You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Youtuber: सोलापूरचं शिंदे कुटुंब युट्यूबवरून लाखो रुपये कसं कमवतं?
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सोशल मीडियामुळं आज सामान्य व्यक्तीलाही प्रसिद्धी मिळत आहे. त्यालाही सेलिब्रिटीसारखं स्टेटस मिळत आहे. युट्यूबमुळं तर अनेकांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक हक्काचं चॅनल सुरू करता आलं.
सोबतच तेच चॅनल त्यांचं उदरनिर्वाहाचं साधनही बनलंय. अनेक युट्यूबर या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहेत.
आज आपण अशाच एका युट्यूबर कुटुंबाला भेटणार आहोत.
पूर्वी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाने युट्यूबच्या जोरावर स्वतःचं पक्क घर तर बांधलंय सोबतच एक नवी कोरी कारही युट्यूबमधून मिळालेल्या पैशांनी घेतली आहे.
चला तर मग भेटूया सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या युट्यूबवर गणेश शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला...
टिकटॉक बंद पडल्याने सुरू केले युट्यूब चॅनल
गणेश आणि त्यांची पत्नी योगिता पूर्वी टिकटॉकचे व्हीडिओ बनवत असत. त्यांना टिकटॉकवर चांगली प्रसिद्धीही मिळाली होती.
लाखांच्यावर त्यांचे टिकटॉकवर फॉलोअर्स होते. गणेश आणि योगिता त्यावर नवरा बायकोचे छोटेछोटे विनोद असलेले व्हीडिओ टाकायचे. त्यांचे व्हीडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा व्हायचे.
मात्र भारत सरकारच्या निर्णयामुळे टिकटॉकवर भारतात बंदी आली आणि अनेक टिकटॉकर्सप्रमाणे गणेश यांचं अकाऊंट बंद झालं. गणेश यांनी यानंतर दुसरं एखादं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शोधायला सुरूवात केली.
गणेश सांगतात, "मला सुरूवातीला युट्यूब विषयी काही माहिती नव्हतं. आम्ही टिकटॉक वापरायचो. आम्ही तिथे 15 सेकंदांचे शॉर्ट व्हीडिओ बनवायचो. त्या वेळेस आम्हाला काही माहिती नव्हतं. अगदी थोड्या दिवसांतच आम्ही टिकटॉकवर फेमस झालो. हे सर्व एक दीड महिन्यातच घडलं. पण काही कारणांमुळे टिकटॉक बंद झालं. तेव्हा आम्ही एकदिवस सहज आम्ही यु्ट्यब उघडलं, तर आम्हाला त्यात आमचे टिकटॉकचे व्हीडिओ दिसायला लागले.
म्हणजे लोकांनी आमचे 15-15 सेकंदांचे व्हीडिओ जोडून ते युट्यूबवर टाकले होते. तेव्हा विचार केला की ही काय भागनड आहे. आम्ही मग युट्यूबवर व्हीडिओ टाकायला सुरूवात केली. युट्यूबमध्ये उतरल्यावर कळलं की यामध्ये पैसे मिळतात वगैरे वगैरे... तेव्हा या विषयी अजून माहिती काढायला सुरूवात केली. तेव्हा कळलं की याला आडवे (Horizontal) व्हीडिओ करावे लागतात अशी वेगवेगळी माहिती मिळत गेली आणि तेव्हापासून आम्ही युट्यूब वापरायला सुरूवात केली."
बायकोच्या गरोदरपणात लोकांकडे मागितली युट्यूबवरून मदत
गणेश शिंदे हे प्लंबरचं काम करत होते. प्लंबिंगच्या कामातून जे काही पैसे मिळायचे त्यावर त्यांचं घर चालायचं. मात्र कोरोनाच्या काळात त्यांचं हे काम बंद पडलं. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं.
अशातच त्यांची पत्नी गरोदर होती. तो काळ आपल्यासाठी अत्यंत कठीण काळ होता असं योगिया त्या दिवसांबद्दल बोलताना सांगतात.
