वायुदलाच्या दोन विमानांची हवेत टक्कर; एका पायलटचा मृत्यू

फोटो स्रोत, Reuters
भारतीय वायुदलाच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान एकाच वेळी दोन विमानांच्या अपघाताची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
या अपघातातील दोन्ही विमानांची टक्कर होऊन खाली कोसळली. या अपघातात एका पायलटचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 1 पायलट जखमी असून इतर विमानातील एका पायलटचा अद्याप शोध सुरू आहे.
यासंदर्भात भारतीय वायु दलाने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, अपघात घडला तेव्हा संबंधित विमाने नियमित ‘ऑपरेशनल फ्लाईंग ट्रेनिंग मिशन’वर होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर विमानतळावरून आज (शनिवार, 28 जानेवारी) सकाळी दोन विमानांनी उड्डाण केलं होतं.
यामध्ये विमान रशियन बनावटीचं सुखोई एसयू-30 आणि फ्रेंच बनावटीचं मिराज-2000 यांचा समावेश होता.
या विमानांपैकी सुखोई विमानात दोन पायलट स्वार होते. तर मिराज विमानामध्ये एकच पायलट बसलेला होता.
ग्वाल्हेरच्या पूर्वेला सुमारे 50 किलोमीटर अंतरावर दोन्ही विमाने खाली कोसळल्याचं वृत्त राजस्थानच्या भारतपूरमधील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
याबाबत माहिती देताना स्थानिक पोलीस अधिकारी धर्मेंद्र गौर म्हणाले, आम्हाला पदरगडच्या जंगलात एका ठिकाणी विमानाचे काही अवशेष आणि एक जखमी अवस्थेतील पायलट आढळून आला आहे.”
दुसरं विमान या ठिकाणापासून काही अंतरावर पडल्याची शक्यता आहे. आम्ही त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना केलं आहे, अशी माहिती गौर यांनी दिली.
हवाई दलानेही या विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.
“स्थानिक अधिकाऱ्यांना हवाई दलाच्या बचाव आणि मदत कार्यात मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत,” असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
गेल्या काही काळात भारतीय वायुदलाच्या विमानांच्या अपघातांच्या मालिकेतील हा सर्वात ताजा अपघात आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनच्या सीमेजवळील अरुणाचल प्रदेशमध्ये वायु दलाचं हेलिकॉप्टर कोसळून पाच सैनिक ठार झाले होते.
तर डिसेंबर 2021 मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर अपघातात भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत मृत्यूमुखी पडले होते. या अपघातात त्यांच्यासह 12 जणांना आपल्या प्राणास मुकावं लागलं होतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








