यांनी त्यांच्या बचतीतून 3000 रुपये जमा केले. खर तर ही रक्कमसुद्धा मुंडा यांच्यासाठी मोठी होती. यातून त्यांनी हप्त्यांवर एक स्मार्टफोन खरेदी केला.
मुंडा यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं नाही. त्यांना थोडंफार इंग्रजी येत. पण स्वतःच्या यूट्यूब चॅनेलसाठी लागणार ईमेल त्यांनी स्वतः तयार केला. सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलची माहिती दिली. त्यांच्या व्हीडिओमध्ये सबटायटल्स लिहिण्यासाठी त्यांनी गुगल ट्रान्सलेटरचा वापर केला.
मुंडा यांनी त्यांचा पहिला व्हीडिओ दुपारचं जेवण जेवताना केला होता. तो त्यांनी एकाच टेकमध्ये शूट केला. या व्हिडिओत मुंडा म्हणतायत, "हॅलो, मित्रांनो तुम्ही या प्लेटमध्ये जे पाहताय, ते मी आज खाणार आहे"
त्या ताटात काय आहे हे सगळं ते हिंदीमध्ये समजावून सांगतात.
फेब्रुवारी 2022 पर्यंतचे मुंडा यांचे व्हीडिओ वेगळे आहेत. ते प्रत्येक दिवशी किंवा सतत जेवणाचेच व्हीडिओ शूट करत नाहीत. कधीकधी ते त्यांच्या गावात सुरू असलेल्या पार्टीचे व्हीडिओसुद्धा शूट करतात.
देशभरातून लोक त्यांच्या व्हीडिओवर कमेंट करतात.
अनेकांनी त्यांचे कौतुक केलं आहे. मुंडा यांच्या कमेंट सेक्शनमध्ये एक व्यक्ती लिहितो की, "मुंडा यांनी आपलं आयुष्य अत्यंत साधेपणाने समोर आणलं आहे. त्यांची ग्रुपची मेजवानी फार मजेदार वाटते."
तर दुसरा म्हणतो, "मुंडा यांना अन्नाचे मूल्य, तसंच अन्नाचा आदर कसा केला पाहिजे हे माहित आहे."
काही दिवसांनी मुंडा यांच्या युट्युबच्या व्हीडिओची संख्या वाढत गेली. अगदी घरच्या जेवणापासून ते चाहत्यांनी कमेंटमध्ये केलेल्या वेगवेगळ्या डिशेस मुंडा बनवू आणि खाऊसुद्धा लागले. यात मग उत्तर भारतीय पक्वान्न असतील आलू पराठे, किंवा बटाट्याचे फ्लॅटब्रेड्स, चाऊमीन यांसारख्या डिशचा समावेश होता.
फूड चॅलेंज हा देखील त्यांच्या व्हीडिओचा एक भाग होता. या चॅलेंजमध्ये, भात शिजवण्यापासून ते नंतर तो भात कुटुंबासोबत खाण्यापर्यंतच्या गोष्टी होत्या.
आता वारंवार मांसाहार करणे जरी शक्य असले तरीही आम्ही दररोज साधं जेवणचं जेवतो" असे ते म्हणतात.
जेव्हा मुंडा रोजंदारीवर काम करत होते, तेव्हा त्यांना दिवसा 250 रुपये मिळायचे. हे 250 रुपये त्यांच्या सहाजण असलेल्या कुटुंबासाठी पुरेसे नव्हते.
पण यूट्यूबच्या माध्यमातून मुंडा यांचं चॅनल लोकप्रिय होत गेलं. त्यातून आज त्यांचं मासिक उत्पन्न 3 लाख रुपये इतकं आहे. कधी कधी चॅनेलचे व्ह्यूज कमी येतात, तेव्हा उत्पन्नही कमी होतं आणि मग ही कमाई 60,000 ते 70,000 वर येते.
ज्या ठिकाणी एकेकाळी जुनी झोपडी होती, तिथेच आता मुंडा यांनी स्वतःचे दोन मजली काँक्रिटचे घर बांधले आहे. ते घर बांधण्यासठी त्यांना सुमारे 2 लाख रुपये एवढा खर्च आल्याचे ते सांगतात.
मुंडा यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवले आहेत. त्यांनी सेकंड हँड कार आणि व्हीडिओ एडिटिंगसाठी लॅपटॉप पण विकत घेतला आहे.
ते सध्या स्थानिक सेलिब्रिटी बनले आहेत. बऱ्याचदा गावकरी लोकांसाठी ते चिकन पार्टीसुद्धा आयोजित करतात.
मुंडा यांचं ध्येय काय आहे?
त्यांना आपल्या मुलांना शहरात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायचं आहे.
ते सांगतात, "मला माझ्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचे आहे. जर मी स्वतः शिक्षण न घेता हे सगळं करू शकलो, तर मला खात्री आहे की माझ्या मुलांनी उच्च शिक्षण घेतलं तर नक्कीच चांगल काहीतरी करू शकतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)