नेपाळ : आधी पायलट पतीचा मृत्यू, 16 वर्षांनी पायलट पत्नीचा तशाच अपघातात मृत्यू

अंजू

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, अंजू खातिवाडा

अंजू खातिवाडा नेपाळच्या पोखरामध्ये अपघातग्रस्त झालेल्या यती एअरलाईन्सच्या विमानाच्या को-पायलट होत्या.

हे विमान पोखरा विमानतळावर लँड होण्याच्या काही क्षण आधी कोसळलं. केबिन क्रूसह या विमानात एकूण 72 प्रवासी होते. नेपाळच्या अधिकाऱ्यांच्या मते या विमान अपघातात कोणीही जिवंत वाचलेलं नाही.

आतापर्यंत 69 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत.

या अपघातात पाच भारतीयांचाही मृत्यू झालेला आहे.

अंजूची कहाणी मात्र या विमानातल्या इतर प्रवाशांपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख दुसऱ्यांदा सहन करावं लागतंय.

जवळपास 16 वर्षांपूर्वी अंजू यांचे पती दीपक पोखारेल यांचा मृत्यू विमान अपघातात झाला होता. तेही पायलट होते, यती एअरलाईन्सच्या विमानातून प्रवास करत होते आणि त्यांचं विमानही लँडिंगच्या काही क्षण आधी कोसळलं होतं.

त्या विमान अपघातातही कोणीही जिवंत वाचलं नव्हतं.

15 जानेवारी 2023 ला ज्या अपघातात अंजू यांचा मृत्यू झाला, ते विमानही लँडिंगच्या काही क्षण आधी कोसळलं.

दीपकच्या आठवणीत पायलट बनल्या

दीपकचा मृत्यू झाला तेव्हा अंजू 28 वर्षांच्या होत्या. आपल्या आयुष्यातलं हे दुःख सोडून पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय होते.

यती एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “अंजू यांच्या वडिलांना वाटत होतं की त्यांनी भारतात जाऊन उच्च शिक्षण घ्यावं, आपलं करियर करावं पण याला अंजूने नकार दिला.”

आपल्या पतीच्या आठवणीत अंजूही एव्हिएशन इंडस्ट्रीत काम करू इच्छित होत्या.

अधिकारी म्हणतात, “त्यांना पायलट बनायचं होतं, आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं.”

यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्श बारतौला म्हणतात की, “अंजू यांना आपल्या पतीच्या अपघाती मृत्यूनंतर विम्याची जी रक्कम मिळाली, त्यातून त्यांनी पायलट बनण्याचं प्रशिक्षण घेतलं.”

2010 साली त्या यती एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून रूजू झाल्या. याच कंपनीत त्यांचे पती दीपक पायलट म्हणून काम करत होते.

दीपकचा मृत्यू कसा झाला?

दीपक एक अनुभवी पायलट होते. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ते नेपाळी सैन्याची हेलिकॉप्टर्स उडवायचे. अंजू यांच्याशी लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी ते यती एअरलाईन्ससाठी काम करायला लागले.

नेपाळ विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

यती एअरलाईन्सचे अधिकारी सांगतात की ज्या विमान अपघातात दीपक यांचा मृत्यू झाला तो अपघात 2006 साली झाला होता.

ते म्हणतात, “हा अपघात नेपाळच्या जुमला जिल्ह्यात झाला होता.”

“यती एअरलाईन्सच्या त्या विमानात दोन पायलटसह नऊ लोक होते. सगळ्यांचा मृत्यू त्या अपघातात झाला. हा अपघातही लँडिंगच्या काही क्षण आधीच झाला होता.”

चांगल्या पायलट होत्या अंजू

यती एअरलाईन्सचे अधिकारी आणि कर्मचारी अंजू खातिवाडा एक कुशल पायलट होत्या असं सांगतात.

यती एअरलाईन्सच्या एका अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “त्या कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार असायच्या. त्यांनी पोखराकडे आधीही उड्डाणं केली होती.”

अंजू यांना विमान उडवण्याचा दीर्घ अनुभव होता.

यती एअरलाईन्सच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, “त्यांनी काठमांडू, भद्रपूर, विराटनगर आणि धांगडीसह अनेक विमानतळांवरून उड्डाण केलं होतं.”

पोखराजवळ झालेल्या विमान अपघाताचे पायलट कमाल केसी होते तर अंजू को-पायलट होत्या.

