कॅरीमिनातीः टिकटॉक विरुद्ध युट्यूब- ऐन लॉकडाऊनमध्ये पेटलेलं इंटरनेट युद्ध

अख्खं जग कोरोनाविरोधात एकत्र येऊन लढत असतानाच, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हे एक भलतच युद्ध पेटलेलं आहे - टिकटॉक विरुद्ध युट्यूब.

या युद्धात मैदान आहे इंटरनेट आणि शस्त्र आहेत कंटेट किंवा या योद्धांद्वारे बनवले जाणारे व्हीडिओ. आणि आता या बातमीचं निमित्त ठरला आहे एक रोस्ट व्हीडिओ, जो युट्यूबने आक्षेपार्ह म्हणत काढून टाकला आहे.

तुम्ही म्हणाल आता रोस्ट म्हणजे काय? तर एखाद्यावर अगदी टोकाचे विनोद करून त्याची पार 'उतरवून टाकणे', याला रोस्ट म्हणतात. Roast म्हणजे भाजणे. आपण पापड किंवा भरतासाठी वांगी भाजतो अगदी तसंच.

युद्धाचं निमित्त काय?

गेल्या काही काळापासून टिकटॉकची लोकप्रियता देशात सातत्याने वाढते आहेत. अवघ्या 15-30 सेकंदांच्या व्हीडिओंमध्ये लोक एखाद्या डायलॉगवर मिमिक्री करून किंवा गाण्यावर नाचून लोकप्रिय झाले आहेत. तसे अनेक "टिकटॉक स्टार" भारताने गेल्या काही काळात तयार केले आहेत.

मात्र यामुळे तुलनेनं लांब आणि बऱ्यापैकी ओरिजनल व्हीडिओ बनवणारे युट्यूबर्स चिडले. त्यांच्यापैकीच एकाने 'या टिकटॉकवाल्यांना काय कळतं ओरिजनल कंटेट वगैरे', अशी भाषा करणारा व्हीडिओ बनवला.

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात आला आमिर सिद्दिकी नावाचा एक टिकटॉक स्टार. आमिर हा स्वतःला एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणवतो आणि टिकटॉकवर जवळपास 6 लाख फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर त्याला चांगलीच फॉलोइंग आहे.

त्याने एक व्हीडिओ तयार करत युट्यूबर्सना आवाहन केलं की तुम्ही तुमचे व्हीडिओ बनवा, आम्ही आमचे बनवतो. कशाला वाद करायचाय?

यावरच चिडला कॅरी मिनाती नावाचा एक युट्यूबर. फरिदाबादचा कॅरी मिनाती उर्फ 20 वर्षांचा अजय नागर हा देशातल्या अव्वल तरुण, एकल युट्युबर्सपैकी एक आहे.

युट्यूबवर लाखो सब्सक्राईबर्स असलेल्या कॅरी मिनातीने एक व्हीडिओ बनवत आमिरला चांगलंच रोस्ट केलं. अतिशय शिवराळ भाषेत कॅरी मिनातीने आमिरचे टिकटॉक व्हीडिओ किती 'थुकरट' असतात, तुमचा कंटेट किती फालतू असतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

हा व्हीडिओ इतका लोकप्रिय ठरला की त्याने भारतातले आजवरचे युट्यूबचे सर्व विक्रम मोडले, असं काही बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय. अवघ्या 24 तासात त्याला 40 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि सुमारे 24 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते.

युट्यूबने का काढला तो व्हीडिओ?

या विक्रमी व्हीडिओमधून देशातल्या इतर युट्यूबर्सचे सब्सक्रायबर्सही चांगलेच वाढले, त्यामुळे एकंदर हे युद्ध त्यांनी जिंकलं, असा दावा करण्यात आला.

मात्र त्यानंतर गुरुवारी युट्यूबने कॅरी मिनातीचा हा विक्रमी व्हीडिओच काढून टाकला.

हा व्हीडिओ ऑनलाईन छळ करणारा असल्यामुळे युट्यूबने तो काढून टाकला, असं अनेक बातम्यांमध्ये सांगितलं जातंय. डिसेंबर 2019मध्ये युट्यूबने त्यांच्या वापरीच्या अटी अपडेट केल्या होत्या, त्यानुसार कुणालाही लक्ष्य करून त्यांचा ऑनलाईन छळ करणारे व्हीडिओ त्यांच्या साईटवर सहन केले जाणार नाही. "अशा छळामुळे लोकांना असुरक्षित वाटतं आणि ते मुक्तपणे बोलू शकत नाही, एकमेकांशी संवाद साधू शकत नाही. याबाबतीत व्हीडिओ बनवणाऱ्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे," असंही युट्यूबने त्यांच्या धोरणांबाबत सांगितलं आहे.

त्यामुळे आता ट्विटरवर आणि इन्स्टाग्रामवर #JusticeForCarry ट्रेंड होत आहेत.

काही जणांनी टिकटॉकवर बंदी आणण्यासाठी एक ऑनलाईन याचिकाच सुरू केली आहे, तर काही जणांनी कॅरी मिनातीचा व्हीडिओ युट्यूबने पुन्हा अनब्लॉक करावा, यासाठी अर्ज केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)