योगिता म्हणाल्या "खुशीच्या जन्माचा काळ असा होता ना, शप्पथ सांगते मी तो कधीच विसरू शकत नाही. कारण तो कोरोनाचा काळ होता. त्या काळात माझे मिस्टर प्लंबिंगचं काम करत होते. ते प्रत्येकाच्या घराघरात जाऊन करावं लागायचं. त्यामुळे माझ्या मिस्टरांना कामावर येऊ देत नव्हते. त्यांनी त्यातही प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही. माझी पहिली मुलगी जन्मली तेव्हा माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. माझी सिझेरियन डिलिव्हरी होऊ शकते ते.. असं वाटलंच नव्हतं. आम्ही 10-15 हजार रुपये डिलिव्हरीसाठी जमा केले होते आणि डॉक्टरांनी आमच्याकडे 35 ते 40 हजार रुपये मागितले होते."
गणेश यांना एवढे पैसे एका रात्रीत कुठून आणावे हा प्रश्न सतावत होता.
त्या रात्रीबद्दल गणेश सांगताना, "तेव्हा मला लोकांचा विचार आला. मी टिकटॉकवर युट्यूबवर चार माणसं जोडली आहेत. तेव्हा त्यांना एक मदतीचा व्हीडिओ करावा असं सहज माझ्या मनात आलं. तेव्हा मला वाटलं नव्हतं की, त्याला एवढा प्रतिसाद मिळेल असं.. एका रात्रीत माझी सर्व अडचण दूर झाली."
युट्यूबवरून पैसे येण्यास झाली सुरूवात
गणेश यांची अडचण तर दूर झाली. योगिता यांची डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली. त्यांना दुसरी मुलगी झाली. तिच नाव त्यांनी खुशी ठेवलंय.
या सर्व प्रसंगांचे व्हीडिओ गणेश युट्यूबवर टाकत होते. त्यानंतर अचानक त्यांचे व्हीडिओ हे जास्त व्हायरल झाले आणि त्यांचं युट्यूबचं चॅनल मॉनेटाईज झालं.
युट्यूबच्या नियमांनुसार त्यांचे काही नियम आहेत त्यानियमांची पुर्तता केल्यानंतरच व्हीडिओंसाठी पैसे मिळतात. गणेश हे नवीनच असल्याने सुरूवातीला त्यांना त्यातून काही पैसे मिळत नव्हते. मात्र त्यांना या सर्व व्हीडिओंचा खूप फायदा झाल्याचं ते सांगतात.
गरोदरपणासाठी दिलेल्या पैशांनी घर बांधल्याचा झाला आरोप
युट्यूबमधून पैसे मिळायला लागल्यावर त्यांनी त्यांच्या घराचं बांधकाम सुरू केलं आणि या बांधकामाचे व्हीडिओसुद्धा ते युट्यूबवर पोस्ट करायला लागले. इथेच त्यांच्यावर टीका व्हायला सुरूवात झाली.
त्यांनी बायकोच्या गरोदरपणात त्यांना जी पैशांची मदत झाली ती त्यांनी घरबांधकामासाठी वापरली अशा आशयाच्या त्यांच्या व्हीडिओखाली कमेंट यायला लागल्या. त्यांना धमक्यांचे फोनही येत असल्याचं गणेश सांगतो होते.
त्यानंतर या सर्व आरोपांचं खंडन करण्यासाठी गणेश आणि योगिता यांनी एक व्हीडिओ बनवला.
त्यामध्ये त्यांनी "आपण मदतीचा पैसा हा गरोदरपणासाठीच वापरला. तर युट्यूबचे पैशांनी आम्ही घराचं बांधकाम करतोय"असं त्यात सांगितलं.
नवीन घर झाल्याचं पाहून खूप आनंद होतोय.
गणेश शिंदे यांचं घर मोहोळ गावाबाहेर रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या वस्तीत आहे. या वस्तीत पोहोचताच गणेश यांचं पिवळ्या रंगातील घर प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. पूर्वी याच ठिकाणी एक पत्र्याचं पडकं घर होतं.