एअरलाईन्सने दिलेल्या माहितीनुसार त्यांना 21 हजार तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव होता. त्यांचा मृतदेह मिळाला आहे आणि त्याची ओळखही पटली आहे.

15 जानेवारीला काय घडलं?

लँडिंगची परवानगी मिळाल्यानंतर विमान ‘व्हिजिबलिटी स्पेस’ मध्ये आलं होतं. म्हणजे ते विमान कंट्रोल टॉवरमधून दिसत होतं. यानुसार एअर ट्राफिक कंट्रोलचा अंदाज होता की विमान 10 ते 20 सेकंदात रनवेवर उतरेल.

आपलं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एअरपोर्टच्या एका ट्राफिक कंट्रोलरने म्हटलं की, “वळताना जेव्हा विमानाने लँडिंग गिअर उघडला तेव्हा विमान ‘स्टॉल’ झालं आणि खाली जायला लागलं.”

एव्हिएशनच्या क्षेत्रात स्टॉल होणं म्हणजे विमान आपली विशिष्ट उंची न राखू शकणं.

विमान कंट्रोल टॉवरवरून स्पष्ट दिसत होतं
फोटो कॅप्शन, विमान कंट्रोल टॉवरवरून स्पष्ट दिसत होतं
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या अधिकाऱ्याच्या मते विमान कंट्रोल टॉवरवरून स्पष्ट दिसत होतं.

पोखरा विमानतळाचे प्रवक्ता विष्णु अधिकारी यांनीही सांगितलं की अपघात झाला त्या दिवशी इथलं वातावरण स्वच्छ होतं आणि सगळी उड्डाणं वेळेत होत होती.

पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ 1 जानेवारीपासून सुरू झालं आहे. इथे पूर्व आणि पश्चिम दिशांनी विमानं येतात.

पूर्वेकडून येणारी विमानं रनवे– 30 वर उतरतात तर पश्चिमेकडून येणारी विमानं रनवे-12 वर उतरतात.

या विमानतळाच्या अधिकाऱ्यांच्या मते अपघातग्रस्त विमान ‘व्हिज्युअल फ्लाईट रूल्स’ (VRF) या तंत्राचा वापर करून लँड करण्याच्या प्रयत्नात होतं.

जेव्हा हवा स्वच्छ असेल तेव्हा पायलट टेकऑफ आणि लँडिंगसाठी VRF हे तंत्र वापरतात.

अधिकाऱ्यांनी सांगितल, विमान जेव्हा पहिल्यांदा संपर्कात आलं तेव्हा त्याने एटीसीकडे रनवे-30 वर उतरण्याची परवानगी मागितली. विमानाला परवानगी दिली गेली. पण 24.5 किलोमीटर अंतरावर आल्यावर विमानाने रनवे -12 वर उतरण्याची परवानगी मागितली.

विमानाच्या पायलटने एअर ट्राफिक कंट्रोलला म्हटलं, “मी माझा निर्णय बदलतोय आणि मी पश्चिमेकडून लँड करेन.”

नव्या विमानतळावर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे तर हा अपघात झाला नाही ना असं विचारलं असतं विमानतळाचे प्रवक्ते विष्णु अधिकारी म्हणाले की, “सध्या असं काही ठोस सांगणं अवघड आहे. अपघाताचं कारण सविस्तर चौकशीअंती कळेल.”

पोखरात झालेल्या विमान अपघाताच्या चौकशीसाठी सरकारने पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

नेपाळमध्ये होणारे विमान अपघात

नेपाळमध्ये 2000 पासून झालेल्या विमान अपघात आणि हेलिकॉप्टर अपघातात जवळपास 350 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जगातल्या सर्वात उंच शिखरांपैकी आठ शिखरं नेपाळमध्ये आहेत.

नेपाळ विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

विमान अपघातांचा विचार करता नेपाळ सर्वात अपघात-प्रवण क्षेत्र समजलं जातं.

गेल्या वर्षी मे महिन्यात नेपाळच्या मुस्तांग विमानाचा अपघात झाला होता. यात तारा एअरचं डीएच-6 विमान अपघातग्रस्त झालं आणि या विमानातल्या सगळ्या 22 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

सन 2018 ला काठमांडू विमानतळावर मोठा अपघात झाला होता. वृत्तसंस्था पीटीआयनुसार 13 मार्च 2018 साली झालेल्या या अपघातात 71 प्रवाशांपैकी 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)