मध्य प्रदेशात बोअरवेलमध्ये 80 तासांपासून अडकलेल्या 8 वर्षीय मुलाचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यात बोअरवेलमध्ये 80 तासांपासून अडकलेल्या एका 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

तन्मय साहू असं या मुलाचं नाव आहे. बैतुलच्या अदनैर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सोनी यांनी याविषयी माहिती दिली.

बीबीसीशी फोनवरून बोलताना पोलीस निरीक्षक अजय कुमार यांनी सांगितलं, “तन्मय साहू हा मांडवी परिसरातील बोअरवेलमध्ये चार दिवसांपूर्वी पडला होता. तेव्हापासून त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी संघर्ष करत होते.”

बोगदा खोदण्यास उशीर झाल्यामुळेच या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस निरीक्षक अजय कुमार पुढे म्हणाले, “आज (10 डिसेंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास बोअरवेलला समांतर एक खड्डा खोदून बचावपथक तन्मयपर्यंत पोहोचलं. मात्र तन्मय निपचित पडलेला असल्याचं त्यांना आढळून आलं.”

यानंतर, मुलाला ताबडतोब बैतूल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याचा आधीच मृत्यू झालेला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आता डॉक्टर तन्मयच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार आहेत.

गेल्या चार दिवसांपासून बचाव पथकातील कर्मचारी बोअरवेलच्या बाजूने समांतर बोगदा खोदण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, या कामात उशीर झाला.

याविषयी होमगार्डचे कमांडंट एस. आर. आझमी यांनी पत्रकारांना सांगितल, “या परिसरातील जमीन ही खडकाळ असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यामुळेच बोगदा खोदण्यास विलंब झाला.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)