You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोरबी: 'माझी तिन्ही मुलं गेली, आमचं सर्वस्वच गेलं'
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी न्यूज, मोरबी
रविवारी संध्याकाळी चिराग मुच्छाडिया (20) त्याचा भाऊ धार्मिक (17) आणि चेतन (15) तिघे फिरायला बाहेर पडले.
झुलत्या पुलावर जात आहोत असं त्यांनी आईला सांगितलं. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या झुलत्या पुलाच्या इथे ते जाणार होते. काही दिवसांपूर्वीच हा पूल जनतेसाठी खुला झाला होता. दुरुस्तीसाठी हा पूल बंद होता.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा हा आठवडा आहे. शाळाही अजून सुरू झालेल्या नाहीत. चिराग आणि त्याच्या भावांप्रमाणे शहरातली बरीच माणसं भटकायला त्या पुलावर जाणार होती. चिरागने तिकीटं घेतली. प्रौढांसाठी 17 रुपये तिकीट होतं तर लहान मुलांसाठी 12 रुपये. पुलाचं एकूण अंतर आहे 230 मीटर. पुलाची साधारण उंची आहे 755 फूट.
नितीन कावैय्या हेही घरच्यांबरोबर तिथे होते. नितीन, त्यांची बायको, सात वर्षांची मोठी मुलगी आणि सात महिन्यांची तान्ही मुलगी असे सगळे पुलावर होते.
त्यांनी पुलावर फोटो घेतले. साडेसहाच्या बेतात ते पुलावरून बाहेर आले. माच्छू नदीच्या एका किनाऱ्यावर जाऊन बसले.
'पुलावर प्रचंड गर्दी होती. पुलावर साधारण 400-500 लोक असावेत', असं नितीन यांनी सांगितलं. तिकीट देणाऱ्या माणसाला जाऊन सांगितलं की पुलावरची गर्दी कमी करा. त्यानंतर त्यांनी काही केलं का माहिती नाही.
दहा मिनिटांनंतर ते आपल्या बाळाला पाणी देण्यासाठी खाली वाकले तेव्हा त्यांनी आरडाओरडा आणि किंचाळण्याचा आवाज ऐकला.
"पूल कोसळला होता, किनाऱ्याच्या एका बाजूने पुलाचे लोखंडी उपकरणं लोंबकळत होती," असं नितीन म्हणाले.
"लोकांना पाण्यात पडताना पाहिलं. ते पाण्यातून बाहेर आलेच नाहीत. जे वाचले ते पुलाच्या हाती लागणाऱ्या भागाला धरून पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. आमच्यासारखे जे किनाऱ्यावर होते त्यांनी अनेकांना हात देऊन बाहेर काढलं," असं त्यांनी पुढे सांगितलं.
या दुर्घटनेत 135 लोकांचा मृत्यू झाला. चिराग, चेतन आणि धार्मिक या तीन भावांचा त्यामध्ये समावेश आहे.
या तीन भावंडांच्या घरी तिघांपैकी एकाच्या मित्राने कांताबेन म्हणजे त्यांच्या आईला पूल कोसळल्याचं कळवलं. तिन्ही मुलं पुलावरच फिरायला जातोय असं सांगून घराबाहेर पडली होती. त्यांनी लगेचच त्यांना कॉल करायला सुरुवात केली. पण त्यांचा फोन लागलाच नाही. "मला अतिशय अस्वस्थ वाटू लागलं, आता काय करावं या विचारात मी येरझाऱ्या घालू लागले," कांताबेन सांगू लागल्या.
कांताबेन यांचे पती राजेश तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृतांना तसंच जखमींना ज्या रुग्णालयांमध्ये भरती केलं जात होतं तिथे धाव घेतली. रात्री अकराच्या सुमारास त्यांना धार्मिक आणि चिरागचे मृतदेह मोरबीमधल्या सरकारी रुग्णालयात दिसले.
