थायलंड : गुहेत स्वतः 3 दिवस राहून मुलांना वाचवणारा अवलिया डॉक्टर

डॉ. रिचर्ड हॅरिस या ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी थायलंडच्या त्या गुहेत कौशल्याची पराकाष्ठा केली.

थायलंडच्या चियांग राय भागातील थाम लुआंग नांग नोव ही गुहा एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. म्यानमारच्या सीमेला लागून असलेली ही गुहा अनेक किमी खोल आहे.

त्याच गुहेत गेल्या आठवड्यात 11 ते 16 या वयोगटातल्या 12 मुलांनी 25 वर्षांच्या प्रशिक्षकासोबत प्रवेश केला आणि तिथं अडकले.

नऊ दिवसांच्या प्रयत्नानंतर शोधपथकाला या 13 जणांना शोधण्यात यश मिळालं. आणि शोध लागल्यावर खरी परीक्षा सुरू झाली.

ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेडचे भूलतज्ज्ञ (anaesthetist) डॉ. रिचर्ड हॅरिस याच काळात थायलंडमध्ये सुटीवर होते. त्यांनी आपली सुटी आवरती घेतली आणि शोधमोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले.

गुहेत सापडलेल्या मुलांची तब्येत तपासण्यासाठी आत गेलेल्या डॉक्टरांच्या पथकात ते सहभागी झाले आणि सलग तीन दिवस आतमध्ये मुलांसोबत राहिले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यात अशक्त मुलाला पहिल्यांदा गुहेबाहेर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत टप्प्याटप्प्यानं सगळ्यांनाच गुहेबाहेर सुरक्षित आणण्यात आलं.

डॉ. हॅरिस उर्फ हॅरी हे गुहेतून बाहेर पडणाऱ्या शेवटच्या लोकांपैकी होते, असं सांगितलं जातं.

मुलांच्या सुरक्षित सुटकेचा आनंद साजरा केला जात असताना डॉ. हॅरिस यांच्यावर व्यक्तिगत आघात झाला. ही मोहिम संपल्यावर काही वेळातच, बुधवारी डॉक्टर हॅरिस यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली.

दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या रुग्णवाहिका सेवेत डॉ. हॅरिस कार्यरत आहेत. शोध मोहिमेत आलेल्या शारीरिक आणि मानसिक ताणाच्या पार्श्वभूमीवर या निधनामुळे हॅरिस यांच्या कुटुंबीयांचं दु:ख बळावलं.

"या सगळ्या घडामोडींमुळे पूर्ण आठवडा खूपच गडबडीचा होता," असं 'मेडस्टार'चे डॉ. अॅण्ड्र्यू पिर्यस म्हणाले. त्यांनी या विषयावर गोपनियता राखण्याची विनंती केली.

"हॅरी हा अतिशय उमदा माणूस आहे. या मोहिमेत मदत करण्याचा निर्णय घेताना त्यानं दुसऱ्यांदा विचार केला नसणार," असंही त्यांनी म्हटलं.

'शोध मोहिमेचा महत्त्वाचा भाग'

ब्रिटिश डायव्हर्सनी डॉ. हॅरिस यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे थायलंडच्या सरकारमधील उच्चपदस्थांनी त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली, असं ऑस्ट्रेलिया सरकारनं स्पष्ट केलं.

"ते या शोध मोहिमेचा अविभाज्य भाग होते," असं परराष्ट्र मंत्री ज्युली बिशप यांनी सांगितलं. अशा प्रकराच्या बचाव मोहिमेचे डॉ. हॅरिस हे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत, असंही त्या म्हणाल्या.

"या शोध मोहिमेत ऑस्ट्रेलियाची खूप मदत झाली. विशेषत: डॉक्टरांची," अशी प्रतिक्रिया शोधमोहिमेचे प्रमुख आणि चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी दिली.

डॉ. हॅरिस यांच्यासंदर्भात त्यांनी, "खूप छान, सर्वोत्तम," अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

डॉक्टरांची मैत्रिण सू क्रो यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, डॉक्टर हे निःस्वार्थपणे काम करण्यासाठी ओळखले जातात. कोणतीही स्थिती ते शांतपणे हाताळू शकतात. गुहेतल्या मुलांना सावरण्यास, त्यांचं मनोबल वाढण्यास डॉक्टरांच्या कौशल्याची नक्कीच मदत झाली असेल.

"लहान मुलांबरोबर ते सहज मिसळू शकतात. गुहेतून बाहेर पडण्यासाठी डायव्हिंग करावं लागणार होतं, तशी त्यांच्या मनाची तयारी त्यांनी करून घेतली असणार. त्या मुलांची काळजी घेण्यासाठी ती नेमकी व्यक्ती होती," असं क्रो म्हणाल्या.

सोशल मिडियावर तर त्यांचं अभिनंदन करणाऱ्यांचा पाऊसच पडला. त्यांना ऑस्ट्रेलियन ऑफ द इयरनं गौरवण्याची मागणीही करण्यात आली. सरकारनंही त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

डॉ. हॅरिस हे पाण्याखालच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ख्रिसमस आयर्लंड आणि चीनमधील अनेक गुहा त्यांनी पर्यटक म्हणून पालथ्या घातल्या आहेत.

2011मध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियातल्या एका गुहेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्राण गमावलेल्या एका मित्राचा मृतदेह बाहेर आणण्याची अवघड कामगिरी पार पाडण्यात डॉ. हॅरिस सहभागी होते.

पॅसिफिक महासागरातल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकिय पथकात त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे, अशी माहिती थायलंडच्या परराष्ट्र मंत्री ज्युली बिशप यांनी दिली.

"ते एक असामान्य ऑस्ट्रेलियन आहेत. शोधमोहिमेतला त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा ठरला," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

डॉ. हॅरिस यांच्यासह गुहेत गेलेले त्यांचे डायव्हिंगमधले सहकारी आणि पर्थस्थित व्हेटर्नरी डॉक्टर क्रेग चॅलेन यांचंही बिशप यांनी कौतुक केलं.

थायलंडच्या या शोधमोहिमेत या जोडगळीसह 20 ऑस्ट्रेलियन सहभागी झाले. त्यात नौदलातले डायव्हर्स आणि पोलीसांचा समावेश होता.

हे पाहिलं का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)