या नवीन घराबद्दल सांगताना गणेश यांच्या पत्नी योगीता सांगतात, "माझ्या मनात कुठे तरी ही खंत होतीच की, आपलं एक चांगलं स्वतःचं असं घर असावं आणि ते स्वप्न आज फक्त आमच्या युट्यूब फॅमिलीमुळे पूर्ण झालंय.
आधी आमचं पत्र्याचं घर होतं, त्या घरात अनेक लोक आम्हाला भेटायला यायचे. पण तेव्हा ते फक्त आमच्या व्हीडिओविषयी बोलायचे, पण कोणीच त्या घराबद्दल बोलत नव्हतं. मात्र आता लोक जेव्हा भेटायला येतात तेव्हा ते घर पाहून खुप कौतूक करतात. त्याचंय हे कौतूक करताना पाहून मलाही खूप आनंद वाटतो."
लोकांच्या कमेंटचा झाला मानसिक त्रास..
आज गणेश आणि योगिता यांच्याकडे एका सुखी कुटुंबाला जे काही लागलं ते सर्व आहे. त्यांनी नुकतीच नवी कारही विकत घेतली आहे.
या सर्वांचे व्हीडिओ ते नियमितपणे युट्यूबवर टाकत असतात. मात्र अजूनही त्यांच्या व्हीडिओवरती त्याच टीका करणाऱ्या कमेंट येतात.
लोक काहीही लिहून पाठवतात त्यामुळे फार मानसिक त्रास होतो असं योगिता सांगतात.
"मधल्या काही काळात गाडीचं म्हणा, घराचं म्हणा, डिलिव्हरीच्या वेळेला खूप कमेंट आल्या आम्हाला पण आम्ही त्याकडे दुर्लक्षच केल. कारण जर आम्ही कमेंटकडे लक्ष दिलं असतं तर आमच्या मनाचं खच्चीकरण झालं असतं. त्याच प्रकारे आमच्या नवरा बायकोचंही काही बरवाईट झालं असतं. मानसिक संतुलन बिघडलं असतं. अशा बऱ्याच काही गोष्टी झाल्या असत्या. त्यामुळे आम्ही त्या कमेंटकडे दुर्लक्ष केलं." असं योगिता म्हणाल्या.
मदत अनाथ आश्रमाला केली दान
गणेश यांची परिस्थिती सुधारल्यानतंर अनेकांनी त्यांना केलेली मदत परत करणार का? हा प्रश्न कमेंटमध्ये विचारला होता. यावर त्यांनी स्वतः एक व्हीडिओ बनवला होता.
त्यामध्ये त्यांनी "कठीण काळात ज्यांनी ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांना सर्वांना शोधून त्यांना पैसे वापस करणं हे शक्य होणार नाही. मात्र आम्हाला जेवढी मदत लोकांनी केली होती तेवढी रक्कम आम्ही अनाथ आश्रमाला दान करणार आहोत," असं सागितलं होतं. त्यानंतर त्यांनी त्यांची मुलगी खुशीचा पहिला वाढदिवस अनाथ आश्रमात साजरा केल्याचं सांगितलं.
युट्यूबमधून मिळतंय महिना दोन लाखांपर्यंत उत्पन्न
गणेश आणि योगिता यांच्यासोबत आता त्यांची मोठी मुलगी शिवानी ही सुद्धा फेमस झाली आहे. शिवानीचे व्हीडिओही लोक आवडीने पाहातात.
आज गणेश यांचे 8 लाखांच्यावर युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत. यातून त्याला महिन्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचं गणेश सांगतात.
गणेश सांगतात, "सुरूवातीला मी प्लंबरचं काम करायचो. दररोज आपली पिशवी घेतली की कामाला जायचो. परंतु कसं आहे जो पर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला चांगलं म्हणत नाही. काही लोकं करतात कौतुक पण काही लोकं टीका करतात. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)