रात्रीच्या काळोखात पोलीस, स्थानिक प्रशासन, आपात्कालीन विभाग आणि लष्कराच्या तुकडीने लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांचे शर्थ केले. ज्यांनी या अपघातात जीव गमावला त्यांचे मृतदेह नदीबाहेर काढून रुग्णालयात पाठवण्याचं काम रात्रीतूनच करण्यात आलं.
रात्री तीनच्या सुमारास चेतनचा मृतदेहही तपास यंत्रणांच्या हाती लागला. तीन कर्ती मुलं दुर्घटनेत गेल्याचं कळल्यानंतर मुच्छाडिया यांच्या घरी सांत्वनासाठी येणाऱ्यांची रीघ लागली होती.
"आम्ही आमची तिन्ही मुलं गमावली आहेत. आमचं सर्वस्वच हरपलं आहे," असं रडता रडता कांताबेन बोलतात. "आता आमचं काय बाकी आहे? मी आणि माझा नवरा दोघेच उरलो."
20 वर्षीय चिराग चष्मे तयार करणाऱ्या कंपनीत काम करत. चिरागचे बाबा राजेश ड्रायव्हर म्हणून काम करतात. या दोघांच्या कमाईतून घर चालतं.
"चिराग चांगला मुलगा होता. तो मी सांगितलेलं सगळं ऐकत असे. त्याला जे हवं ते देण्याचा माझा प्रयत्न असे," असं राजेश यांनी सांगितलं.
"धार्मिकचा 14 डिसेंबरला वाढदिवस असतो. तो 18वर्षांचा झाला असता. त्याने नोकरी शोधायला सुरुवात केली असती. तो खूप मस्तीखोर होता. आम्ही सगळे खूप धमाल करायचो. आता ते तिघेही गेले," असं राजेश म्हणाले.
"त्याला तेलपराठा आवडत असे, नेहमी मला तेच बनवायला सांगत असे," असं कांताबेन यांनी सांगितलं.
चेतन त्या तिघांमध्ये सगळ्यांत लहान होता. तो दहावीत होता. तो हुशार असल्याचं राजेश यांनी सांगितलं.
त्या तिघांचे पासपोर्ट साइज फोटो राजेश यांनी आम्हाला दाखवले. फोटो काही वर्षांपूवी काढलेला असल्याने तिघे लहान दिसत होते. माझ्या मुलांच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असं राजेश म्हणाले.
दोषींना आयुष्यभर तुरुंगात डांबायला हवं. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा मिळायला हवी. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, न्याय हवा आहे, असं राजेश सांगतात.
मोरबी इथल्या माच्छू नदीवरच्या या दुर्घटनेत अनेक कुटुंबापैकी एकजण तरी गेला आहे.
आतापर्यंत याप्रकरणी 9 जणांना अटक केली आहे. यामध्ये तिकीट विक्री करणाऱ्यांसह सेक्युरिटी गार्ड, ओरेवा कंपनीचे व्यवस्थापक यांचा समावेश आहे. ओरेवा कंपनीने या पुलाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतलं होतं.
पूल का कोसळला यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या प्रश्नांना ओरेवा कंपनीने उत्तर दिलं नाही. कंपनीच्या उच्चपदस्थांची चौकशी केली जाईल का, असा सवाल अनेकजण करत आहेत.
या दुर्घटनेत स्थानिक प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पूल जनतेसाठी खुला करण्यापूर्वी सेफ्टी चेक करण्यात आलं होतं का? असाही प्रश्न विचारला जात आहे.
"जेव्हाही मी डोळे मिटतो तेव्हा पडलेल्या स्थितीतल्या पुलाचं दृश्य डोळ्यासमोर तरळतं. पाण्यात बुडालेल्या लोकांच्या किंचाळ्या आणि चीत्कार कानी पडतात," असं नितीन यांनी सांगितलं.
"मी तिकीटं फाडून टाकली. केवळ मीच नव्हे, अख्खं मोरबी शहर दु:खात बुडालं आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवं," असं राजेश म्हणाले. तसं झालं नाही तर माझी तीन मुलं जशी गेली तशी लोकांचीही जातील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)